सोमवार, २२ जून, २०२०

'साचेबद्ध प्रतिमा' आणि 'झापडबंद दृष्टी'


१) माझ्या एका कश्मिरी मुस्लिम मित्राला सांगलीतील एका मराठी मुस्लिम मित्राच्या घरी घेवून गेलो होतो. सांगलीतील मित्राचे भावाचे लग्न होते. कश्मिरी मुस्लिम मित्राला विश्वासच बसत नव्हता की, हे मुस्लीमांचे लग्न आहे.

२) पुण्यात आमच्या एका देशस्थ ब्राह्मण मित्राचे आंतरजातीय लग्न होते. त्यात नवरदेव असलेल्या आमच्या मित्राचे आई-वडील आणि नातेवाईक मराठवाड्यातून आले होते. त्याच लग्नात आमचा नवबौध्द मित्रही होता. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला की, अरे यार! ही मंडळी ब्राह्मण वाटत नाही. ते आपल्या सारखेच दिसत आहेत.

३) पुण्यात माझा एक मित्र मला म्हणाला की, ती बौध्द नसेल कारण, एवढे काळे लोक बौद्ध नसतात. औरंगाबादमध्येही माझ्या सोबत शिकणारा माझा मराठा मित्र, आमच्या वर्गातील एक अत्यंत सुंदर असलेली मुलगी बौध्द आहे हे ऐकतच नव्हता. तसेच, दुसरीच्या आडनावावरूनच त्याने मराठाच आहे असे ठरवून ठाकले होते.

४) महाराष्ट्रात एका सुन्नी जेष्ठ मित्रवर्याच्या घरी गेलो होतो. त्यावेळी, आमच्या अहमदीया जेष्ठ मित्रांविषयी सुन्नी मित्र म्हणाले की,.... वह बहोत अच्छा इंसान है लेकीन, मुसलमान नही है.

५) जापनीजच्या वर्गात एक ब्राह्मण आजीबाई होत्या. जापनीज सून आणि अमेरिकेत जवाई असलेल्या आजीबाई चर्चेत म्हणाल्या की, 'त्यांच्या' रक्तातच हिंसा असते. मी म्हणालो की, रक्तात हिमोग्लोबिन असते. हिंसा असते असा काही अभ्यास झाला आहे का? त्यावर म्हणाल्या की, त्यांच्यात माझे मित्र आहेत.

६) जम्मूत एका डोग्रा मित्राकडे थांबलो होतो. कश्मिरी पंडीत सगळ्यात जास्त कारस्थानी आहेत असे तो म्हणाला. त्याआधीच, त्याने मला भांडवलशाहीमुळे संपूर्ण पर्यावरण आणि मानवता धोक्यात येईल असे सांगितले होते.

७) कश्मिर व्हैलीत जात असतांना शिक्षक असलेला शेख मित्र म्हणाला की, आमच्या पुर्वजांनी सांगितले आहे की, साप, शेर से पहले बकरवाल को मारना चाहिए. मग, मी म्हणालो की, बकरवाल भी तो मुस्लीम है ना.

          अशा अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. आपल्या समाजात आपल्यापेक्षा वेगळ्या असलेल्या लोकांची, समुहांची, जातीची, धर्माची 'साचेबध्द प्रतिमा' निर्माण केली जाते. त्यातून भय, द्वेष, तिरस्कार सगळं सहज जन्माला घालता येवू शकते कारण, आपल्याला आपल्या कंपूच्या पलीकडे काही दिसत नाही. आपली दृष्टीसुद्धा झापडबंद असते. झापडे तोडली तर साचेबद्ध प्रतिमेला तडा बसू शकतो.

सोमवार, १५ जून, २०२०

ज्ञानशाखा आणि लोकशाहीकरण!



ज्ञान आणि कौशल्ये यांना सोईस्करपणे वेगवेगळे केले गेल्यामुळे ज्ञाननिर्मितीच्या क्षेत्रातून अनेकांना वगळले गेले असा आपला दिर्घकालीन इतिहास आहे. त्यामुळे ज्ञानावर 'विशिष्टां'ची मक्तेदारी बनते आणि 'सामान्यजन' त्यापासून वेगळे पडतात किंबहुना पाडले जात. उदा. कुणब्यांनी रुमणे धरणे हेच त्याचे वर्तुळ बनते. आपल्याकडील अलीकडच्या किंवा नजीकच्या इतिहासतही 'सर्वसामान्य' ज्ञानवर्तुळापाशी भटकतही नव्हते. 

काळाच्या ओघात विद्यापीठे, कॉलेज स्थापन झाली त्यातही परंपरेने सांस्कृतिक, कौटुंबिक आणि सामाजिक भांडवल असलेली 'विशिष्ट मंडळी'च विद्यापीठे आणि कॉलेजांत येवू शकली. पुढे, सत्तेच्या गरजेपोटी, बाजाराच्या निकडेपोटी आणि खालून वाढणाऱ्या दबावामुळे विद्यापीठे आणि कॉलेजांतील वातावरण आणि प्रवेशप्रक्रिया थोडी सैल होवून मोकळी झाली. त्यामुळे अनेकांनी प्रवेश मिळवला. 

नव्याने प्रवेशित झालेल्या मंडळींमुळे वेगवेगळ्या समूहांना प्रतिनिधित्व मोजक्या प्रमाणात का होईना पण मिळाले. त्यामुळे काहीसे लोकशाहीकरण झाले असे म्हणता येते. नव्याने आलेली मंडळी आपल्या अनुभवविश्वासोबत आणि आपल्या प्रश्नांसोबत आलेली असल्यामुळे ते प्रश्न विचारु लागतात. जुन्या मान्यतांना प्रश्नांकित करु लागतात. अशावेळी ज्ञानावरील मक्तेदारी असलेली 'विशिष्ट मंडळी'मधील काही मंडळी स्वतःला दुरुस्तकरुन घेतात आणि काही मंडळी जुनाच रेटा लावून धरतात मग, ज्ञानशाखांमध्ये वैचारिक धुमचक्री, घुसळण आणि झगडा सुरू होतो. 

'ज्ञानाची मक्तेदारी' आणि 'सामाजिक धुरिणत्व' ह्यांचा अत्यंत जवळचा संबध असल्यामुळे ह्या 'सांस्कृतिक राजकारणा'चाही संदर्भ असतो. अशावेळी सजगपणे, संवादीपणे पण तेवढ्याच चिकित्सकपणे वादविवाद झाले पाहिजे. नाहीतर वादविवादांची दिशा भरकटते. पारंपरिक मंडळी नव्याने प्रश्न उपस्थित करणाऱ्या मंडळींना काहीवेळा सामाजिक आणि ज्ञानात्मक दंभामुळे क्षुल्लक समजते. त्यांच्यातील ह्या दंभाला मोठ्या सामाजिक-सांस्कृतिक भांडवलाचा आधार असतो. तसेच, नव्याने प्रश्न विचारणारी मंडळी विशिष्टांच्या पारंपरिक मक्तेदारीमुळे नेहमी त्याला कारस्थान स्वरूपात पाहतात. त्यामुळे त्यांचा प्रश्न कितीही महत्वाचा असलातरी पारंपरिक विशिष्टांना तेच कारस्थानी वाटतात. 

आपल्याकडे शैक्षणिक समाजशास्त्राचा म्हणजे विद्यापीठ शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा आणि विषयांचा 'सोशयो-हिस्टॉरीकल अभ्यास' केला तर शिक्षण घेणाऱ्या आणि देणार्या विद्यार्थी - शिक्षकांचे समाजशास्त्र टप्याटप्याने कसे बदलत गेले हे आपण सहज सांगू शकतो. ह्या बदलत्या समाजशास्त्रामुळे विषयांचे आशय, स्वरूप, अभ्यासपध्दती आणि अभ्यासक्रमही बदलले दिसतात. बदलणारे राजकारण आणि अर्थकारण ह्यांचाही ह्या बदलात तेवढाच मोठा सहभाग आहे.


अजूनही काही विषय, काही संस्था ह्या विशिष्टांच्या मुठीत आहेत किंवा विशिष्टच तिकडे मुशाफिरी करता असेही आपण म्हणू शकतो. तिकडे सर्वसामान्य गेल्यामुळे प्रश्न निर्माण होतात. वैचारिक वाद आणि घुसळण होती. तसेही, सामाजिक-सांस्कृतिक धुरिणत्वाला धक्का बसला की, राजकीय रचनेलाही धक्का बसतो. त्यामुळे ह्या क्षेत्रातील वादविवाद महत्वाचे ठरतात. त्यांना अस्मितावादी राजकारणाचा आणि वैचारिक राजकारणाचा (आपल्याकडे जातीय राजकारणाचा ) संदर्भ नेहमी असतोच. 

म्हणून, ज्ञानशाखांचे लोकशाहीकरण झाले पाहिजे. इहवादीकरण झाले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचे सदरील विषयांचे प्रोफेशनल मुल्ये जपली पाहीजे. 

शुक्रवार, १२ जून, २०२०

जंगलमे भालू, सब्जीमें आलू और पॉलिटिक्समें लालू !

जंगलमे भालू, सब्जीमें आलू सौर पॉलिटिक्स मे लालू तो होनाही चाहिये! 

मी तिसरी - चौथीला असेल तेंव्हा माझे एक चुलत चुलत काका भोपाळ वरून आले होते. त्यावेळी चर्चेत त्यांनी वरील गोष्ट सांगितली होती. तेंव्हा पहिल्यांदा माझी लालू यादव यांची ओळख झाली. 

नंतर हळू हळू समज आणि दृष्टी विकसित होत गेल्यावर लालू यादव कसले व्यक्तिमत्व आहे याचा उलगडा झाला. 
लालू यादव यांना बिहार आणि बिहारच्या जाती आणि जमिनीचा इतिहास समजून घेतल्याशिवाय समजून घेता येत नाही. 

लालू यादव सारखा दिल खुल्लास राजकारणी भारतीय राजकारणात विरळाच आहे. त्यामुळेच विनोद, काव्य आणि हास्य ह्या विषयांचा आशय लालू यादव बनू शकले आहेत. अनेकांनी त्यांच्या समोर त्यांची नकल आणी मिमिक्री केली आहे. त्यांच्या खाजगी जीवनावर भाष्य केले आहे. पण, लालूंनी नेहमी कसलेला रसिक म्हणूनच त्याला दाद दिली. आजकाल अनेक राजकरणी मंडळी हास्य, विनोद आणि नकलाकार लोकांना राजकीय विरोधकच समजतात. 

गोरक्षेच्या नावाखाली जमातवादी राजकारण करणाऱ्या गायगुंडापेक्षा लालू यादव जास्त गोपालक आहेत. तसेही, त्यांचा गोपालन हा पिढीजात सामाजिक धंदा आहे. लालूंनी अनेक पत्रकारांना दुध, शेण काढतांना मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे गरिबीतून आताच कोणीतरी मोठे राजकारणी बनले आहे असे नाही. लालूंच्या बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर यांच्या सारखा अत्यंत गरिब घरातील आणि न्हावी समाजातील व्यक्ती मुख्यमंत्री आधीच बनला आहे.

आजकाल, इंग्रजीत फाड फाड बोलणाऱ्या आणि तरीही स्वदेशीचा टेंभा मिरवणाऱ्या लोकांना लालू यादव म्हणजे मागास, जातीवादी आणि खेडवळ भारताचे प्रतीक वाटतात. खरे, तर ही प्रतिमा येथील अभिजनवादी डाव्या- उजव्या मंडळींनी बनवलेली आहे. 

इंग्रजी पत्रकारालाही स्वाभिमानाने भौजपूरीत लालू यादव उत्तर देतात. अस्खलित इंग्रजी येत नाहीत म्हणून त्यांच्यांत कणभरही न्युनभाव नसतो कारण, त्यांना लोहियांच्या भाषिक चिंतनाचे मोल माहिती आहे. सामाजिक न्यायाचे राजकारण करतांना अनेकांनी ज्यावेळी त्यांच्यावर जातीवादाचे आरोप केले त्यावेळी त्यांनी कशी उत्तरे दिली हे खरंच पाहण्यासारखे आहे. ह्या संबंधी अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. 

काही लोक म्हणतात की, लालूंना विकासाचे राजकारण करता आले नाही.  मला वाटते ह्या विषयावर थोडा जास्त खल झालाच पाहिजे. विकास कशाला म्हणायचे इथपासून ते विकास कोणासाठी आणि कसा करायचा इथपर्यंत चर्चा झाली म्हणजे लालूंच्या दृष्टीची चर्चा करता येईल. बाय द वे, २००७-०८ च्या जवळपास लालूंची चर्चा जगभर झाली. हार्वर्ड विद्यापीठातील बिझनेस स्कूलमध्येही त्यांना व्याख्यान देण्यासाठी बोलवण्यात आले होते. भारतीय रेल्वेत सर्वात चांगला रेल्वेमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द सगळ्यात यशस्वी ठरली. 

लालू नंतर रामविलास पासवान, नितीन कुमार, ममता दिली पासून ते आताच्या सर्वपक्षीय रेल्वेमंत्र्यांपैकी कोणालाही लालूंसारखे कामे करता आली नाहीत. स्वतः चा वेगळा ठसा उमवटण्यात यशस्वी होता आले नाही. 

युवक चळवळीत असतांना मुसाहार लोकांसोबत उंदीर खाणारे लालू यादव, सर्वात तरुण मुख्यमंत्री लालू यादव,  सरकारला सगळ्यात मोठा अडथळा वाटणारे लालू यादव आणि सध्या जेलमध्ये असणारे लालू यादव अशी लालू यादवांची अनेक रुपे आणि विश्व आहेत. 

भारतीय राजकारणाचे लोकशाहीकरण करणाऱ्या व्यवहारात लालूंचे मोठे काम आहे. भारतीय राजकारणातील जमातवादाला रस्त्यावर येऊन त्यांनी विरोध केला. हे सगळे खरे असले तरी, व्यवस्थात्मक रचनेतून येणाऱ्या भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि घराणेशाही ह्या आजारांपासून त्यांना स्वतः ला बाजूला ठेवता आलेले नाही. भारतीय राजकारणात भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि घराणेशाही ह्याशिवाय यशस्वी होताच येत नाही. त्यामुळेच, भारतीय राजकारणातील सर्व यशस्वी पुरुषांकडे ( स्त्रिंयाकडे) याशिवाय पाहता येत नाही. 

सगळ्यांवर भ्रष्टाचार, गुन्हेगारी किंवा घराणेशाहीचा आरोप कधींना कधी झालेलाच असतो. हा व्यवस्थात्मक सामाजिक आणि राजकीय प्रश्न आहे. 

सगळे समजून घेतल्यावर लालूंशिवाय भारतीय राजकारणाला मजा नाही असेच म्हणावे लागते. 

( काल लालू यादवांचा वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ! ) 

गुरुवार, ११ जून, २०२०

साने गुरुजी!


मराठी विचारविश्वात सगळ्यात महत्वाच्या काही व्यक्तींपैकी एक व्यक्तीमत्व. 

धर्म, संस्कृती, अस्पृश्यता, जातीभेद, शेतकरी-कामगार, जमातवाद, हिंसा- अहिंसा, स्त्री प्रश्न, समाजवाद अशा सगळ्यात विषयांवर सातत्याने आणि सर्वसामान्य जनतेला समजेल अशा भाषेत गुरुजी लिहित होते. 

अनेक इंग्रजी पुस्तकांची मराठी भाषांतरे केली. अनेकांची चरित्र लिहली. खानदेशात शेतकरी कष्टकरी जनतेचे संघटना बांधली. ग्राम स्वराज्य, जातीभेद निर्मूलन आणि हिंदू-मुस्लिम एकतेला केंद्रस्थानी ठेवून समाजवादाचे स्वप्न पाहणारे साने गुरुजी जमीनदार, भांडवलदार आणि धर्मांध- जमातवाद्यांना नेहमी आपले शत्रू वाटत होते. 

१९३० च्या दशकात साने गुरुजींनी ' कम्युनिझम आणि हिंसा ' संबंधी अत्यंत महत्वाचे दोन लेख.लिहले आहेत. स्वतः आयुष्यभर अहिंसक असलेले साने गुरुजी कम्युनिस्ट हिंसा आणि स्टेट हिंसा ह्यांच्यात फरक करतात. गांधी वर्गसमन्वयक आहेत. त्यावर वर्गसंघर्षवाद्यांनी दबाव टाकत राहीला पाहिजे असेही साने गुरुजी नोंदवतात.

शेतकरी आणि कामगार ही देशाची फुफ्फुसे आहेत. तसेच, प्रत्येक गावात ग्राम स्वराज्य, ग्रंथालय, आरोग्य मंडळ असले पाहिजे. गावात जातीभेद नसावा असेही म्हणतात. अस्पृश्यांसाठी पंढरपूरचे मंदिर खुले करावे ह्यासाठी अनेकांचा विरोध असतांनाही साने गुरुजींनी आंदोलन केली. 

मराठी मातीत साने गुरुजी नावाचा बोधीवृक्ष कसा उगवला हे पाहायला हवे. त्यांची वैचारिक आणि सामाजिक चौकट समजून घेतली पाहिजे. 

गुरुजींचे इंग्रजी आणि मराठी असे चांगले वैचारिक आणि बौद्धिक चरित्र असायला हवे.

शुक्रवार, ५ जून, २०२०

हिंदुत्व चळवळीतील अंतर्विरोध आणि श्रमविभाजन


एकीकडे हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत आहे तर दुसरीकडे हिंदुत्ववादी संस्था संघटना (सनातन संस्था, श्रीशिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान, श्रीराम सेना, हिंदू युवा वाहिनी, बजरंग दल) या समाजात आक्रमक झाल्या आहेत. कुणी गोरक्षणाच्या मुद्द्यावर, कुणी विवेकवादी, बुद्धिवादी लोकांच्या हत्येच्या निमित्ताने तर कोणी मनुस्मृतीच्या समर्थनाने हिंदुत्ववादी पक्षाच्या सरकारला अडचणीत आणत आहेत असे म्हटले जात आहे. त्यामुळेच अधून मधून सत्ताधारी पक्षांकडून त्यांची (आक्रमक आणि हिंसक हिंदुत्ववाद्यांची) कानउघडणी केल्याचे देखावे उभे केले जात आहेत. कारण, पुढील वर्षी २०१९ मध्ये सार्वजनिक निवडणुका आहेत. हिंदुत्व चळवळीच्या आणि विचारांच्या विरोधी लोकांनी हिंदुत्ववादी चळवळीतील अंतर्विरोध, स्तर आणि श्रमविभाजन समजून न घेतल्यामुळे अनेक घोळ झाले आहेत. मग ते गोळवलकरांचे ‘सांस्कृतिक हिंदुत्व’ असो, सावरकरांचे ‘प्रादेशिक हिंदुत्व’ किंवा मग बाळ ठाकरेंचे ‘ब्राह्मणेत्तरी हिंदुत्व’ असो सगळ्यांनाच एक केले जाते. हल्ली, काही लोक हिंदुत्वाला विज्ञानवादी, धर्मनिरपेक्ष व बुद्धिवादी अभिमान्यता मिळवून देण्यासाठी ‘सेक्युलर हिंदुत्व’, ‘बुद्धिवादी हिंदुत्व’ आणि ‘विज्ञाननिष्ठ हिंदुत्व’ अशीसुद्धा चर्चा करीत आहेत. यातील सगळेच कमीअधिक प्रमाणात भाजप समर्थक असतात. सावरकरांविषयी सगळ्यांनाच प्रेम आणि भिडे गुरुजी विषयी आदर वाटणारेच असतात. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदूहितासाठी काम करणारी संघटना आहे असे म्हणणारे असतात. विशिष्ट कार्यपद्धतीच्या आणि काही विचारांच्या बाबतीत हिंदुत्व चळवळीतील संस्था, संघटना आणि पक्ष यांच्यामध्ये काही फरक आणि वेगळेपणा जरी असला तरी उद्दिष्ट्ये आणि हेतू यांच्याबाबतीत बहुतांश साम्यता त्यांच्या व्यवहारात आणि वर्तनात आढळते.

‘भीमा कोरेगावच्या दंगली’त भिडे गुरुजींचा काहीच सहभाग नाही असे सांगण्यासाठी सावरकरवादी हिंदुत्ववाले, संघवादी हिंदुत्ववाले सगळेच जीवाचे रान करतांना आपल्याला दिसले. सोशल मिडीयावर या सर्व गोष्टींचा मुसळदार पाऊस अजूनही पडत आहे. पण, धुळ्यात आणि पुण्यात भिडे गुरुजींनी ‘मनुस्मृतीचे समर्थन’ करताच सावरकरी हिंदुत्ववाले आणि गोळवलकरी हिंदुत्ववाले भिडे गुरुजींच्या ‘मनुस्मृतीच्या प्रतिपादना’चे आम्ही समर्थन करीत नाहीत असे म्हणत सुटले आहेत. गुरुजी हे राष्ट्रीय विचारांचे, धर्म, देश आणि संस्कृती रक्षणाचे काम करतात हे मात्र आम्हाला मान्य आहे असेही हे लोक म्हणतांना दिसतात. महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील बुद्धिवादी, विज्ञानवादी कार्यकर्ते, अभ्यासक आणि पत्रकार यांच्या हत्येचा संबंध सनातन संस्थेशी लावला जात आहे. काही बाबतीत स्पष्ट धारेदोरे सुद्धा सापडले आहेत. सनातन संस्था ही संघ परिवारातील संस्था नसली तरी व्यापक हिंदुत्व परिवारातील संस्था नक्कीच आहे. त्यामुळे सनातन संस्थेविषयी संघाने, भाजपने, शिवसेनेने आणि तथाकथित बुद्धिवादी सावरकरवाद्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली दिसत नाही. सोशल मिडीयावर काही लोकांनी तात्पुरता विरोध केलेला दिसतो त्याचा तेवढा अपवाद म्हणावा लागेल.

हिंदुत्व चळवळीतील अनेक लोक सोई सोईसाठी अनेक गोष्टींचा वापर करतात. बुद्धिवाद, राष्ट्रवाद, विज्ञानवाद, उदारमतवाद, लोकशाही, मानवी हक्क, राष्ट्रीय सुरक्षा, साहित्य चळवळी, शैक्षणिक कार्य, धार्मिक प्रबोधन, सेवा कार्य या सगळ्या गोष्टींचा वापर करून कोणत्याही मार्गाने हिंदुत्ववादी विचारांचा प्रचार आणि प्रसार करायचा असा नित्याचा कृतिकार्यक्रम हिंदुत्ववादी संस्था, संघटनांचा असतो. त्यासाठी हव्या त्या गोष्टी ते करत असतात. काहींना वाटेल की, हे आताच सुरु झाले आहे कि काय? पण, हिंदुत्व चळवळीचा इतिहास पाहिला तर आपणास हिंदुत्व चळवळीतील इतिहासात अनेक अंतर्विरोध दिसतील. संघ आणि सावरकरी हिंदुत्व वेगळे आहे असे जरी कितीही म्हटले गेले तरी आधीपासून तर आतापर्यंत यादोन्ही प्रवाहांचे एकमेकांशी सौख्याचे संबंध राहिलेले आहेत. गोळवलकर सरसंघचालक झाल्यावर सावरकरांशी त्यांचे ‘वैचारिक आणि कृती कार्यक्रमाला’ घेवून काही मतभेद झाले होते पण, हिंदुत्ववादी चळवळीच्या खालच्या पातळीवर त्याचा तसा काहीही परिणाम झालेला नव्हता असेच दिसते. कारण, संघाच्या लोकांना सावरकर प्रिय होतेच. कदाचित प्रामुख्याने ब्राह्मणजातीय लोक असल्यामुळे असे घडले असावे असे दिसते. हल्ली ज्याप्रमाणे संभाजी भिडे स्वतंत्र संघटना चालवून हिंदुत्वाचे काम करीत आहेत आणि व्यापक हिंदुत्व चळवळीला पोषक वातावरण निर्मिती करीत आहेत. याप्रमाणे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पांचलेगावकर महाराज, चौंडे महाराज आणि मसुरकर महाराज हे स्वतंत्र चळवळी करीत होते. हे तिन्ही महाराज हिंदू संघटन, शुद्धीकरण आणि गोरक्षण अशा चळवळी करत होते. ह्या चळवळींचा व्यापक हिंदुत्व चळवळीला फायदाच होत होता. ह्या तिन्ही महाराजांचे सावरकरांशी चांगले संबंध होते. त्यांच्यात गोरक्षण, अस्पृश्यता, वर्णाश्रम या संदर्भात काही मतभेद सुद्धा होतेच पण, हिंदुत्व चळवळीच्या निमित्ताने आणि हिंदूहिताच्या दृष्टीने ते मतभेद दूर राहत होते. असेच काही आजही शिव प्रतिष्ठान, सनातन संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संबंधावरून दिसते असे म्हणावे लागेल.

हिंदुत्वाचे अंतरंग हे ‘ब्राह्मणीकरणा’चे आणि बहिरंग हे ‘हिंदूकरणा’चे आहे असे अभ्यासक-कार्यकर्ते रणजीत परदेशी त्यांच्या ‘फुले-आंबेडकरांचे ब्राह्मणीकरण’ या ग्रंथात म्हणतात. हल्लीच्या संभाजी भिडेच्या मनुस्मृतीच्या समर्थनाने आणि गौरवाने ते सिद्धही होते. पण, विशेषत: ८० च्या दशकानंतर मोठ्या प्रमाणात ‘ओबीसी जातींचा’ हिंदुत्व चळवळीत सहभाग वाढलेला असल्यामुळे थेट जाती-वर्णभेद मानणाऱ्या मनुस्मृतीचे समर्थन आणि गौरव करणे हे अनेक छोट्या- मोठ्या हिंदुत्ववादी संस्था, संघटना आणि पक्षांना परवडणारे नाही. त्यामुळेच संभाजी भिडेंवर मनुस्मृतीचे समर्थन केले म्हणून काही हिंदुत्ववादी प्रश्न उपस्थित करत आहेत. परंतु, असे प्रश्न उपस्थित करणे म्हणजे गुरुजींचा अपमान करणे असेही काही लोकांना वाटत आहे. या परस्परविरोधी गुंतागुंतीला हिंदुत्व चळवळीतील अंतर्विरोध जबाबदार आहेत. तसेच संख्येचे राजकारण, प्रतिनिधित्वाचे राजकारण आणि अस्मितेंचे राजकारण म्हणजेच पर्यायाने लोकशाही राजकारण सुद्धा जबाबदार आहे. संघ-भाजपचे ‘माधव (माळी, धनगर आणि वंजारी) धोरण’ आणि मंडल चळवळीतून झालेली वर्गोन्नती आणि त्यातून निर्माण झालेल्या सांस्कृतिक अवकाशाच्या गरजेतून मोठ्या प्रमाणात ओबीसी समूह हिंदुत्ववादी चळवळीत सहभागी झालेला दिसतो. या वर्गाचे आर्थिक उन्नती बरोबरच ‘ब्राह्मणीकरण’ झालेले आहे. पण, हिंदू अस्मिता अंगीकृत करून जात अस्मिता दुर्लक्षित केली असली तरी सोबतचे ‘जात वास्तव’ सुटलेले नाही. त्यामुळेच मनुस्मृतीचे समर्थन करून ‘ब्राह्मण महात्म्य’ या समूहाला पचणारे नाही अशी कोंडी ‘ओबीसी हिंदुत्वा’ची झालेली आहे.

ओबीसीप्रमाणेच आदिवासी-दलितांचे सुद्धा झपाट्याने हिंदुत्ववादीकरण होत आहेत. कारण, त्याला ‘ब्राह्मणी-भांडवली आध्यात्मिक बाजार आणि आर्थिक संस्कृतीकरण’ कारणीभूत आहे. २०१४ मध्ये निवडून आलेले दलित आणि आदिवासी खासदार हे भाजप पक्षाचे आणि संघाशी संबंधित आहेत. बहुतेक पुरोगामी चळवळीतील लोक आदिवासी आणि दलित हे मुलत: आणि तत्वत: हिंदुत्वाच्या विरोधात आहेत असे समजत होते. २००२ च्या गुजरात दंग्यांमध्ये आदिवासी-दलित लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होतो हे स्पष्ट झाल्यावर अनेकांच्या धारणांना झटका बसला. परंतू, हिंदुत्व चळवळीचा इतिहास जर अभ्यासला किंवा चाळला तर असे शॉक आणि झटके बसू शकत नाही. कारण, हिंदुत्व चळवळीच्या आधीपासूनच आदिवासी-दलित लोकांना शुद्ध आणि संस्कारित करून हिंदुत्व चळवळीत घेण्याची खूपच जूनी परंपरा आहे. महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात ब्राह्मणी वर्चस्वाच्या विरुद्ध ब्राह्मणेत्तर चळवळ गतिशील आणि प्रभावी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंदुत्व चळवळीला या दोन्ही प्रांतात जनसमूहांमध्ये प्रसार करता आला नाही पण, विशिष्ट लोकांमध्ये त्यांनी घट्ट जाळे विणलेले दिसते. त्याचाच त्यांना पुढील विस्तारासाठी आणि प्रचारासाठी मोठा फायदा झालेला दिसतो. उदा. १९२५ मध्ये जन्माला आलेला संघ १९३५ पर्यंत म्हणावा तसा प्रभावकारी नव्हता. १९३५ च्या पुढे बहुतेक महाराष्ट्रीयन ब्राह्मणांनी संघाचा हिंदुत्वाचा विचार देशभर पसरवला. मद्रास, अलाहाबाद, कलकत्ता, लाहोर, दिल्ली अशा शहरांमध्ये ही महाराष्ट्रीयन ब्राह्मण मंडळी जावून संघाचा विस्तार करू लागली. मराठी सत्ता १८ व्या शतकात देशभर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असल्यामुळे राजे, जहागीरदार यांच्यासोबत महाराष्ट्रीयन ब्राह्मण सुद्धा देशभर मराठी राज्यांचे लेखणीक, पुरोहित म्हणून स्थायिक झालेली आहेत. या मराठी संस्थानिकांचा आणि मराठी ब्राह्मण घराण्यांचा संघाच्या नव्हे तर एकूणच हिंदुत्व चळवळीच्या प्रसाराला आणि विस्तारला खूपच मोठा फायदा झालेला दिसतो. वसाहतिक काळात महाराष्ट्रात (त्यावेळी बॉम्बे प्रांत) आणि तमिळनाडूत (त्यावेळी मद्रास प्रांत) बहुसंख्य शुद्धी आणि संघटन चळवळीच्या नावाने हिंदुत्वाचा प्रसार आणि प्रचार करणारे बहुतेक लोक ब्राह्मण होते त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीने हिंदुत्वाच्या नावाखाली यांना ‘ब्राह्मणशाही’ प्रस्थापित करायची आहे असे म्हणत हिंदुत्व चळवळीला आडकाठी केली. तरीही काही प्रमाणात या प्रांतांमध्ये हिंदुत्व चळवळ पसरलेली दिसते.

उत्तर भारतात या चळवळीचा प्रभाव पडला तसा महाराष्ट्र आणि तामिळनाडू पडलेला दिसत नाही. आर्य समाज, हिंदू महासभा आणि दलितोद्धार सभा यांच्या माध्यमातून उत्तर भारतात (ज्याला हिंदी बेल्ट असेही म्हटले जाते.) हिंदुत्व चळवळीने ‘हिंदी, हिंदू और हिंदुस्थान’ ही घोषणा देत दलितांना-आदिवासींना ‘आत्मसात’ करून सामील करून घेतले. आर्य समाज, हिंदू महासभेचा एक गट आणि दलितोद्धार सभेत मोठ्याप्रमाणात आर्य धर्म, वैदिक धर्म अशी चर्चा करत मुस्लीम आणि ख्रिश्चन यांना अराष्ट्रीय संबोधणारे ब्राह्मणेत्तर लोक (उदा. जात, राजपूत, यादव इत्यादी.) असल्यामुळे ती एकाचवेळी सनातनी वर्णधर्म, ब्राह्मण्य मानणाऱ्या ब्राह्मणांशी झगडत होती आणि सोबतच मुस्लीम आणि ख्रिश्चन यांना शत्रू म्हणून रंगवत ‘अखिल हिंदू’ चे संघटन करीत होती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पहिल्या काही दशकात सुरु असलेल्या या चळवळीचा पुढे १९३० च्या नंतर सावरकर नेतृत्वाखालील हिंदू महासभा आणि संघ यांना खूपच फायदा झालेला दिसून येतो. याच काळात चर्मकार, जाटव, कोळी अशा अनेक दलित, आदिवासी जातींचे हिंदुत्वकरण उत्तर भारतात झालेले दिसते. महाराष्ट्रात याचकाळात डॉ. आंबेडकर कृतीशील झाल्यामुळे हिंदुत्वचळवळीला आपला प्रसार दलित आणि आदिवासींमध्ये वाढवता आला नाही. आंबेडकरांना महारांचा नेता म्हणून संकुचित करून चांभार आणि मांग जातीच्या लोकांना काही लोकांना हाताशी धरून काही प्रयत्न हिंदू महासभेने केलेले दिसतात. त्यांना त्यात यश आलेले दिसत नाही. परंतू, आंबेडकरांच्या धर्मांतराच्या आणि विशेषत: त्यांच्या मृत्यूनंतर हिंदुत्व चळवळीने बौद्ध आणि हिंदू अस्पृश्य अशी विभागणी करत आपला डाव यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतर हिंदुत्ववादी संस्था, संघटनांपेक्षा शिवसेनाच नवबौद्ध आणि हिंदू दलित अशी फुट पाडण्यात मोठ्याप्रमाणात यशस्वी झालेली दिसते. सर्व अस्पृश्य, आदिवासी, भटके आणि गरीब लोक हे ‘दलित वर्ग’ आहेत ही दलित पंथरची ‘वर्गीय भाषा’ शिवसेनेच्या ‘धार्मिक भाषे’ने अप्रस्तूत ठरवली. वसाहतिक काळात ज्या गोष्टी करून दलितांचे हिंदुत्वकरण झाले होते. त्याचप्रकारच्या गोष्टी महाराष्ट्रात केल्या जात आहेत. प्रत्येक दलित जातींमध्ये ‘मिथक पुरुष’ उभे करून त्यांच्या सहाय्याने हिंदुत्वाचा सांस्कृतिक, धार्मिक खेळ करून दलितांना जाती जातीमध्ये वेगळे पाडून ‘हिंदू’ या अस्मितेखाली एकत्र आणले जात आहे. यातूनच अनेक अंतर्विरोध हिंदुत्व चळवळीत निर्माण होत आहेत. एकीकडे भारतात जन्मलेले सर्व धर्मीय लोक हे हिंदू आहेत असे म्हणायचे आणि दुसरीकडे दलितांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला तर त्याची निंदानालस्ती करायची, हेटाळणी करायची. असे दुतोंडी वर्तन करण्याचा अग्रक्रमांकाचा मान हिंदुत्वाचे सिद्धांतकार सावरकर यांना जातो.

