स्त्रीवाद: काही निरीक्षण,काही चिंतन!
कधी कधी आपण मानत
असलेल्या विचारधारांचा खूपच संकुचित अर्थ लावला तर आपण स्त्रीवादी व
कोणताही वादी असतांना 'माणुसकीला' मुकतो की काय असे वाटते. वैचारिक मोकळेपणा
कमी झाल्याने आणि कोरडेपणा वाढल्याने हल्ली तर ह्या गोष्टी खूपच जोरधारपणे
होतांना दिसत आहे. त्यामुळे सरसकटीकरण, गैरसमज, द्वेष आणि तिरस्कार झपाट्याने वाढत आहे. एकमेकांना समजून घेत आणि समृद्ध करून ‘माणूस’ होण्याचा मार्गच
आंकुचित होतोय कि काय असाच प्रश्न निर्माण झाला आहे. माझ्यासारख्या ग्रामीण
भागातून शहरात आलेल्या आणि आर्थिक-सामाजिक
परिघावरून आलेल्या आणि स्त्रियांविषयी अनेक भ्रामक कल्पना, भ्रम आणि गैरसमजूती
असलेल्या मुलाला (पुरुषाला) खऱ्या अर्थाने 'माणूस' होण्याची प्रेरणा
स्त्रीवादाने दिली. पुरुषी अहंगंडला प्रश्नांकित करत पुरुषत्वाच्या ओझ्याखाली
दबलेला ‘माणूस’ शोधण्याचे काम स्त्रीवादाने केले. हे स्त्रीवादाचे
योगदान आहे म्हणून स्त्रीवाद हा तर स्त्री-पुरुषांना 'माणूस' बनवणारी विचारधारा
आहे असे मला वाटते.
सध्या किंवा
स्त्रीवादाच्या जन्मापासूनच म्हणा हवे तर. स्त्रीवाद हा understood पेक्षा misunderstood च अधिक आहे त्यामुळे अनेक
घोळ झाले आहेत आणि होत आहेत. बहुजिनसी समाजाचे अनुभवविश्व उभ्या
आडव्या सत्तासंबंधांनी बनलेले असल्यामुळे अनेकांनी त्यानुसार
स्त्रीवादाचा अर्थ लावला आहे आणि त्यातूनच गोरा स्त्रीवाद, काळा स्त्रीवाद, ब्राह्मणी
स्त्रीवाद, दलित स्त्रीवाद, बहुजन स्त्रीवाद, पाश्चिमात्य
स्त्रीवाद , पौर्वात्य स्त्रीवाद असे प्रवाह जन्माला आले आहेत. सुरुवातीचे
स्त्रीवादाचे समाजशास्त्र पाहिले तरी त्यात कोणाला स्थान नव्हते हे सहजच
कळून येईल. हे कधी कळत झाले तर कधी नकळत झाले म्हणून स्त्रीवादाला संकुचीततेची लेबलं लावावी
असे मला वाटत नाही. स्त्रीवाद खाजगी हे राजकीय असे म्हणतो, त्यावेळी स्थानिक ते वैश्विक अशा
सगळ्याच राजकारणाविषयी बोलतो असे अभिप्रेत आहे. ज्या- ज्या
सामाजिक-भौतिक पार्श्वभूमीतून स्त्रीवादी स्त्री-पुरुष
येतात त्या पार्श्वभूमीचा त्यांच्यावर कळत नकळत प्रभाव पडतो जातो
मग त्यातून कशाला प्राधान्य द्यावे आणि कशाला देवू नये याची चर्चा सुद्धा
घडून येते. कधी कधी अशा चर्चाच कोणाला स्त्रीवादी म्हणावे आणि कोणाला
म्हणू नये हे सुद्धा ठरवतात. बर्याचवेळा एकीकडे संपूर्ण
आयुष्य नकळत स्त्रीवादी विचारांनी आणि तत्वज्ञानांनी जगलेले
स्त्री-पुरुष स्वतःला कधीही स्त्रीवादी म्हणून घेत नाही तर दुसरीकडे
स्त्रीवादाचा अर्थ न समजून घेताही स्त्रीवादी असल्याचे भांडवल करत जगणारे लोक आहेत.
