मंगळवार, २० जून, २०१७

वारी : एक संस्कृती अभ्यास



                                      

वारी :  एक संस्कृती अभ्यास
- देवकुमार अहिरे

               महाराष्ट्रातील सांस्कृतिक संघर्षाचा आणि संवादाचा विचार करतांना आपणास वारी आणि वारकरी धर्म याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि लोकजीवनात वारीला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे दरवर्षी लाखोंनी लोक वारीमध्ये सहभागी होत असतात. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा मानबिंदू म्हणजे वारी होय. लोकसंस्कृती म्हणून वारी ही समाजमनात रुजलेली तर आहेच पणत्याचवेळी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय लढ्याची युद्धभूमी सुद्धा बनलेली आहे. सध्याच्या काळात वारीवरून इतरांप्रमाणेच डिजिटल स्पर्धासुद्धा मोठ्या जोमाने सुरु झालेली दिसते. यातून एक वेगळ्याचप्रकारची संस्कृती वारीमध्ये शिरकाव करत आहे. लोकानुरंजनवादी संस्कृती म्हणूनसुद्धा आजकाल तुम्ही वारीचा विचार करू शकता आणि सोबतच पर्यायी संस्कृती म्हणून तुम्ही वारीकडे पाहू शकता.
              संस्कृती ही व्यापक मुल्यवाचक संकल्पना आहे. त्यामुळे संस्कृतीचा विचार करतांना नेहमी स्थानाचा, संदर्भाचा आणि काळाचा विचार करावा लागतो अन्यथा संस्कृतीच्या अभ्यासात अनेक अडथळे निर्माण होवू शकतात. कारण, संस्कृती ही नेहमी प्रवाही असणारी गोष्ट आहे. म्हणून सर्वसामान्यपणे संस्कृतीची व्याख्या करतांना “मानवी जगण्याचा व्यवहार म्हणजे संस्कृती” अशी केली जाते. आर्नोल्ड टोयम्बी यांच्यासारखे इतिहासकार संस्कृतीला मानवीजीवनातील महत्वाचा भाग मानतात. त्यांच्यामतानुसार संस्कृतीचा उदयास्त म्हणजे इतिहास होय. संस्कृतीचा संघर्ष म्हणजे काय? हा प्रश्न आपणास पढू शकतो. एकाचवेळी अनेक संस्कृतीचा उदय, विकास आणि ऱ्हास होत असतो. प्रदेश, समूह, देश, भौगोलिक परिस्थिती, पर्यावरणीय परिस्थिती यांचा संस्कृतीच्या जडणघडणीवर परिणाम होत असतो. त्यामुळे एकाचवेळी वेगवेगळ्याठिकाणी संस्कृतीचा उदय होतो किंवा एकाचठिकाणी वेगवेगळ्यावेळी संस्कृतीचा उदय होत असतो त्यामुळे सांस्कृतिक संघर्ष होण्याची शक्यता असते. परंतू वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये नेहमी फक्त सांस्कृतिक संघर्षच होत नाही तर बहुतेकवेळा सांस्कृतिक संवाद आणि सांस्कृतिक समन्वयसुद्धा होतो. वारीचा विचार करतांना आपणास आधी वारकरी धर्म समजून घेतला पाहिजे. वारकरी धर्मासोबातच भागवत धर्म आणि भक्ती यांचा विचार करावा लागतो. भारतीय धर्म आणि दर्शनात जो संस्कृत संघर्ष आणि संवाद झाला त्याचे प्रतिरूप म्हणजे वारकरी धर्म होय म्हणूनच त्याच्या प्रणेत्याला रा. चिं. ढेरे हे विठ्ठल: एक महासमन्वयक असे म्हणतात. कोणाला वारकरी धर्मात वैदिक परंपरा दिसते तर कोणाला अवैदिक जैन-बौद्ध परंपरा दिसते. कोणी शैव म्हणते तर कोणी वैष्णव म्हणतात तर कोणी हरिहर म्हणतात. वारकरी धर्माचा आणि विठ्ठलाचा शोध आणि उगम याविषयी अनेकांचे वेगवेगळे दावे आहेत. अजूनही हाच खरा आणि हा खोटा हे सिद्ध झालेले नाही आणि ते होणारही नाही. कारण विठ्ठल या लोकदेवाताची लोकप्रियता वाढल्यामुळे त्या-त्याकाळातील वर्चस्व आणि प्रभूत्वशाली विचारसरणी आणि दर्शनांनी विठ्ठलाला आपलेसे करून घेतले आहे आणि ही शेकडो वर्षांची परंपरा आहे.
           ११ व्या शतकात भक्ती या संकल्पनेला दर्शनात आणि धर्मात महत्व आलेले दिसते. वैदिक अनाचाराला विरोध म्हणून जैन-बौद्ध परंपरा निर्माण झाल्यात त्यांनी एक वेगळा विचार दिला. नंतरच्या काळात त्यांच्यात कर्मकांड निर्माण झाल्यावर शैव-वैष्णव परंपरा विकसित झाल्यात त्यांनाही तात्विक विरोध म्हणून सिद्ध-नाथ परंपरा विकसित झाली. त्यांच्या पुढचा अविष्कार म्हणजे भक्ती साधना होय. पूर्वाश्रमीच्या नाथपंथीय ज्ञानेश्वरांनी आणि नामदेवांनी भागवत धर्माचा पाया घातला. ज्ञानेश्वरांनी पाया रचल्यानंतर तुकोबा कळस होईपर्यंत अनेक जात-वर्गीय संत या भागवत धर्मात होवून गेले. तुकोबांच्या निधनानंतर वारीची परंपरा सुरु झाली. ती आजतागायत चालू आहे. मधल्या काळात पेशवाईत काही समस्या निर्माण झाल्या होत्या. दरवर्षी आषाढ महिन्यात पंढरपूरची वारी असते. महाराष्ट्रातून मोठ्याप्रमाणात बहुजन-शेतकरी-कष्टकरी जातवर्गातील स्त्री-पुरुष मोठ्याप्रमाणात वारीमध्ये सहभागी होतात.

लोकसंस्कृती:
         महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक वारीच्या या सोहळ्यात सहभागी होत असतात. या सहभागी होणाऱ्या लोकांमध्ये शेतकरी वर्गातील लोकांचा मोठा सहभाग आहे. विठ्ठलाजवळ आपले गाऱ्हाणे मांडायला आम्ही जातो असे अनेक शेतकरी सांगतात. विठ्ठल हा महाराष्ट्राचा लोकदैवत आहे. विठ्ठल हा लोकांचा देव असल्याने लोकांशी संवाद साधतो. भक्तांच्या कामात मदत करतो. भक्ताच्या शिव्या खातो. भक्तांना घाबरतो. वारकरी संताच्या अभंगाचा जर आपण अभ्यास केला तर आपणास जाणवेल कि, भक्ताचा  विठ्ठलसोबत कोणत्यापातळीवर संवाद होत होता. सावता माळी, गोरोबा कुंभार, चोखा महार,जनी दासी, सेना न्हावी या संतांना विठ्ठल कामात मदत करतो तुकाराम तर विठ्ठलाला शिव्या घालतो आणि नामदेव चोख्याची बाजू घेवून विठ्ठलाशी भांडतो. या सर्व उदाहरणांवरून आपणास स्पष्ट होईल कि, विठ्ठल हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा कसा भाग झाला आहे. कीर्तन आणि प्रवचन ही वारकरी धर्माची देन आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वर्षानुवर्षापासून शेकडो कीर्तने होत आहेत. त्यातून वारकरी संतांचा विचार पसरविला जात आहे. अनेक लोकांनी यावर आक्षेपसुद्धा घेतलेले आहेत. विशेषत वसाहतीक काळात वारकरी चळवळीने  लोकांना निवृतीमार्गी बनविले त्यामुळे आधी मुसलमानाचे आणि मग इंग्रजांचे राज्य आले असे आरोप इतिहासाचार्य राजवाडेंनी केला. २० व्या शतकात अनेक वारकरी संत स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेले दिसतात. वसाहतीककाळातच वारकरी चळवळीचे वैदिकीकरण करायला सुरुवात झाली याला  व्यापक 'वसाहतीक धर्मचिंतन' कारणीभूत होत असे अभ्यासक म्हणतात. त्याचवेळी विठ्ठलाच्या वैदिकीकारणाला मुकुंदरावपाटील यांनी विठोबाची शिकवून लिहून प्रश्नांकित केलेले दिसते. 

पर्यायी संस्कृती:
              लोकसंस्कृतीचा विचार करतांनाच आपण वारीच्या आणि वारकरी धर्माच्या सांस्कृतिक राजकारणावर काही प्रमाणात बोललो आहोत. महाराष्ट्रातील जातीयसंघर्षात वारीला दलितवर्गाने विषेत: आंबेडकरोत्तर चळवळीने वारीला अभिजनाची संस्कृती म्हणूनच पहिले परंतू त्यात तेवढे तथ्य नाहीये. वारकरी धर्मात आणि वारीत मोठ्याप्रमाणात बहुजन समाज सहभागी होत असतो. सगळ्याच जातींचे संत या परंपरेत होवून गेल्यामुळे एका व्यापक तात्विक बैठक या धर्मपरंपरेला आहे. ११ व्या शतकात सर्व शिकवणूक आणि धार्मिक चर्चा ही संस्कृतमधूनच होत असल्याने समाजातील मोठा वर्ग त्या चर्चेला मुकलेला होता. त्यामुळे लोकभाषेच्या माध्यमातून धर्मचर्चा आणि ईश्वराची आराधना करता येतो. सोबतच सर्वसामान्य माणूससुद्धा ईश्वराची आराधना करू शकतो हा विचार त्यातून विकसित झाला आणि आग मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठींबा या विचारला मिळाला त्यामुळे अनेक लोकांनी या विचारांकडे पर्यायी दृष्टिकोन म्हनून पहिले आहे.
            भारतीय समाज जातीय विषमतेवर आधारलेला आहे. ही जातीय विषमता काहीप्रमाणात कमी करण्याचे काम संतांनी केले. सगळ्याच जात-धर्मातील लोक संत होवून अभंग रचणे हे त्याकाळच्या संदर्भात खूपच मोठी गोष्ट होती. आज काही लोक संतानी जातीव्यवस्था नष्ट केली नाही सा आरोप लावतात. आरोप करताना त्यांनी जातीव्यवस्थेचे राजकीय अर्थशास्त्र  लक्षात घेतलेले नसतात. संतांच्या काळात वेगळी प्रकारची उत्पादन व्यवस्था विकसित झालेलीच नवती त्यामुळे जातीआधातीत उत्पाधनव्यवस्थेला धक्का बसलाच नाही.परंतू तरीही धार्मिक आणि आध्यामिक पातळीवर सगळ्यांना वारकरी धर्माने संधी दिल्यामुळे सनातनी- ब्राह्मणी वर्ग नाराज झालेला दिसतो. त्यांनी संताना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिलेला दिसतो. एकनाथांना आणि तुकारामाला दिलेला त्रास सर्वश्रुत आहे. चोखोबाला दर्शन नाकारून आपल्या ब्राह्मणी मानसिकता दाखवलेली दिसते. परंतू त्याचकाळात नामादेवासारखा शिंपी हा चोखोबासारख्या महारासाठी भांडतो हे वारकरी धर्माचे आणि वारीसंस्कृतीचे योगदान आहे.
           एकोविसाव्या शतकात जागतिकीकरणाच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांची जमीन मोठमोठे भांडवलदार घेत आहेत. औद्योगिक कारीडोर आणि सेझ सारखे प्रकल्प आणून शेतकऱ्याला देशोधडीला लावले जात आहे. अशा काळात शेतकरी-वारकरी आघाडी होवून अनेक साम्राज्यवादी धोरणांना वारकरी चळवळीने विरोध केलेला दिसतो. वारी ही अशाकाळात लोकांना संघटीत करण्याचे चांगले साधन ठरते. 

लौकिक संस्कृती:
           जागतिक पातळीवर वाढलेला चंगळवाद आणि नवउदारमतवादी धोरणाचा होणारा सांस्कृतिक परिणाम हा वारीवर सुद्धा पडलेला दिसून येत आहे. जरी अजूनही वारी आपले जुने रूप ठिकवून असली तरी चंगळवादी आणि नवउदारमतवादी सांस्कृतिक प्रभाव वाढत आहे. कारण वारीत सहभागी होणारे लोक हे व्यापक समाजाचे भाग आहे. आणि लोकांच्या जीवनावर मार्केट खूपच प्रभाव टाकत आहे. अनेक स्वयंम सेवी संस्थाना लोक मिळत नसल्याने हे लोक वारीमध्ये घुसतात आणि त्यांच्या विचारांचा आणि कामाचा प्रचार करतात. सरकारी पातळीवरही वारीमध्ये हस्तक्षेप वाढत आहे. याला दोन करणे आहेत. एक संसदीय राजकारण आणि दुसरे म्हणजे मोफत येवडा मोठा जनसमुदाय असतो त्यामुळे सरकारी योजनाचा किंवा धोरणांचा येथेच प्रचार केला जातो.मनीअसूनही मनशांती हरवलेले लोकसुद्धा वारीत सहभागी होतांना दिसतात. हे सर्व लोक वारीत सहभागी होतात पण त्यांना वारी आणि वारीच्या माघील मुल्ये माहितच नसतात. शेतकरी वर्गालाही माहित नसतात पान त्याची एक धारणा आहे त्यामुळे तो वेगळ्यापातळीवर विठ्ठलाशी तादात्म्य पावलेला असतो.
            सध्या अनेक हौशे, नवशे आणि गवशे प्रकारचे लोक वारीत सहभागी होत असल्याने छोट्यामोठ्या पातळीवर विपरीत गोष्टी घडत आहेत. परंतू याला वारी आणि वारकरी संप्रदाय जबाबदार नसून एकूणच समाजाची मानसिकत जबाबदार आहे. समाजामध्ये आध्यात्मिक बाजार आणि चंगळवाद वाढत असल्याने अनेक विपरीत गोष्टी निर्माण होत आहेत येणाऱ्या काळात वारीला त्याला सामोरे जावे लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...