हल्ली, आंबेडकरांना हिंदुत्ववादी म्हणून प्रस्तूत करत असतांना आंबेडकरांवर टीका करून सावरकरांनी कशी चूक केली असे म्हणत चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न काही बुद्धिवादी हिंदुत्ववादी लोक करत आहेत. सामाजिक समरसता मंच आणि लहूजी साळवे, वाल्मिकी आणि संत रोहिदास यांच्या नावाने छोट्या मोठ्या संस्था, संघटना काढून दलितांचे विशेषत: महारेत्तर दलितांचे झपाट्याने हिंदुत्वकरण केले जात आहे. त्यासोबतच, बौद्ध झालेल्या महारांचे सुद्धा हिंदुत्वकरण करण्याची विशिष्ट पद्धती विकसित झालेली दिसते. यामध्ये ‘बौद्ध मध्यमवर्गीय’, ‘नवबौद्ध संधिसाधू राजकीय वर्ग’ आणि वैयक्तिक महत्वाकांशा असलेले लोकांचा सोई सोईने वापर करून घेतला जातो. १९२० च्या दशकात इस्लाम आणि ख्रिश्चन विरोधासाठी म्यानमारच्या भिक्षु उत्तम यांना हिंदू महासभेने अध्यक्ष करत ‘हिंदू-बौद्ध आघाडी’ची राजकीय खेळी खेळलेली आहे. तशीच खेळी अजूनही काहीप्रमाणात खेळण्यात येतांना दिसू शकते. त्यामुळेच ‘ओबीसी हिंदुत्व’प्रमाणेच ‘दलित हिंदुत्व’ आकारास येत आहे. सोबतच वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून झपाट्याने आदिवासी जनसमूहांचे हिंदुकरण करण्यात येत आहे. अशा प्रकारे ‘हिंदुत्व चळवळीच्या अंतर्गत ब्राह्मणीकरण आणि लोकशाहीकरण’ होतांना दिसत आहे.
‘सावरकरांना भारतरत्न मिळाला पाहिजे’ अशी मागणी शिवसेनेने लावून धरलेली आहे. संघ,भाजप यांना सावरकर तुलनेने जास्त वैचारिकद्रष्ट्या जवळचे असतांनाही ‘शेंडी-जानव्याचे म्हणजे ब्राह्मणांचे हिंदुत्व’ न मानणाऱ्या शिवसेनेने सावरकरांच्या नावाने ही मागणी केली त्याला अनेक संदर्भ आहेत. ८० च्या दशकानंतर मोठ्याप्रमाणात ओबीसी समूह हिंदुत्व चळवळीत आला हे आपण वर पहिले आहे. त्याला ‘ओबीसींचे हिंदुकरण’ आणि ‘हिंदूत्वाचे ओबीसीकरण’ असे म्हटले गेले आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यावर मोदींचे ‘ओबीसीत्व’ जागे करून संघाच्या ‘ब्राह्मणी –हिंदुत्वा’वर मात करता येईल अशी चर्चा काही कंडे ओबीसी नेते आणि विचारक करत होते. परंतू, हिंदुत्वाचे बहिरंग जरी हिंदुकरणाचे असले तरी अंतरंग हे ब्राह्मणीकरणाचे आहे त्यामुळे तेथे ‘निव्वळ ओबीसीत्व’ शिल्लक राहूच शकत नाही याची त्यांना जाण नव्हती असेच म्हणावे लागते. हल्ली, सावरकरी ‘अभ्यासकांचे समाजशास्त्र’ बदलल्यामुळे सावरकरी हिंदुत्वाचा व्याप आणि आवाका वाढवला जात आहे. त्यामुळेच ‘बुद्धिवादी हिंदुत्व, विज्ञाननिष्ठ हिंदुत्व आणि सेक्युलर हिंदुत्व’ अशी चर्चा केली जात आहे. आधी करंदीकर, सहस्त्रबुद्धे, गोखले अशा आडनावांची लोक लिहित होती त्यामुळे सावरकर ‘ब्राह्मणशिरोमणी’ बनविले जात होते. पण, आता मोरे, गायकवाड, कांबळे अशा नावाची लोक लिहिते झाल्यामुळे त्यांना ‘ब्राह्मणशिरोमणी’ सावरकरांपेक्षा ‘हिंदूराष्ट्रपती’ सावरकरच अधिक महत्वाचे आणि व्यापक वाटतात. अभ्यासकांचे समाजशास्त्र बदल्यामुळे अभ्यासाचे विषयवस्तू सुद्धा बदललेले दिसतात.

आधी हिंदुत्ववादी विचार आणि चळवळ पुरुषकेंद्री आणि पितृसत्ताक आहे असे म्हटले जायचे किंबहुना अजूनही विरोधी पक्षाच्या आणि विचारांच्या लोकांकडून तसे म्हटले जाते. त्यासाठी संघात स्त्रियांना प्रवेश नाही येथपासून तर ‘पुण्यभू’ आणि ‘पितृभू’ असे पुरुषी शब्द वापरले जातात येथपर्यंत अनेक आक्षेप घेतले जातात. बहुतेक आक्षेपांमध्ये काही तथ्य जरी असले तरी खूपच वरवरचे आहेत. कारण, जरी स्त्रियांना संघात हिंदुत्ववादी चळवळीने स्थान दिलेले नसले तरी आधीपासून हिंदुत्ववादी चळवळीत स्त्रियांचे कमी अधिक प्रमाणात स्थान होते असेच दिसते. हिंदू महासभेच्या वतीने ‘अखिल हिंदू स्त्रियांचे हळदी-कुंकू’चे कार्यक्रम होतच होते. हे हळदी कुंकूचे कार्यक्रम वरवरून जरी ‘सांस्कृतिक –धार्मिक’ वाटत असले तरी ते खऱ्याअर्थाने राजकीय कार्यक्रम होते. हल्ली, त्याच हळदीकुंकुचे सर्वपक्षांच्या महीला आघाडीच्या वतीने सर्रास कार्यक्रम केले जातात. हळदीकुंकूपासून ते दुर्गादौडच्या निमित्ताने मोठ्याप्रमाणात स्त्रियांना ‘धार्मिकतेच्या, संस्कृतीच्या आणि मनोरंजनाच्या नावाखाली हिंदुत्ववादाच्या सांस्कृतिक राजकारणात सामावून घेतले जाते. त्यामुळेच, तर जगातील सर्वात मोठी स्त्रीवादी संघटना म्हणत राष्ट्र सेविका समिती जागतिक महिला दिन साजरा करतांना दिसते. ‘ज्ञानप्रबोधिनी’पासून ते ‘स्वरूपवर्धिनी’पर्यंतच्या हिंदुत्ववादी संस्था, संघटना रूढअर्थाने ‘बालविवाह, विधवाविवाहविरोध, सतीप्रथा, मनुस्मृतीवाल्या राहिलेल्या नसून आधुनिक स्त्रीशक्तीवाल्या (स्त्रीमुक्ती नव्हे) झाल्या आहेत. याचा अर्थ ह्या संस्था-संघटना स्त्री-पुरुष समता ह्या सगळ्या गोष्टी मानायला लागल्यात असेही नाही तर बदलत्या काळाचा फायदा घेवून पुन्हा आपला जुनाच रेटा नवीन पद्धतीने लावून आहेत. त्यामुळेच, तर हिंदुत्ववादी स्त्रिया स्त्रीवादाला पाश्चमात्य संस्कृतीचे खूळ असे म्हणतात. अलीकडच्या काळात साध्वी असलेल्या हिंदुत्ववादी स्त्रियांनी लव जिहादच्या निमित्ताने आणि मुस्लीम जननक्षमतेच्या संदर्भात केलेल्या टिपण्या खूपच बोलक्या आहेत. एकीकडे आजन्म साध्वी बनून हिंदुत्ववादी चळवळीला ‘आध्यात्मिक बळ’ देणाऱ्या स्त्रिया तर दुसरीकडे पतीव्रताधर्म पाळत राष्ट्रासाठी शिवाजीसारखा शूरवीर आणि धर्मनिष्ठ मुलगा जन्माला घालून ‘कौटुंबिक बळ’ देणाऱ्या स्त्रिया असा सगळा गोतावळा हिंदुत्ववादी स्त्री संघटना आणि संस्थेमध्ये आतापर्यंत दिसत होता. आता काही बदल काळाच्या रेट्यामुळे करावे लागत आहेत. त्यामुळे हल्ली धर्म, संस्कृतीला आपली अस्मिता बनवत आधुनिक पोस्ट फेनिझमवाल्या स्त्रिया आणि मुली हिंदुत्व चळवळीत दिसत आहेत. यातून नवीन प्रकारचे प्रश्न सुद्धा निर्माण होत आहेत.

आधुनिकता- परंपरा, जुने-नवे, विज्ञान, बुद्धिवाद, धर्म, संस्कृती, जागतिक – स्थानिक अशा सगळ्याच कोटीक्रमांना, संकल्पांचा हिंदुत्ववादी लोक आपल्या सोई सोईने वापर करून घेत असले तरी आपला विचार, अस्मिता म्हणून एकसुरी होण्याचा, धर्म, संस्कृती, राष्ट्र यांच्याबाबतीत सरसकटीकरण करून विरोधी विचारांच्या लोकांना देशद्रोही, धर्मद्रोही, हिंदुद्रोही, राष्ट्रद्रोही असे लेबले लावण्याचा ठेका काही सोडत नाही. हल्ली, फुरोगामी, फेक्युलर, सिक्युलर, फिबलर असे म्हणत पुरोगामी, सेक्युलर आणि लिबरल विचारांची निंदानालस्ती आणि विरोध करण्याचा नित्यक्रम जोरदारपणे हिंदुत्ववादी वर्तुळात आणि परिवारात होतांना दिसतो. ह्या सर्व गोष्टी हिंदुत्ववादी विचारांना पोषक वातावरणनिर्मिती म्हणूनच केल्या जातात. ह्या गोष्टी करणारे सगळेच अशिक्षित आणि पारंपारिक लोक नसतात. त्यांच्यामध्ये युरोप-अमेरिकेत स्थायिक झालेले, उच्चशिक्षित, विज्ञान-तंत्रज्ञानाचे प्रोफेशनल असे सगळ्याच प्रकारचे आंग्लभाषिक असतात. पण, त्यांचे ‘स्वदेशी’, ‘स्वधर्म’ प्रेम ओसांडून वाहत असते. प्रातिनिधिक स्वरुपात बोलायचेच झाले तर एकीकडे राजीव मल्होत्रासारखे लोक परदेशात स्थायिक होवून ‘तथाकथित ब्रेकिंग इंडिया’ कंपनीच्या विरोधात स्वदेशी लढा लढत आहेत. दुसरीकडे, रामदेव बाबा आणि कंपनी स्वदेशीच्या नावाने एकाबाजूला आंतरराष्ट्रीय ब्रांड बनवत आहे आणि दुसऱ्याबाजूला देशात मोफत आणि स्वस्तात शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत आहे. अशा अनेक परस्परविरोधी गोष्टी आपणास हिंदुत्ववादी चळवळीत स्पष्टपणे हल्ली दिसून येत आहेत. ह्या घडामोडींमुळे हिंदुत्व परिवारात काही अंतर्विरोध उभे जरी राहत असले तरी ते एकमेकांच्या शत्रुभावी आणि विरोधी बनत नाही. कारण, हेच हिंदुत्वाचे श्रमविभाजन आहे आणि यातूनच त्यांचे ‘सेवा कार्य’ आणि ‘रक्षा कार्य’ असे दोन्ही परस्परपूरक बनत चालतात हे समजून घेणे खूपच महत्वाचे आहे. धार्मिकतेचा बाजार, सांस्कृतिक भांडवलशाही आणि नवउदारमतवाद यांचा या एकूणच प्रकियेवर मोठा प्रभाव पडत आहे आणि त्यातून हिंदुत्व आणि हिंदुत्व चळवळीचे पुनरुत्पादन होत आहे. हल्लीच्या सामाजिक-आर्थिक-मानसिक व्यवस्थेतून अगणित मेंदू-मनोविकार जन्माला येत आहेत, त्यामुळे निरुत्साही होणे, नेहमी थकल्यासारखे जाणवणे, स्वत:विषयीच संदिग्ध राहणे, आत्मविश्वास हरवणे, कल्पक आणि रोमांचकारी स्वप्नसुद्धा न पडणे, सातत्याने भीती आणि दडपण वाटणे, अशा अनेक गोष्टी होतात. याच प्रक्रियेला माणसाचे ‘अमानवीकरण’ असे म्हणतात. अशा सामाजिक-मानसिक-आर्थिक विवंचनेतून बाहेर पाडण्यासाठी सर्वसामान्य लोक मार्ग शोधत असतात. याच परिस्थितीचा फायदा घेवून ‘नवधार्मिकता’ शिकवणारे बुवा-बापू-अम्मा लोक ‘अध्यात्मिक बाजार’ वाढवतात. या आध्यात्मिक बाजारातून ‘नवधार्मिक साधक’ आणि ‘धार्मिक उपभोक्ता’ दोन्ही निर्माण केले जातात. पंतजलीचे रामदेवबाबा, आर्ट ऑफ लिविंगचे रविशंकर, सनातनचे आठवले ह्या सगळ्या लोकांचे हिंदुत्व चळवळीशी संबंध आहेत. बाबा रामरहीम, आसाराम यांच्यासारख्या अनेक ‘आधुनिक दैवीपुरुष’ लोकांनी गैरकृत्य केल्यामुळे शिक्षा झालेली आहे. पण तरीही त्यांच्या वतीने साधक लोक समर्थन मोर्चे काढतात, पत्रके वाटतात. तसेच बाबा आणि बापू हे निर्दोष आहेत असे भक्तिभावाने भावनिक होवून सांगत असतात. यातून आपल्याला स्पष्टपणे कळून येईल की, आध्यात्मिक बाजारातून निर्माण झालेला ‘नवधार्मिक साधक’ आणि ‘धार्मिक उपभोक्ता’ किती जैविकपणे यासर्व प्रक्रियेशी जोडलेला असतो.

अध्यात्मिक बाजाराप्रमाणेच सांस्कृतिक भांडवलशाहीच्या माध्यमातून ‘सर्जनशीलता, निर्मितीक्षमता, स्वातंत्र्याची ओढ, नव्याचा शोध घेण्याची धडपड, प्रश्न विचारण्याची क्षमता आणि आभाळाला गवसणी घालण्याची धमक ही माणूसपणाची सर्व लक्षणे अमानवीकरणाच्या आर्थिक-लैंगिक-भावनिक आणि सामाजिक पिळवणूक तंत्राने संपविली जात आहेत आणि माणसाच्या भाव-भावनांचे, नातेसंबंधाचे, प्रेमाचे रूपांतर नफा- तोट्यात होत आहे. सौंदर्य, सेक्स, आनंद, मैत्री, विश्वास, श्रद्धा आणि प्रेम या सगळ्यांचेच यांत्रिकीकरण आणि वस्तूकरण होऊन त्याचा बाजार भरताना दिसतो. म्हणूनच ब्यूटी मार्केट, सेक्स मार्केट, कॉमेडी शो, स्पिरिच्युअल मार्केट सध्या झपाट्याने वृद्धिंगत होताना दिसत आहे. सोबतच, नवउदारमतवादी धोरणांमुळे दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे. आर्थिक विषमता वाढत आहे. ह्यामुळे काहीही करून (उदा. चोऱ्यामाऱ्या, फसवेगिरी, भ्रष्टाचार) विनाश्रम पैसा कमविण्याकडे लोकांची वृत्ती वाढतांना दिसत आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेत आध्यात्मिक बाजार, सांस्कृतिक भांडवलशाही आणि नवउदारमतवाद यांच्या माध्यमातून प्रेमाच्यानावाखाली द्वेष, रक्षणाच्यानावाखाली हिंसा, एकतेच्यानावाखाली तिरस्कार वाढत आहे. हल्ली, आध्यात्मिक बाजार, सांस्कृतिक भांडवलशाही आणि नवउदारमतवाद यांचे गुंतागुंतीचे पण जैविक अनुबंध दिसून येत आहेत आणि त्याचा हिंदुत्ववादी चळवळीला फायदा होतांना दिसत आहे. त्यामुळेच या सर्व प्रक्रियेतून निर्माण होणारा हिंदुत्वाचा साधक, ग्राहक आणि उपभोक्ता असलेला कार्यकर्ता हा एकाचवेळी विज्ञानवादी डॉ. दाभोलकर, कामगार नेते कॉ. पानसरे, लेखक-विचारवंत डॉ. कलबुर्गी आणि सत्यान्वेशी पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनामध्ये सहभागी होता असे तपासयंत्रणेच्या शोधातून समोर येत आहे. सनातन संस्था, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या सारख्या संघटनांचे कार्यकर्ते तपासयंत्रणेच्या धारेवर आल्यापासून संघ परिवार आणि सावरकरी सर्कल मधील लोक ‘ते लोक’ हिंदुत्व चळवळीतील कसे नाहीत हे सांगत आहेत. पण, हिंदुत्व चळवळीची कार्यपद्धती पाहिली तर आपणास यात काहीच नवीन नाही हे स्पष्टपणे कळून येईल. हिंदुत्ववादी कार्यकर्ते जरी एकाच संस्था-संघटनेतील नसले तरी व्यापक हिंदुत्व परिवारातील सदस्य नक्कीच असतात. त्यामुळे त्यांच्याकडून योग्यवेळी आणि योग्यस्थळी हिंदुत्व बंधुभावाला (Saffron Brotherhood) ठीकवणारा व्यवहार नेहमीच होत आला आहे. म्हणूनच हिंदुत्व चळवळीतील आणि परिवारातील अंतर्विरोध हे शत्रुभावी अंतर्विरोध नसून बंधुभावी श्रमविभाजन आहे. हल्ली, हे श्रमविभाजन हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी झपाट्याने कार्यतत्पर झालेले दिसते. म्हणून हिंदुत्व चळवळीचा अभ्यास करणे मला अगत्याचे वाटते.


सदरील लेख- ४ सप्टेंबर २०१८ रोजी राईट अंगल या वेब पोर्टलवर प्रसिद्ध झाला होता.

सार्वजनिक गणेशोत्सव : नव-धार्मिकता, मनोरंजन बाजार आणि संस्कृतीचे अर्थ-राजकारण


आधुनिकपूर्व काळात गणपती गाणपत्य, तंत्र आणि शाक्त दर्शनांच्या आणि धर्मांच्या माध्यमातून एक प्रभावी दैवत राहिला आहे. गणपतीच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पौराणिक इतिहासाच्या संदर्भात अनेक अभ्यासकांचे निष्कर्ष वेगवेगळे आहेत. वैदिक-अवैदिक, ब्राह्मणी-अब्राह्मणी या सांस्कृतिक संघर्षात आणि झगड्यातसुद्धा गणपतीला ओढले गेले आहे. किंबहुना त्याच्या व्यामिश्र सांस्कृतिक-धार्मिक परंपरेमुळे वेगवेगळ्या गटातील लोक त्याचे अपहरण करतात असेच म्हणावे लागेल. वैनायकीरूपी ‘स्त्रीशक्ती गणेश’ जसे आपले आकर्षणबिंदू बनतो, तसेच तंत्रातील ‘नग्नगणेश’सुद्धा सांस्कृतिकबिंदू ठरतो. बौद्ध, जैन यांच्यासारख्या समन (श्रमण) परंपरेतसुद्धा श्रीगणेश आपणास भेटतो. काहींना वाटेल की, ही नंतर घुसडलेली कथा आहे किंवा विकृत करण्यासाठी केलेले कारस्थान आहे. काहीही असो, हे वास्तव आहे की, श्रीगणेश ही भारतात प्रसिद्ध असलेली देवता आहे. परंतु, हल्ली ‘सार्वजनिक गणेशोत्सवा’चा श्रीगणेशाच्या या सांस्कृतिक, दार्शनिक आणि धार्मिक परंपरेशी संबंध आहे, असे मात्र आपल्याला दिसत नाही. म्हणून आम्ही दोघांनी मागील वर्षी म्हणजे २०१७ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने ह्या संदर्भात अभ्यास करण्याचे ठरवले होते. त्यासाठी आम्ही पुण्यातील ८ ढोलताशा पथकातील एकूण २३ युवक-युवतींकडून प्रश्नावली भरून घेतली आणि काहींशी मुलाखती स्वरूपात चर्चा केल्या.

हल्ली महाराष्ट्रभर साजरा होणाऱ्या ‘सार्वजनिक गणेशोत्सवा’ची मुहूर्तमेढ पुणे शहरात झालेली आहे. यावर काही लोकांचा आक्षेप असू शकतो, कारण नवीन अभ्यासाच्या आधारावरून हे स्पष्ट झाले आहे की, पुण्यात गणेशोत्सव साजरा होण्याच्या आधी काही संस्थानांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत होता. त्यामुळे भारतात पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा ‘वासाहतिक भारता’त पहिल्यांदा पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. ‘संस्थानिक भारत’ हा ब्रिटिशांच्या सर्वंकष सत्तेखाली जरी असला तरी व्यावहारिक बाबतीत स्वतंत्र होता.

२०१७ मध्ये शतकोत्तर रौप्य महोत्सवा वर्षाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेने आणि राज्य सरकारने विशेष पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची भूमिका घेतली होती. त्याच वेळी सार्वजनिक गणेशोत्सव पहिल्यांदा साजरा करण्याचा मान टिळकांना दिला जातो, म्हणून काही लोकांनी आक्षेप घेतला. काहींनी भाऊसाहेब रंगारी यांनी पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केल्यामुळे त्यांच्या मंडळाला तो विशेष मान मिळायला हवा अशी भूमिका घेतली. या संदर्भातील वाद सार्वजनिक, वैयक्तिक, सामाजिक आणि न्यायालयीन चर्चेच्या पातळीवर झालेले आहेत. तसेच महाराष्ट्रात प्रभावशाली असलेल्या ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर या वादानेही यावेळी काही प्रमाणात डोके वर काढले होते. त्यात नेहमीप्रमाणे ब्राह्मण लोक ब्राह्मणेत्तरांच्या कृतीचे, मेहनतीचे श्रेय आपणाकडे घेतात, असा सूर लावत भाऊसाहेब रंगारी हे ब्राह्मणेत्तर आहेत म्हणून त्यांना त्यांचा पहिला मान मिळत नाही असा सूर लावला. काहींनी टिळक-रंगारी हे दोन्ही मित्र होते. त्यामुळे त्यांच्यात श्रेयाचे भांडण लावू नये अशी भूमिका घेत कोणीही पहिल्यांदा सुरू केलेला असो, पण तो महत्त्वाचा आहे अशी भूमिका घेतली. आम्ही सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळातच प्रश्नावली भरून घेत होतो. त्यावेळी सार्वजनिक आणि वृत्तपत्रीय पातळीवर अनेक चर्चा झाल्या. त्या सगळ्या आम्ही आमच्या प्रश्नावलीत सामावून घेऊ शकलो नाही. त्यामुळे ती चर्चा समजून घेण्यासाठी स्वतंत्र संशोधन करावे लागेल.

सार्वजनिक गणेशोत्सवातील ढोल-ताशा पथक

ढोल-ताशा पथक हा पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे आकर्षणबिंदू म्हणून टीव्ही, वृत्तपत्र, सोशल मीडियावर चर्चिला गेला आहे. त्यामुळे हल्ली पुण्याबाहेरसुद्धा ढोलताशा पथके निर्माण झालेली दिसतात. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र पातळीवर ढोलताशा पथकांची संस्था, मंच स्थापन झाले आहेत. आम्ही फक्त पुण्यातील ढोलताशा पथकांतील काही तरणांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे इथे त्याचीच चर्चा करता येईल. २०१७ साली पुणे, पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांत किमान ४५०-५०० ढोल-ताशा पथके आहेत, असे एका पथकाच्या मालकाने आम्हाला सांगितले. 

ढोल-ताशा पथकांमध्ये काही पथके ही गैरराजकीय पाठिंब्याने स्थापन झालेली दिसतात, काही राजकीय पाठिंब्याने, तर काही छुप्या राजकीय समर्थनाने. ढोल-ताशा पथकाच्या माध्यमातून अनेक युवक-युवती एकत्र येत असल्यामुळे राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक काम करणारे लोकसुद्धा ढोलताशा पथक स्थापन करतात, तर काही फक्त सेवाभावीवृत्तीने काम करता यावे म्हणून पथक स्थापन करतात. मुलींचे स्वतंत्र पथकही पाहायला मिळते. मुलांचे मात्र स्वतंत्र पथक आमच्या पाहण्यात आले नाही.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या एक-दोन महिन्यांपासून ढोल-ताशा पथकांची पूर्वतयारी चालू असते. त्यामध्ये सदस्य जोडणे, सोबतच, ढोल-ताशा वाजवण्याची तयारी केली जाते. आपल्या पथकाची सदस्यसंख्या वाढावी म्हणून सदस्य नोंदणीची जाहिरात करणारे फलकसुद्धा पुणे शहरात लावलेले दिसतात. सदस्य नोंदणीसाठी काही पथकांमध्ये विशिष्ट रक्कमसुद्धा असते. काही पथके आपल्याला सदस्यांना आयकार्डही देतात. ‘ढोल-ताशा पथक हा हिंदुत्वाचा प्राण आहे’ असे एक हिंदुत्ववादी विचारांशी बांधलकी मानणारा ‘आधुनिक उच्चशिक्षित तरुण’ आम्हाला म्हणाला. 

ढोल-ताशा पथकांचे अर्थ-राजकारण

प्रत्येक पथकामध्ये किमान १०-२० युवक-युवतींपासून ते कमाल १५०-२०० युवक-युवती पाहायला मिळतात. काही ठिकाणी तर त्यापेक्षाही अधिक असतात. पथकाच्या स्वरूपानुसार, गरजेनुसार आणि सदस्य संख्येनुसार ढोल-ताशांची उपलब्धता केली जाते. काही वेळा घंटा, मोठमोठ्या काठ्या आणि झेंडेसुद्धा असतात. या सर्व वस्तूंचा खर्च सदस्यांच्या नोंदणी फीमधून केला जातो, तसेच, काही पथकांचा खर्च पथकाच्या कार्यकारिणीचे सदस्य करतात. त्यात बहुतेक सदस्य कुठल्या न कुठल्या राजकीय पक्षाकडून, सामाजिक संस्था वा संघटनेकडून पैसा उभा करतात. काही ठिकाणी मंदिरांचे ट्रस्ट पैसा देत असतात. आता मंदिरांच्या ट्रस्टमधील लोक कुठल्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संस्था आणि संघटनेशी संबंधित असतात, हे काही नव्याने सांगायला नको.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे १० दिवस आणि नवरात्रीचे ९ दिवस असे १९ दिवस ढोल-ताशा पथक सुपाऱ्या घेतात. बहुतेक गणेश मंडळांच्या ठिकाणी ढोल-ताशा पथकाचे लोक वाजवत असतात. त्यात बहुतेक सगळेच पैसे घेऊन वाजवतात. यामध्ये दोन गोष्टींमध्ये फरक करायला हवा. एक म्हणजे गणेश मंडळ आणि दोन म्हणजे ढोल-ताशा पथक. खूपच कमी वेळा गणेश मंडळांचे स्वत:चे पथक असते. आमच्या अभ्यासातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, एका पथकाची एका रात्रीची सुपारी किमान ३० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत असते. गणेशोत्सव  आणि नवरात्र अशा १९ दिवसांत २० सुपाऱ्या जरी मिळाल्या तरी ३० हजारांप्रमाणे किती रुपये होतील याचे आकडेमोड तुम्ही करू शकता.

यामुळे दोन प्रश्न निर्माण होतात. एक म्हणजे एवढा पैसा गणेश मंडळांकडे कुठून येतो? आणि दोन म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे की, धार्मिक-मनोरंजन बाजार?  

नव-धार्मिकता :  एक ‘परंपरेचा शोध’

सार्वजनिक गणेशोत्सवाचा अभ्यास केल्यास आपणास स्पष्टपणे दिसून येते की, यामध्ये पारंपरिक धार्मिक-सांस्कृतिक असा कुठलाही आशय नाही. मुळात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करतानाही धार्मिक-सांस्कृतिक वृद्धीसाठी आणि प्रचारासाठी त्याची सुरुवात झाली नव्हती. धर्म आणि संस्कृतीच्या माध्यमातून राजकीय जागृती आणि हिंदू संघटन करणे हाच त्याचा मुख्य हेतू होता.

समाजामध्ये उत्सवांना नेहमी स्थान राहिलेले आहे, किंबहुना मानवाचे सर्व जीवनच कुठला ना कुठला उत्सव, कर्मकांड आणि विधींनी बांधलेले असते. तसेच, धार्मिक-सांस्कृतिक स्वरूपात अनेक उत्सव, कर्मकांड आणि विधी मनुष्य आपल्या जीवनात पाळत असतो. झपाट्याने होणारे शहरीकरण, सांस्कृतिक-सामाजिक स्थित्यंतर, कृषीकेंद्री समाजाचा उद्योगकेंद्री समाजाकडे होणारा प्रवास, या सगळ्यांमुळे उत्सव, कर्मकांड आणि विधी यांच्यामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. त्यामुळे धर्म, संस्कृती यांच्या नावाखाली वेगळ्याच गोष्टी आकाराला येत आहेत आणि त्यांना धर्म, संस्कृती, परंपरा म्हणून जतन केले जात आहे. या प्रक्रियेला ‘परंपरेचा शोध’ घेणे असे म्हटले जाते. धर्माच्या नावाखाली नव-धार्मिकता जोपासली जाते. या नव-धार्मिकतेचा मूळ धर्माशी आणि धार्मिकतेशी बहुतेक वेळा संबंध नसतोच.

सार्वजनिक गणेशोत्सव हे त्याचे चांगले उदाहरण आहे. बहुतेक लोक सार्वजनिक गणेशोत्सवाला धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य म्हणून पाहतात, पण एकोणिसाव्या शतकाच्या आधी अशा प्रकारचा सार्वजनिक व्यवहार कधीच नव्हता, असे इतिहास आपणास सांगतो. 

मनोरंजन बाजार आणि राजकीय उपभोग

पारंपरिक समाजामध्ये जत्रा, उरूस या गोष्टींच्या माध्यमांतून समाजाचे मनोरंजन व्हायचे, पण हल्ली अनेक ठिकाणी गावच्या जत्रांनी आणि उरुसांनीसुद्धा कूस पालटली आहे. तसेच, गावांतून मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये स्थलांतराचे प्रमाण वाढल्यामुळे स्थलांतरित लोकांच्या भावविश्वाचे आणि मनोविश्वाचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक स्वतंत्र मनोरंजन व्यवस्था आणि बाजार निर्माण झाला आहे. पुण्या-मुंबईपुरता मर्यादित असणारा सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्रभरातील शहरांचे वास्तव बनला आहे. राज्यातील बहुतेक शहरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन झाली आहेत. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कार्यक्रमात अनेक मंडळांच्या माध्यमातून सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, पर्यावरणीय आणि सामाजिक प्रश्नांसंदर्भात देखावे, नाटके, प्रवचन असे कार्यक्रम केले जातात. त्यांचा आस्वाद घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.

तुम्ही सार्वजनिक गणेशोत्सवात का सहभागी होतात, असा प्रश्न आम्ही विचारला होता. त्यावर बहुतेकांनी ‘जल्लोष करण्यासाठी, आनंद, मजा घेण्यासाठी तसेच, एकत्र येऊन संस्कृती, वारसा जतन करण्यासाठी’ असे उत्तर दिले. यातून एक-दोन गोष्टी स्पष्ट होतात. पुण्यासारख्या शहरात ‘सार्वजनिक स्थळे, मैदाने कमी होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्यानिमित्ताने ढोल-ताशा पथक हे एक मैत्री करण्याचा, आनंद, मजा लुटण्याचे सार्वजनिक आणि धर्म-संस्कृतीसंमत ठिकाण बनले आहे. ढोल-ताशा वादनात तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतात. वादनात तल्लीन होतात. अनेक गणेश मंडळ नृत्यस्पर्धा, नाटकस्पर्धा, देखावे स्पर्धा आयोजित करतात. त्यामुळेसुद्धा सार्वजनिक गणेशोत्सव एक मनोरंजन बाजार बनतो.

सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग असतो, म्हणून अनेक राजकीय पक्ष, संस्था आणि संघटना आपल्या राजकीय विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या उत्सवाचा वापर करतात. काही ढोल-ताशा पथक आणि मंडळ तर राजकीय पक्षांच्याच मदतीने बसवलेले असतात. काही मंडळ हे पक्षांच्या कार्यकर्त्यांचे असतात. त्यामुळे दहा दिवसांच्या आरतीला बहुतेक वेळा राजकीय लोकांची उपस्थिती असते. त्यातून पक्षाचा विस्तार आणि प्रचार असाही शुद्ध हेतू साधून घेण्याचा डाव असतो. पुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय पक्ष आपली हर्डिंग्ज, फ्लेक्स, जाहिराती लावतात. सरकार आपल्या योजनांचा प्रचार या सार्वजनिक उत्सवात करून घेते. या सर्व धार्मिक-सांस्कृतिक उत्सवात लोक मनोरंजनासोबत राजकीय उपभोगसुद्धा घेतात.     

सहभागी होणाऱ्यांची मनोभूमिका

प्रश्नावलीत सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात का करण्यात आली होती, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना बहुतेकांनी ‘लोकांनी एकत्र यावे’ असे उत्तर दिले. काहींनी ‘सामाजिक प्रबोधन करण्यासाठी’, तर काहींनी ‘लोकांना संघटित करता यावे’ असे उत्तर दिले. या ठिकाणी ‘एकत्रित येणे’ आणि ‘संघटित करणे’ असे दोन शब्दप्रयोग करण्यात आले आहेत. जे ढोलताशा पथक आणि मंडळ हे हिंदुत्ववादी विचारांशी बांधीलकी मानतात, किंबहुना त्यांनीच ते स्थापन केले आहे. त्यातील लोकांनी ‘लोकांना संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली होती,’ असे उत्तर दिले, तर बाकीच्यांनी ‘एकत्रित करण्यासाठी’ असे उत्तर दिले. ‘संघटन करणे’ हा शब्द हिंदुत्व चळवळीतील लोक सर्रास वापरताना दिसतात. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव त्यांच्यासाठी ‘हिंदू संघटन’ करण्यासाठीचा एक कार्यक्रम असतो, तर इतरांसाठी फक्त एकत्र येण्याचा.

सार्वजिक गणेशोत्सवामुळे लोकांना त्रास होतो का, असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बहुतेकांनी त्रास होतो हे मान्य केले आहे.  काहींनी वर्षात एकदाच गणेशोत्सव असल्यामुळे लोकांनी त्रास सहन केला पाहिजे असे उत्तर दिले, तर काहींनी हिंदूंच्याच सणांचा काहींना त्रास का होतो, असा प्रतिप्रश्न केला. पण तरीही बहुसंख्य तरुण म्हणाले की, डीजे, मोठी वाद्ये यांचा त्रास ज्येष्ठ लोकांना आणि बालकांना होतो. त्रास तर होतो पण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झालाच पाहिजे असे वाटणारे तरुण गोंधळात आणि गुंत्यात अडकलेले वाटतात. सार्वजनिक गणेशोत्सवामुळे लोकांना धार्मिक माहिती मिळते का, असा प्रश्न विचारला असता बहुतेक म्हणजे जवळपास ४० टक्के तरुण ‘धार्मिक माहिती मिळते’ असे म्हणाले. पण धर्माच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी सार्वजनिक कार्यक्रम झाले पाहिजेत का, असा प्रश्न विचारला असता बहुतेकांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, धर्म आणि सार्वजनिक कार्यक्रम यासंदर्भात तरुणांच्या मनामध्ये संभ्रम आहे.

राजकारणी लोक सार्वजनिक गणेशोत्सवाचा गैरवापर करतात का, असा प्रश्न केला असता फक्त एकानेच ‘करत नाहीत’ असे उत्तर दिले. बाकीच्यांनी ‘गैरवापर करतात’ आणि ‘आम्हाला माहिती नाही’ असे उत्तर दिले. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात तरुण-तरुणींचा मोठा सहभाग असतो. ढोलताशांच्या वादनातही मुलांच्या तोडीस तोड मुली तल्लीन झालेल्या असतात, पण बहुतेक लोकांना मासिक पाळीच्या काळात मुलींनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात सहभागी होऊ नये असे वाटते. यामागे शुद्धी-अशुद्धी आणि विटाळाची कल्पना निश्चितपणे असते, असे म्हणावे लागेल. कारण, पाळीच्या काळात मुली आणि स्त्रिया या अशुद्ध झालेल्या असतात, असा आपल्या समाजाचा समज आहे. हिंदुत्व विचारांच्या ढोल-ताशा पथकातील काही मुलींनी उत्तरच दिले नाही, तर काहींनी ‘सहभागी व्हावे’ असे उत्तर दिले. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात ‘शाकाहार करूनच सहभागी व्हावे’ असे बहुतेकांना वाटते. बोटावर मोजण्याएवढ्या लोकांना ‘कुठलाही आहार केला तरी काही फरक पडत नाही’, असे वाटते.

सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास

प्रश्नावलीत सार्वजनिक गणेशोत्सव कशासाठी सुरू केला होता, असा प्रश्न आम्ही केला होता. त्यावर बहुतेकांनी ‘लोकांना एकत्र करण्यासाठी’ आणि ‘ब्रिटिशांच्या विरोधात समाजमन तयार करण्यासाठी’ असे उत्तर दिले. लोकांनी दिलेले उत्तर ऐतिहासिक वास्तवाला धरून नाही असेच म्हणावे लागते, कारण सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात हिंदूंचे संघटन वाढवण्यासाठी झालेली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात होण्यामागची पार्श्वभूमी सांगताना टिळक चरित्रकार न. चिं. केळकर म्हणतात, “१८९३ च्या गणपत्युत्सवांत म्हणजे मुंबईतील हिंदू-मुसलमानांच्या दंग्यानंतर सुमारे सहा आठवड्यांनी गणपतिउत्सव सुधारून वाढविण्याची कल्पना प्रथम निघाली.” (न. चिं. केळकर, १९२३, पृ. ४२०)

टी. व्ही. पर्वते म्हणतात की, “सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना ही हिंदू-मुस्लीम दंग्यातून आली तसेच, हिंदूंना मुस्लिमांच्या मोहोरमातून लांब ठेवण्याचाही त्याचा प्रयत्न होता.” (टी. व्ही. पर्वते, १९५८, पृ. ११५)

वरील दोन्ही टिळक चरित्रांतून एक गोष्ट स्पष्ट होते की, सार्वजनिक गणेशोत्सव हा हिंदू-मुस्लिमांचे एकत्रीकरण आणि ब्रिटिशांच्या विरोधात निर्माण झाला नसून हिंदूंचे संघटन करण्यासाठी निर्माण झाला होता.

हिंदू-मुस्लिमांच्या दंग्यांच्या पार्श्वभूमीवर मोहरममधील ताबुतांवर बहिष्कार टाकण्याची चळवळ पुण्यातील हिंदूंनी हाती घेतली होती, कारण मोहरमच्या ताबुताच्या वेळी मोठ्या प्रमाणात हिंदू समाज सहभागी होत होता. ताबूतवर बहिष्कार टाकण्याच्या चळवळीमुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला फायदाच झाला. त्यासंदर्भात केळकर म्हणतात, “मुसलमानांच्या चढेलपणाच्या वृत्तीमुळेच काही अंशी हा उत्सव हाती घेण्याची कल्पना सुचली, व जे हिंदू लोक ताबुतांची पूजा करितात त्यांना सलोख्याने वागवून घेण्यास मुसलमान लोक तयार नसल्याने, हिंदूंना ताबुतांपासून परावृत्त करावे, व उत्साहनिवृत्त केलेल्या या लोकांना स्वधर्माशी संबंध असलेली काही तरी नवीन करमणूक मिळवून द्यावी, असा टिळकांचा बोलून चालून उद्देशच होता.” (केळकर, १९२३, पृ. ४२२) सार्वजनिक गणेशोत्सवाला धार्मिक संदर्भ जरी असला तरी ‘गणेशोत्सव हे सामाजिक संघटना आणि राजकीय जागृती साधण्याचे एक प्रभावी अंग बनले.’ (जोग, वर्ष उपलब्ध नाही, पृ. ४८)

सार्वजनिक गणेशोत्सवामुळे टिळकांच्या चळवळीचे क्षेत्र फारच विस्तृत झाले. त्यासंदर्भात सर व्हेलेंटाईन चिरोल म्हणतात, “नाटकाचे प्रयोग करायला आणि धार्मिक गाणी गायला या उत्सवामुळे संधी मिळे. या नाटकांतून आणि गाण्यांतून हिंदूंच्या पौराणिक कथांचा विदेशी राज्यकर्त्यांविषयी द्वेषभाव प्रदीप्त करण्यासाठी मोठ्या कौशल्याने उपयोग केला जातो. म्लेंच्छ ही उपाधी मुसलमान आणि युरोपीय दोघानांही सारखीच लागू असे. मुसलमान आणि पोलीस यांच्याशी संघर्ष व्हावा या हेतूनेच वरील उत्सवाच्या मिरवणुकी योजनापूर्वक आखलेल्या असत. अशा संघर्षातून उद्भवणाऱ्या खटल्यांमुळे निषेधाचा गदारोळ उडवून बचावासाठी ज्वलज्जहाल व्याख्याने द्यायला निमित्त सापडे. टिळकांच्या प्रचाराचे क्षेत्र गणेशोत्सवाबरोबरच विस्तार पावत गेले.” (कित्ता, पृ. ४९)

सार्वजनिक गणेशोत्सव जसजसा वाढत गेला, तसतसे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीमुळे अनेक ठिकाणी दंगेसुद्धा झाले. दंग्यामुळे हिंदूंचे आणि मुसलमानांचे हाडवैर पुन्हा वाढत गेले. हिंदूंच्या ताबुतावर बहिष्कार टाकण्याच्या चळवळीवर भाष्य करताना ‘दीनबंधू’ म्हणतो की, “पुणे, सोलापूर, नाशिक, सातारा वगैरे ठिकाणच्या पत्रावरून असे समजते की, तेथील हिंदूंनी आपले अंग बऱ्याच अंशी ह्या ताबूतातून काढले आहे. परंतु खेड्यापाड्यांनी म्हणजे जेथे मुसलमानाचे व हिंदूंचे कोणत्याही प्रकारे धर्मासंबंधी तंटे बखेडे झाले नाहीत, तेथे सालाबाद प्रमाणे त्यांजकडून ताबूत साजरे करण्यांत आले.” (दीनबंधू, २२ जुलै १८९४, मुसलमानाचे ताबूत  व आमचे हिंदू लोक)

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या एकूणच कार्यक्रमावर टीका करताना ‘दीनबंधू’ म्हणतो, “सन १८९३ साली मुंबईस हिंदू मुसलमानांत जो भयंकर दंगा झाला, त्याचा वारा दक्षिणेकडील कित्येक शहरात लागून हिंदू लोकांची मने मुसलमान लोकां संबंधाने साशंक होऊन त्यांनी आपले पाऊल मुसलमानांच्या ताबुतांतून काढले, अर्थात ताबुतांमध्ये लोकांस आपले मन रंगविण्यात व खेळण्या कुदण्यास मिळत होते ते बंद झाले. मनुष्यास वर्षातून एक दोन वेळा खेळण्या कुदण्यास व मनोरंजन करण्यास मिळणे अत्यावश्यकतेचे आहे. म्हणून पुण्यांचे लोकांनी ताबुतांतील फकिरांच्या मेळ्यांप्रमाणे आपणात गणपती  मेळे काढण्याचे सुरू केले. ह्या मेळ्यांकरिता स्वतंत्र रीतीने पोशाख व कवणे तयार केली. या कवनांत अज्ञान लोकांचा गैरसमज होण्यासारखी काही कवने आहेत. जे शहाणे व समंजस आहेत ते धर्माचे बाबतीत इतर कोणाकडून अविचारी वर्तन झाले तरी त्याची मने चळणार नाहीत, परंतु अज्ञान लोकांची स्थिती फार भिन्न आहे. यास्तव देशाची किंवा धर्माची ज्यास खरी चाड असेल त्यांनी मेळ्यांची टूम अज्ञान लोकांत न शिरेल असे यत्न केले पाहिजेत.” (दीनबंधू, ८ सप्टेंबर १८९५, गणपती उत्सवांतील नवी टूम)

वरील प्रकारचा सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास हल्ली अनेकांना माहिती नाही, पण आजही सार्वजनिक गणेशोत्सवाकडे हिंदूंचे संघटन करण्यासाठीचा एक सार्वजनिक कार्यक्रम म्हणून पाहिले जाते. हिंदू संघटनांसोबतच वेगवेगळ्या जातीय, पक्षीय आणि वैचारिक बांधीलकी मानणाऱ्या संस्था, संघटना जनसंपर्कासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग करून घेतात. या उत्सवातून अनेक भांडवली जाहिराती, धार्मिक-सांस्कृतिक देखावे आणि मनोरंजन बाजार निर्माण केला जातो आणि त्यातून एक नवधार्मिकतेचा साधक, उपभोक्ता आणि कार्यकर्ता जन्माला येतो. ह्या सर्व प्रक्रियेमुळे व्यक्तीचे आणि समाजाचे धर्मनिरपेक्षीकरण, इहवादीकरण कठीण बनते.     


देवकुमार अहिरे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इतिहास संशोधक विद्यार्थी आहेत.

धनश्री जगताप या  इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या एमएसडब्लूच्या विद्यार्थिनी आहेत.     


सदरील लेख- २५ सप्टेंबर २०१८ रोजी 'अक्षरनामा' या वेबपोर्टलवर प्रकाशित झाला होता.

बुधवार, ३ जून, २०२०

तीन मुद्द्यांची चर्चा!

१. अल्पसंख्याक: 
          सातत्याने अल्पसंख्याक लोकांच्या बाजूने बोलले जाते. परंतू अल्पसंख्याक या शब्दांची आणि समूहाची व्यामिश्रता लक्षात घेतली की त्यातील प्रश्न आणि समस्या आपणास समजू लागतात. मुळात अल्पसंख्याक बहुसंख्याक हे बायनरी इंग्रजांनी आपल्या देशात रुजवली आहे त्यामुळे अनेक वैचारिक आणि सामाजिक प्रश्न सुध्दा निर्माण झालेत. लोकशाहीने निवडणूकांमध्ये या बायनरीला यशस्वीरित्या रुजवले त्यामुळे जमातवादी राजकारणाला चालना मिळाली.
        अल्पसंख्याक म्हटले की नेहमी आपल्यासमोर मुस्लिम लोकांचा विचार येतो. यामागे वसाहतवादाने पेरलेल्या तत्वांचा आणि हिंदु मुस्लिम जमातवाद्यांचा आणि कॉंग्रेसचा मोठा वाटा आहे. आंबेडकर अल्पसंख्याक या शब्दाला धर्माच्या नव्हे तर जातीच्या स्वरूपात पाहत होते. म्हणून अल्पसंख्याक जातींच्या भवितव्याचा ते सातत्याने विचार करायचे. आज आपणास वांशिक अल्पसंख्याक आणि लैंगिक अल्पसंख्याक यांचाही गांभिर्याने विचार करावा लागेल. 
          बहुसंख्याकांच्या देशात अल्पसंख्याकांना विशेष प्रावधान असायला पाहिजे. पंरतू वेगवेगळ्या स्तरातील अल्पसंख्याकांनी आपसात कसे संबंध ठेवायला हवे किंवा त्यांच्यातील संबंध कसे असावे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. धार्मिक , जातीय, वांशीक आणि लैंगिक अल्पसंख्याक समूहांनी आपल्या अधिकारांची चर्चा करत असतांना इतर अल्पसंख्याक समूहांशी किंवा आपसात आपली अल्पसंख्याक सॉलीडॅरीटी विकसित करायला हवी तेंव्हा कुठे अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे हनन आणि दमन थांबेल.
२. जात: 
          जातीमुळे आरक्षण की आरक्षणामुळे जात , जातीमुळे लोकशाही फसली कि लोकशाहीमुळे जात टिकली अश्याप्रकारचे अनेक प्रत्येक सातत्याने विचारले जातात. अनेक विचारवंतानी जातीय शोषण विरोधी लढाई लढली आहे. काहीनी जाती व्यवस्था चांगली पण जातीय शोषण वाईट असे म्हटले, काहीनी जातीव्यवस्थाच वाईट आहे असे म्हटले आहे तर काहींनी जातीव्यवस्था ही उत्कृष्ट समाजरचना होती असेही म्हटले आहे. 
          जन्मांपासून मरणापर्यंत आणि म्हसनापर्यंत जात काही पिच्छा सोडत नाही. लग्नात जात, जेवनात जात, पेहरावात आणि बोलण्यात सुद्धा जात असते. म्हणजे भारतात असतांना तुम्ही जातीविना जगू शकत नाही.तुम्ही जगण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला लोक जातीशिवाय जगू देत नाहीत. यामुळेच आंबेडकरांनी जात ही एक एकक नसून एक समग्र व्यवस्था आहे असे तिचे वर्णन केले आहे.
          आजच्या काळात विशेषतः निवडणुकीच्या राजकारणात प्रत्येक जात एक वोट बँक बनल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. जातींच्या संख्येनुसार सत्तेत वाटा मिळत असल्यामुळे काही जाती या बेदखल होत आहेत. तर काही जाती या वरचड होत आहेत. अश्या काळात जातींचे आपसात संबंध हे तणावग्रस्त होत आहेत. आधीच जातीय विषमता असल्यामुळे समाजात त्याला प्रतिसाद मिळत आहे.
           जातीअंत करायचा की फक्त जातीय शोषण नष्ट करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. जात जर एक अस्मिता असेल तर ती कशी नष्ट होईल हाही यक्षप्रश्न आहे. धर्मांतर आणि आंतरजातीय विवाह हे महत्वाचे असले तरी त्यामुळे जातीअंत काही होत नाही हे इतिहासाने आपणास दाखवून दिले आहे. धर्मांतर करतांना कोणत्या धर्मात करायचे हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.  बौध्द, इस्लाम, शिख, जैन आणि ख्रिश्चन या धर्मांमध्येसुध्दा जाती दिसून येतात. जसे की सर्वधर्मिय ओबीसी संघटना, मुस्लिम दलित, ख्रिश्चन दलित आणि शिख दलित. काहींचे म्हणणे आहे की ही सर्व हिंदू धर्माची देण आहे तर काहींचे म्हणणे आहे की जातीचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही. त्यामुळे इस्लाम आणि ख्रिश्चन धार्मिक ग्रंथात जातीचा उल्लेख जरी नसला तरी भारतात जातवार चर्च आणि मस्जिद आहेत. हिंदुत्ववादी लोकांना हे कळत नाही.
            आजकाल प्रत्येक जात ही जातीवादी आणि ब्राम्हण्यग्रस्त होत आहे. अश्या काळात जातीअंत आणि जातीय शोषण विरोधी विचार कमकुवत होतांना दिसतोय. अनेक लोक आंतरजातीय विवाह करतात पण आंतरधर्मिय विवाहांना विरोधही करतात. 
३. लैंगिकता: 
            बर्याचदा भारतीय लोक लैंगिकदृष्ट्या दांभिक आहेत असे म्हटले जाते त्यावेळी मला नेहमी प्रश्न पडतो की, हे खरच आहे का? कामसुत्र, खजूराहो, तंत्रयान, लिंग योनी पुजा असणार्या देशात अशी लैंगिक दांभिकता कशी निर्माण झाली हा प्रश्न पडतो. संस्कृती रक्षकांना खजूराहोच्या मंदिरात घेवून जावे असेही वाटते. काही लोकांना इस्लाम इथे आल्यावर लैंगिक दांभिकता वाढली असे वाटते मग मनुस्मृतींमध्ये वर्णसंकराविषयी काय लिहिले आहे हाही प्रश्न त्यांना विचारावासा वाटतो. इंग्रजांनी विक्टोरीयन नैतिकतेच्या माध्यमातून अनेक कौटुंबिक आणि स्त्री विषयक सुधारणा केल्या त्यामध्ये संभोग कधी करायचा आणि कोणाशी करायचा याचेही कोडीफीकेशन झाले. काही लैंगिक संबंधाना अनैसर्गिक ठरवले गेले. समलैंगिक संबधांना कायद्याच्या माध्यमातून बेकायदेशीर ठरविले गेले. वस्तूत: खजूराहोच्या चित्रांमध्ये समलैंगिक पुरुषांचे चित्रण आहे त्यावरून त्या काळात असे संबंध समाजमान्य असावेत किंवा चालू असावेत असा तर्क आपण लावू शकतो.
           स्त्री पुरुष संबंधांचा नेहमी लैंगिक अर्थाने विचार केला जात असल्यामुळे अनेक प्रत्येक निर्माण झाले आहेत. गे, लेस्बीयन, बायोसेक्सूल लोकांविषयी संशयी आणि गुन्हेगारी दृष्टीने पाहिले जाते. आणि स्त्री पुरुष लैगिंक संबंधाचे नैसर्गिकीकरण केले गेले आहे. पितृसत्ताक जातीय समाजात स्त्री ची लैंगिकता ही नेहमी रणक्षेत्र बनते. म्हणून मुलींनी कोणासोबत लग्न करावे, कोणते कपडे घालावेत, किती मुले जन्माला घालावीत या विषयी लैंगिकतेचे ठेकेदार आदेश सोडत असतात. 
           काचेच भांड, पेटी पॅक, शील पॅक असे शब्दप्रयोग स्त्री च्या कौमार्यासंदर्भात वापरली जातात. आणि मुलांनी जास्त मुली फिरवणे ही त्याची पुरुषत्वाची निशाणी मानली जाते.  स्त्री ला बदनाम करण्यासाठी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले की आपोआप ती स्त्री संपते अशीही धारणा समाजाची आहे. सिनेमा, खेळ आणि राजकारणातील स्त्रीयांवर नेहमी त्यांच्या लैंगिकतेवरून घाणेरडे जोक्स केले जातात. विवाहीत स्त्री आणि साध्वी स्त्रीच्या तुलनेत अविवाहीत स्त्री ही प्रथम लक्ष असते. प्रशासनातील स्त्रिया विषयी सुध्दा असाच विचार होतो. परिवर्तनवादी चळवळीमध्ये सुद्धा लैंगिकतेसंदर्भात खुपच गोंधळ आहे. फुले आंबेडकरी चळवळीपासून ते मार्क्सवादी माओवादी चळवळी पर्यंत याचे अनेक घोळ आहेत. हिंदुत्ववादी संस्था संघटनामध्ये तर झाकली मुठ सव्वा लाखाची आहे.  शिक्षण क्षेत्रात तर लैंगिक शोषणाचे मोठे प्रमाण वाढले आहे.
          सध्या कुमारी मातांचे प्रमाण वाढले आहे. प्रोनोग्राफी ही आता खेड्यातील गळ्ळी बोळात तुम्हाला सापडू शकते.  

२०१६ सालची नोंद. 

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...