स्त्रीवादाचे सुद्धा स्त्रियांवर ओझे
नको, मी जीन्स घालते, आधुनिक आहे पण
स्त्रीवादी नाही असे एकीकडे म्हटले जात आहे आणि त्याचवेळी समाजात
अजूनही स्त्री जन्म नाकारला जातोय, स्त्रियांवर पूर्ण
कपडे असतांना आणि अर्धे कपडे असतांना बलात्कार केला जातोय. आजही
सगळ्यात जास्त कुटुंबातीलच पुरुषांकडून लहान मुलींवर अत्याचार होत
आहेत. अशा परस्पर विरोधी
वास्तवाच्या अनेक काळांत (स्त्रियांना भोगवस्तू मानणारा प्राचीन काळ आणि
स्त्रियांना व्यक्ती, माणूस मानणारा आधुनिक काळ) आपण जगत
आहोत. स्त्रीवाद हा विकसित होत आला आहे त्यामुळे स्त्रीवादी चर्चेत
वर्ग, जात, धर्म, वंश, राष्ट्रीयता, पर्यावरण या मुद्द्यांना घेवून
घमासाम चर्चा सुद्धा झाली आहे आणि त्या चर्चेने स्त्रीवादाला
मुळासकट विकसित केले आहे त्यामुळे हल्ली स्त्रीवादाचे नाव घेवून
स्त्रीवादालाच बदनाम करणारे लोक खरंच स्त्रीवादी आहेत का ? हे सुद्धा आपण तपासून पाहू
शकतो कारण हल्ली सोई सोईने स्त्रीवादी होण्याचा, गरजेपुरते स्त्रीवादी
होण्याचे पेव सुटले आहे तसेच उठसूट स्त्रीवादाला पाश्चिमात्य अनुकरण,
संस्कृतीविरोधी म्हणण्याचेही पेव सुटले आहे. भांडवलशाहीने स्त्रियांच्या केलेल्या
मादीकरणाकडे आणि वस्तूकरणाकडे काना डोळा करत काही लोक भांडवलशाहीच ‘स्त्रीमुक्ती’
करू शकते असे म्हणत असतात तर आधुनिकीकरणामुळे आणि पाश्चिमात्यकरणामुळेच स्त्रिया
असुरक्षित झाल्या आहेत त्यामुळे धर्म संस्कृतीचे पालन केल्याने स्त्रियांचे प्रश्न
सुटतील असे म्हणत काही लोक धर्म- संस्कृतीच्या क्षेत्रात स्त्रियांना भोगवस्तू,
कलंकित, अशुभ म्हणून का पहिले होते याचे उत्तर देणे टाळतात.
स्त्रीवादाला चूक की बरोबर किंवा काळे
कि पांढरे या तर्कानुसार समजून घेता येत नाही. वैश्विक आणि स्थानिक समाज हा
बहुजिनसीसमाज आहे. त्याच्यामध्ये वर्ग, वंश, धर्म, जात, राष्ट्रीयता आणि लैंगिकता
यासारख्या वैविध्यांनी निर्माण केलेले भेद आहेत आणि त्यातून ‘स्त्रीप्रश्न’ नेहमी
‘घडत’ आणि ‘पुनर्घडत’ असतो. त्यामुळे त्यातील व्यामिश्रता, गुंतागुंत, वैश्विकता
आणि स्थानिकता समजून घेतल्याशिवाय हा प्रश्न समजणे खूपच अवघड आहे. तोंडपाठ, पाठांतर किंवा कंठस्थ करण्यासाठी
स्त्रीवाद हा नुसता विचार नाही तर हिंसेला, द्वेषाला, तिरस्काराला आणि
सरसकटीकरणला नाकारत नवा माणूस घडवण्याचा व्यवहार आहे म्हणून
विचारांसोबत व्यवहार खूपच महत्वाचा ठरतो.
देवकुमार अहिरे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
devkumarahire@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा