दलित चळवळ: आकलनाच्या दिशेने...
विचार, वर्तुवणूक आणि व्यूहरचनेच्या व्यवहारावर
मार्मिकपणे भाष्य करणारे पुस्तक
देवकुमार अहिरे
रोहित वेमुला ते उना
प्रकरण व्हाया आंबेडकर १२५ वी जयंती महोस्तव कार्यक्रम आणि आंबेडकर भवन यानिमित्ताने
माघील वर्षभरात चळवळीच्या आणि वैचारिक मांडणीच्या क्षेत्रात अनेक प्रयोग झालेत. दलित चळवळीची पुढची दिशा
काय असू शकते याची आपणास एक अस्पष्ट कल्पना येवू शकते. हैद्राबाद विद्यापीठातील आंबेडकर विद्यार्थी
संघटनेने उत्तर प्रदेशातील मुज्जफरनगर दंगलीवरील डॉक्युमेंटरी पाहण्यासाठी प्रयत्न
करणे त्याविरोधात भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्याने आंबेडकर विद्यार्थी संघटनेला
जातीवादी आणि राष्ट्रविरोधी संबोधणारे पत्र मनुष्यबळ मंत्रालयाला लिहिणे आणि मग
मंत्रालयाच्या दबावाने संबधित विद्यार्थ्यांना विद्यापीठाने खानावळ,वसतिगृहातून काढून टाकणे. रोहितचे काही दिवसांनतर
आत्मबलिदान करणे त्यातून देशभर सर्वच स्थरातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर
येणे येथपासून तर माघील काही दिवसांपूर्वी
गुजरातमध्ये विश्व हिंदू परिषद पुरस्कृत गोरक्षकांनी चार दलित तरुणांना
गोहत्येच्या नावाखाली बेदम मारहाण केली त्याविरोधात हजारो दलितांनी रस्त्यावर
येवून “गाय की पूंच तुम रख लो| हमे हमारी जमीन दे दो|” अशी घोषणा देत गुजरातच्या
विकासाचा भ्रमाचा भोपळा फोडला.
आंबेडकर १२५ वी जयंती महोस्तवानिमित्ताने आणि आंबेडकर भवन प्रकरणानंतर
राष्ट्रवादी आंबेडकर विरुद्ध क्रांतिकारी आंबेडकर,घटनावादी आंबेडकर विरुद्ध घटनाविरोधी आंबेडकर, स्व.मजूर पार्टीवाले आंबेडकर विरुद्ध शे. कास्ट फेडरेशनवाले
आंबेडकर आणि सरकारी आंबेडकर विरुद्ध सरकारविरोधी आंबेडकर अशाप्रकारे चळवळीच्या
क्षेत्रात आणि अभ्यासाच्या क्षेत्रात मांडणी माघील वर्षभरात झालेली दिसत आहे. यातून चळवळ आणि अभ्यास
क्षेत्रात विचार, वर्तवणूक आणि व्यवहार
याच्या पातळीवर वैचारिक कोंडी झालेली दिसते. अशा काळात हरिती प्रकाशनाने “दलित चळवळ आकलनाच्या
दिशेने” हे पुस्तक प्रकाशित करून
योग्य वेळ साधला आहे.प्रकाश सिरसट यांनी आपल्या पुस्तकात संबधित कोंडी का आणि कशी होती याची
सविस्तर मांडणी केली आहे आणि ती कोंडी कशी फुटू शकते याचाही ओझरता आणि अस्पष्टपणे
उल्लेख त्यांनी केला आहे. पुस्तकाची प्रस्तावना डॉ. अविनाश डोळस यांच्यासारख्या अभ्यासकाने
लिहिल्यामुळे प्रस्तावनेचे एक वेगलेचे महत्व आहे. प्रकाश सिरसाट यांच्यापेक्षा चळवळीत आणि अभ्यासाच्या
क्षेत्रात अनुभवी असल्यामुळे सिरसटांनी जे काही चळवळीच्या दृष्टीने महत्वाचे
असलेले दुवे होते ते अविनाश डोळस यांनी प्रस्तावनेत घेतल्यामुळे प्रकाश सिरसाट
यांच्या पुस्तकातील मांडणीला अजूनच जोरधार आणि विश्वसनीय आधार मिळाल्यामुळे सिरसट
यांचे हे पुस्तक दलित चळवळीच्या अभ्यासात अनन्यसाधारण महत्व प्राप्त करत आहे. चळवळीत सक्रीय सहभागी
असल्यामुळे सिरसटांनी आपले अनुभव मांडले आहे परंतू अनुभव मांडण्याची त्यांची पद्धत
ही साध्या कार्यकर्त्याची नाहीये तर अकादेमिक अभ्यासकाची आहे. यामुळेच डोळसांनी आपल्या प्रस्तावनेत म्हटले
आहे कि, “विचार-चिंतन-मनन याबरोबर प्रत्यक्ष
चळवळीतील त्यांचा सहभाग हे त्यांचे विशेष नोंद घेण्यासारखे आहे. चळवळीत आयुष्य दिलेल्या
कार्यकर्त्याने चळवळीसंबंधी एखादे भाष्य करणे हे अधिक महत्वाचे असते. अशा भाष्याला व चिंतनाला
अनुभवाचा संदर्भ सतत असतो. त्यामुळे केवळ विचार मांडणाऱ्या
विचारवंतापेक्षा व अभ्यासकापेक्षा अशा कार्यकर्त्याने चिंतन मांडले तर ते
चळवळीच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे ठरते.” आंबेडकरोत्तर दलित चळवळीचा आढावा सदरील
लेखकाने आपल्या पुस्तकात घेतला आहे. आंबेडकरोत्तर दलित चळवळीवर अनेकांनी लिहिले
आहे. परंतू स्वतः आंबेडकरोत्तर
दलित चळवळीचा भाग असलेले आणि दलित चळवळीत एक ‘व्यापक’ भुमिका घेत अस्मिता आणि भौतिकता यांचा
संसाधानाशी संबंध लावणारे कार्यकर्ते लेखक माझ्या माहितीस्तव पहिले असण्याची
शक्यता आहे. पुस्तकात एकूण सात प्रकरण
आहेत. आंबेडकरोत्तर दलित
चळवळीतील महत्वाचे टप्पे असलेल्या घटनांवर सिरसटांनी स्वतंत्र प्रकरण केले आहे
त्यामुळे त्या विषयाला न्याय देण्यात ते यशस्वी झालेले आहेत.
रिपब्लिकन पक्ष: भरारी आणि विघटन या पहिल्या प्रकरणाची सुरुवातच
“६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीत बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्या बरोबरच त्यांच्या
अवहेलनेला सुरुवात झाली” अशा वाक्याने करून प्रकाश सिरसाट वाचकांना धक्का देतात आणि आपल्या मांडणीचे
वेगळेपण सिद्ध करतात त्यामुळे वाचक वाचतांना चौकस होवून वाचायला लागतो. या सर्व प्रकरणात
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण झाल्यापासून ते कसेल त्याची जमीन, नसेल त्याची काय? या दादासाहेब
गायकवाडांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या आंदोलनापर्यंत झालेल्या घडामोडींचा
धावता परंतू चिकित्सक आढावा घेतला आहे. बाबासाहेबांचा अंत्यविधी कोठे करायचा? बाबासाहेबांचे शव कसे
आणायचे आणि मुंबईत आणल्यानंतर कुठे अंत्यविधी करायचा यावरून आंबेडकरी अनुयांयमधील
राजकारण, सरकारची उदासीनता आणि महानगर
पालिकेची मुजोरशाही या सगळ्या गोष्टी कश्या घडल्या याचे चांगले वर्णन डॉ. सिरसाट यांनी केले आहे. पण त्याचवेळी रेडीओ
इजिनिअर भोसलेंचा संदर्भ देवून बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचे एक
वेगळेपणसुद्धा दाखविले आहे. बाबासाहेबांच्या अकाली जान्याने अनेक गोष्टींचे
संदर्भच बदलले आपणास दिसतात. धर्मांतराचे कार्यक्रम, नवीन राजकीय पक्ष स्थापण्यासाठी केलेली चर्चा
यामध्ये अनेक पातळींवर बदल आपणास झालेले दिसतात. बाबासाहेबांनंतर नेतृत्वाचा कस लागणार होता. परंतू कोणाला
बाबासाहेबंनंतर कोणाला एकाला नेता मानायला कोणीच तयार दिसत नव्हते म्हणून
रिवाजाप्रमाणे ८ तारखेला अस्थी गोळा करायला जायला पाहिजे होते परंतू पुढारी मोर्चे
बांधणीत अडकल्यामुळे तिकडे कोणीच फिरकले नाही. ही घटना नोंदवून सिरसाट यांनी तेंव्हा
पुढारयांमध्ये किती त्रीव पातळीवर स्पर्धा चालू असेल कि ज्यामुळे त्यांना
बाबासाहेबांच्या अस्थींच्या कार्यक्रमाचा विसर पडतो याचे चित्र आपल्यासमोर उभे
केले आहे. बाबासाहेबांच्या नंतर
त्यांच्या अनुयायांपुढील मार्ग किती खडतर होता हे त्यांनी केंद्र
सरकारच्यामाध्यमातून राजकीय पक्ष आणि राज्यसंस्था आणि पी.आर. नायकांच्या माध्यमातून नोकरशाहीतील जातीवर्चस्व
स्पष्ट झाले होते परंतू मोर्चेबांधणीत अडकलेल्या पुढार्यांना याचे काहीही देणे
घेणे दिसत नाही.त्याचकाळी याचा
गांभीर्याने विचार केला असता तर आज २०१६ मध्ये राज्यसंस्था आणि नोकरशाही संदर्भात
एक ठोस विश्लेषण आणि भुमिका दलित चळवळीकडे राहिली असती असे आज नवउदारमतवादी
राज्यात म्हणावे लागते.
अध्यक्षपदावरून काढून टाकले म्हणून बाबासाहेबांच्या श्रद्धांजली सभेला गैरहजर
राहणाऱ्या एन.शिवराज सारखे लोक पुढे जर
रिपब्लिकन पक्ष चालवणार असतील तर त्याचे काय व्यायचे ते होणारच होते. आज आपण त्याच प्रकारे
रिपब्लिकनची वाताहत झाली हे पाहताच आहोत. रिपब्लिकन पक्षाच्या निर्मितीची मागे
बाबासाहेबांचा हेतू आणि बाबासाहेब गेल्यानंतर निर्माण झालेला रिपब्लीकन पक्ष
यामध्ये बराच मुलभूत फरक आहे. तो मुलभूत फरक न समजल्यामुळेच पुढील काळात
रिपब्लीकनची वाताहत झाली. पक्षाची स्थापना होवून एका वर्षातच आताच
दुरुस्त आणि नादुरुस्त अश्या दोन गटात पक्षाची विभागणी झाली त्याच दिवशी
बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपब्लीकन पक्ष संपला होता. गटातटाच्या राजकारणातून ज्या प्रकारचे
वैयक्तिक पातळींवर आरोप करण्यात आलेत, ज्या प्रकारचा विरोधाला विरोध करण्यात आला. ज्या प्रकारचे वर्तन
करण्यात आले त्यातून पहिल्यांदा दलित चळवळीच्या विचार,व्यवहार आणि वर्तनाला धक्का बसला.
रोहित वेमुला आणि उना आंदोलनाच्या निमितान्ने
देशभरात दलित आंदोलन उभे राहत असतांना पुन्हा “शुद्ध” आंबेडकरवादाच्या नावाखाली मार्क्सवाद विरोध
केला जात आहे. आणि आंबेडकरवाद म्हणजे
बौद्धवाद याची चर्चा उभी राहत आहे. ह्या चर्चेचे मुळ दादासाहेब गायकवाड
विरुद्ध बी.सी,कांबळे या दुरुस्त आणि नादुरुस्त या वादात आहे. शिक्षित आणि अशिक्षित हा
सुद्धा यावादाचा एक संदर्भ आहे. बाबासाहेबांचाच वैचारिक वारसा दोन्ही गट चालवत
होते परंतू कुठे विरोध आणि कुठे समर्थन करायचे याचे व्यवहार भाण सुटल्यामुळे
दोन्ही गटांचे संबंध शत्रुभावी होत गेलेत. बाबासाहेबांचा व्यवहारवाद आणि विचार स्पष्ट
असल्यामुळेच महाडच्या अस्मितेच्या प्रश्नासोबत चरीला अस्तित्वाचा प्रश्न घेवून
लढतात आणि पुढे त्यातून खोती विरोधी आंदोलन उभे करतात. यातून विशिष्ट आणि सामान्य या द्वंद्वात
बाबासाहेब अडकत नाहीत. दादासाहेब गायकवाड यांच्या मुकाबल्यात आपले
पक्षावर वर्चस्व निर्माण होणार नाही म्हणून बी.सी.कांबळे यांनी तांत्रिक चुका काढून...स्वतःचा वेगळा गट काढला
आणि स्वतःला अखिल नेत्याचा दर्जा दिला असे सिरसाट म्हणतात. त्यात तथ्य आहे कारण बाबसाहेब असतांना झालेल्या
जनआंदोलनात दादासाहेब गायकवाड यांचा मोठा वाटा राहिला आहे. गायकवाड आणि कांबळे याच्यानिमित्ताने आर्थिक
विरुद्ध सांस्कृतिक, शिक्षित विरुद्ध अशिक्षित, मार्क्सवाद विरुद्ध बौद्धवाद हे जे वाद
त्याकाळात निर्माण झाले त्यावर अधिक विस्ताराने लिहिणे गरजेचे होते.एकमेकाला खेचण्यात दलित
पुढारी कसलीच संधी सोडत नाही हे १९५९ च्या निवडनुकांपासूनच स्पष्ट झालेले दिसते. खोब्रागडेंना तिकीट
दिल्यामुळे आवळेबाबू नाराज होवून अपक्ष लढले मतांची विभागणी होवून दोन्ही हरले आणि
कॉंग्रेसचे उमेदवार जिंकले. यातून आजही दलीत चळवळीने धडा शिकण्यासारखा आहे. अशा चुका सगळ्यांच दलित
पुढाऱ्यांनी केल्या त्याला कोणीच अपवाद नव्हते.
बाबसाहेबांच्या आठवणी ताज्याच होत्या त्यामुळे सुरुवातीला बाबासाहेबांच्या
जयंती निमित्ताने सार्वजनिक सुट्टी, बाबासाहेबांचे स्मारक अशा भावनिक मुद्द्यांवर
पक्षाने आंदोलन करायला सुरुवात केली परंतू पक्षाचे २ गट झाल्यामुळे या आंदोलनातही
श्रेयासाठी लढाईला सुरुवात झालेली दिसते. म्हणजे आम्हाला जर श्रेय मिळत नसेल तर आम्ही
विरोध करणार या धोरणाने विधिमंडळात सार्वजनिक सुट्टीच्या ठरवला कांबळे गटाच्या ए.जी.पवार या आमदाराने विरोध दर्शविला. यातून दलीत चळवळीतील
गटातटाचे राजकारण स्वतच्या हिताच्या विरोधात कसे उभे राहते याची कल्पना येते. या प्रकारचे एकमेकांना
काटशह देण्याचे राजकारण जरी केले जात असले तरी त्याचकाळी आंबेडकरोत्तर दलित चळवळीत
सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा भूमिहीन शेतमजुरांचा लढाही दादासाहेब गायकवाडांनी
सुरु करून आपले नेतृत्व सिद्ध केले म्हणून भूमिहीनाचा लढा हा महाडचा सह्याग्रह आणि
काळाराम मंदिराचा सत्याग्रह याचा पुढचा टप्पा होता. कारण त्याचा संबंध केवळ अस्पृश्यांशी नव्हता तर
जातीनिरपेक्ष समस्त भूमिहीनांशी होता असे खूपच महत्वाचे निरीक्षण सिरसाट नोंदवतात.
बाबासाहेबांच्या चळवळीचा केंद्रबिंदू जातीअंत होता परंतू संसदीय
राजकारणाच्या डावपेचात जातीअंतक चळवळ मागे पडलेली दिसते आणि निवडणुकांचे राजकारण
महत्वाचे झालेले होते अश्यावेळी दादासाहेब गायकवाडांनी बाबासाहेबांच्या इशाऱ्याकडे कानाडोळा करून
कॉंग्रेसशी युती केली.यातून निवडणुकांचे राजकारण हाच चळवळीचा गाभा आहे असे मानणारा वर्ग त्यातून
उदयास आला आणि “शासनकर्ती जमात” होण्याच्या एकमेव
ध्येयाने काम करू लागला. दुसरे म्हणजे तडजोडीच्या राजकारणाचा अपरिहार्य
परिणाम म्हणून त्यांच्या संघर्षाचा जोर ओसरला अशी टीका दादासाहेब आणि कॉंग्रेस
युतीवर सिरसाट करतात. त्यांची टीका अनेकार्थाने महत्वाची आहे परंतू
त्याकाळात दलित चळवळीची सामाजिक-आर्थिक परिस्थिती पाहता फक्त संघर्ष करत राहणे
चळवळीला शक्य होते का? हा पहिला प्रश्न निर्माण होता आणि दुसरा म्हणजे
यशवंतराव चव्हाण यांनी ज्या पद्धतीने ब्राह्मणेत्तर चळवळ, शेतकरी कामगार पक्ष कधी जातीचे राजकारण करून, तर कधी बहुजनवादी राजकारण
करून संपविले त्याला काळात दलित चळवळीला त्यापासून अलिप्त राहण्याची किती शक्यता
होती. हे सुद्धा आपण तपासून
पहिले पाहिजे असे मला वाटते.
दलित पँथर:आशेचा किरण आणि भ्रमनिरास
या शीर्षकात सिरसट खूप काही सांगून जातात. निवडणुकांच्या राजकारणात गुंतल्याने नव शिक्षित
दलित तरुणांना रिपब्लीकन पक्षाची मरगळ जाणवत होती. सोबतच जगभर विद्यार्थी चळवळींची शिक्षणामुळे
विद्यार्थ्यांना ओळख झाली यातून युवक आघाडी,रिपब्लीकन विद्यार्थी फेडरेशन यासारख्या
विदयार्थी संघटना जन्माला आल्या. सोबतच दलितांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने
बेकारीच्या आणि बेरोजगारीच्या प्रश्नालासुद्धा दलित विद्यार्थ्यांना सामोरे जावे
लागले. सरकारी क्षेत्रात आरक्षण
पूर्ण भरले जात नव्हते आणि आरक्षणातून नोकरी लागलेल्या तरुणांना सरकारचे जावाई
म्हणून हिणवले जात होते. याचकाळात जागतिक महामंदी उद्भवली आणि भारतात
सरकारचे पंचवार्षिक योजना सपशेल फसली यातून मोठ्याप्रमाणात रोजगारांच्या संधींवर
गडांतर आले. स्वतंत्राने दाखवलेले
स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असे चित्र दिसू लागले त्यामुळे पुन्हा नव्याने
स्वप्न पाहणारी तरुण पिढी निर्माण झाली. कुठे नक्षलवादी चळवळ तर कुठे काळ्यांची चळवळ
उभी राहू लागली याच पार्श्वभूमीवर दलित पँथरचा उदय झाला. दलित पँथरच्या उदयाला जागतिक आणि स्थानिक
बदलणाऱ्या अर्थ-राजकारणात बसून चर्चेची
मोठी रेषा सिरसट यांनी ओढली आहे. ७० दशक येईपर्यंत महाराष्ट्रात एक वेगळेच
चित्र निर्माण झाले होते. जमीनदारी निर्मुलन कायदा,सहकार क्षेत्र भरभराट, हरित क्रांती यामुळे महाराष्ट्राचे अर्थ-राजकारण बदलेले दिसते. याच काळात १९६५ ला
अश्पृशता, अनुसूचित जातींचा आर्थिक-आणि शैक्षणिक विकास
अभ्यासण्यासाठी पेरूमल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची गठीत झाली. १९६९ साली या समितीचा
अहवाल आल्यावर दलितांची देशातील वास्तव स्थिती कळली. घटनेत अस्पृशता बंदी असतांनाही अस्पृशता पाळली
जात होती. जमीनदारांनी कित्येक
दलितांचे बळी घेतले होते. या सर्व गोष्टींचा अभ्यास नवशिक्षित दलित
तरुणांनी केला. त्याचकाळात परभणी आणि
इंदापूर येथील दलितांच्या अत्याचाराच्या विरोध करण्यासाठी दलित पँथरचा जन्म झाला.
पँथरचे आम्हीच जन्मदाते आहोत असे सांगणारे अनेक लोक आहेत. अनेकांनी तयार लिहिले आहे. ढाले-ढसाळ नावाने तो वाद
प्रसिद्ध आहे. मला त्यावादात न जाता आणि
कोणाचीही बाजू न घेता दलित पँथरने ऐतिहासिक काम केले आहे त्यामुळे त्याचे महत्व
वाटते. रौप्य महोत्सवी
स्वातंत्रदिन, साधना प्रकरण, शंकराचार्याला चप्पल
मारणे अश्या अनेक गोष्टीत पँथरअग्रेसर होता. पँथरच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी अनेकांच्या
मनात कुतूहल असल्यामुळे अनेकांनी त्याविषयी वाचलेले असते. भावनिक मुद्यासोबत वाढत्या बेकारीविरुद्ध
मोर्चा सुद्धा पँथरने काढला परंतू निवडणुकींच्या राजकारणाला कसे सामोरे जायचे हा
महत्वाचा प्रश्न असतो. “जनाधार असलेल्या कोणत्याही संघटनेपुढे काही
काळानंतर एक प्रश्न उभा ठाकतो तो निवडणुकींच्या राजकारणासंबंधी भुमिका घेण्याचा” पँथरच्या निमितान्ने
सिरसट अत्यंत महत्वाच्या मुद्याला जावून भिडले आहे. अनेक गैरसंसदीय चळवळीची यात कोंडी झाली आहे. यामुळे अनेक चळवळी
संपल्या आहेत आणि काही फुटल्या आहेत तरीही यावर अजूनही अनेकांची गोची होते. तीच गोची मुंबईच्या
महानगर पालिकेच्या निवडणुकांच्यावेळी पँथरची झाली. चळवळ,संसदीय राजकारण आणि निवणुका यांचे खूप महत्वाचे
निरीक्षण पुस्तकात नोंदवण्यात आले आहे.ग्रामीण भागात दलितांवर अत्याचार होत
असल्यामुळे मोठ्या संख्येने जावून अत्याचार करणाऱ्या लोकांनावर पँथरने जरब बसविला
होता. परंतू प्रारंभी यशस्वी
झालेली ही पद्धत नंतरच्या काळात कमी कमी होत गेली.या संदर्भात महत्वाचे निरीक्षण सिरसाट नोंदवतात
ते म्हणजे, ग्रामीण भागात दलितांवर
अत्याचार झाल्यावर शहरातील कार्यकर्ते एकदा सगळे मिळून जात होते परंतू हे नेहमी
शक्य होत नव्हते, वेळ,साधने आणि कार्यकर्त्यांचे एकत्र येणे हे नेहमी
शक्य होत नसे. दुसरे म्हणजे नंतरच्या
काळात अनेक लोक पँथरच्या लोकप्रियतेवर स्वर होवून आलेत. त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा आणि तत्वांचा अभाव
दिसू लागला.
जाहीरनामा हे प्रकरण दलित पँथरच्या चळवळीत खूपच गाजले आहे.त्यातून संघटना फुटली
म्हणजे जाहीरनामा हे प्रकरण खूपच महत्वाचे असणार आहे. जाहीरनाम्याच्या निमितान्ने संघटनेत निर्माण
झालेल्या मतभेदाची जाहीर वाच्यता झाली त्यातून संबंध दुरावत गेलेत. यावर “संघटनेच्या नेतृत्वात
ताळमेळ निर्माण करणारी यंत्रणा किंवा नियमावली अस्तित्वात नसल्याचे हे द्योतक आहे. यामुळे कळणे टोक गाठले” अशी मार्मिक भाष्य सिरसाट
करतात. आजच्या अनेक संघटनांना आपसातील
मतभेद, व्यूहरचना भेद कसे
मिटवायचे यासाठी हे निरीक्षण खूपच महत्वाचे आहे. नेतृत्वाचा संघर्ष भूमिकेंच्या निमित्ताने
उफाळून आला.एकमेकांवर कुरघोडी करून
संघटनेवर आपले प्रभुत्व स्थापित करण्यासाठी या घटनेचा वापर करण्यात आला असावा असे
त्यातून जाणवते असे म्हणत सिरसट पँथरफुटीमध्ये वैचारिक संघर्षापेक्षा नेतृत्वाची
स्पर्धा हेच कारण असण्याची शक्यता वर्तवतात.यानिमितान्ने पुन्हा शुद्ध आंबेडकरवाद आणि
मार्क्सवादविरोध करण्यात आला. दादासाहेब गायकवाड आणि बी.सी.कांबळे यांच्या वादातही मार्क्सवादाच्या नादी
लागल्याचा आरोप करण्यात आला होता. ढसाळयांच्यावर मार्क्सवादी असल्याचा आरोप
करण्यात आला. त्याकाळात मुंबईत
प्रगतीशील विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून नक्षलवादी चळवळीचे लोकही कृतीशील
असलेले दिसतात. ढसाळांचे मित्र सुनील
दिघे हे त्यांचे प्रमुख होते. त्यामुळे ढसाळांचे संबंध असतीलही पण पँथरमधील
लोकांना हे आधी माहित नव्हते यावर विश्वास बसने अवघड आहे.त्यामुळे नेतृत्वाचीच स्पर्धा फुटीत महत्वाचे
कारण ठरते.
दलित
पँथरच्या विचारात स्पष्टता नव्हती त्यामुळे संसदीय राजकारणाने दलितांचे प्रश्न
सुटत नाहीत मग कोणत्या मार्गांनी काम करावे या संदर्भात ठोस भुमिका पँथरची नव्हती
असे इतर अभ्यासकांचा आधार घेवून सिरसाट आपणास सांगतात.पँथरकडे मोठ्याप्रमाणात तरुणांची फौज होती परंतू
त्या समूहाला प्रशिक्षित करण्यासाठी वेळ आणि मनुष्यबळ या दोन्ही गोष्टींचा तुटवडा
होता असे ज.वी.पवार म्हणतात. एकमेकांच्या भूमिकांना आव्हान देण्यासाठी
पुस्तिका काढण्यात आल्या त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आणि वाद उद्भवले. या सर्व चळवळीत तरुणांना
संघटीत करून ठेवण्यात आणि वैचारिक दिशा देण्यात पँथरचे नेतृत्व कमी पडले असे
म्हणता येईल कारण त्यांच्यामधेच वैचारिक स्पष्टता नव्हती हे दिसते. ( दलित चळवळ आकलनाच्या दिशेने..., हरिती
प्रकाशन, पुणे उर्वरित भागाचे परीक्षण क्रमश:)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा