इतिहास पाठ्यपुस्तक आणि दंगल यांचा नेहमीच जवळचा संबंध राहिला आहे. १९२९ च्या मुंबईच्या दंगलीचा अभ्यास करतांना लोकांना विचारले असतांना पाठ्यपुस्तक आणि इतिहास शिकवण्यामुळे सुद्धा द्वेष, पूर्वग्रह वाढतात असे लोकांनी सांगितले होते. नंतर दंगलींचा अभ्यास करणाऱ्या अनेक अभ्यासकांना सुद्धा इतिहास शिकवणे आणि दंगल यांचा संबंध आढळून आला आहे. 'हिंदू-मुस्लीम दंगली' या अलीम वकिलांच्या अभ्यासपूर्ण संशोधनात सुद्धा त्यांनी इतिहास शिकवणे, पाठ्यपुस्तक आणि दंगल यांची चर्चा केली आहे. वसंत पळशीकर, बिपीन चंद्र, दिलीप सायमन या दंगलींच्या अभ्यासकांनी सुद्धा यावर चर्चा केलेली दिसते.
इतिहास लेखन, इतिहासाचे पाठ्यपुस्तक निर्मिती आणि इतिहास शिकवणे या सर्व गोष्टींचा वैचारिक आणि बौद्धिक राजकारणाशी संबंध असतो. या वैचारिक आणि बौद्धिक राजकारणाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा निवडणुकीचे राजकारण, दंगलीचे राजकारण आणि अस्मितेचे राजकारण यांना फायदा होत असतो. इतिहासाचे पाठ्यपुस्तक नेहमीच राजकीय रणभूमी बनत असते. जगाच्या इतिहासात आणि वर्तमानात २ वर्षांनी आणि ५ वर्षांनी सगळेच पाठ्यपुस्तके आणि त्यांचा अभ्यासक्रम बदलतो. पाठ्यपुस्तके आणि अभ्यासक्रम बदलने हे शिक्षणशास्त्राच्या आणि अध्यापनपद्धतीच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचे आहे. पण, माघील ४०-४५ वर्ष झाले तरीही आपल्याकडील (महाराष्ट्रातील) चौथीचे इतिहासाचे पाठ्यपुस्तक बदलत नाही. झालीच तर काही ओळींचे संशोधन होते किंवा बदल होते किंवा दुरुस्ती -विस्तृती होते.
दि. के. बेडेकर म्हणतात की, 'शिवाजी हा संप्रदाय नायक झाला आहे.' त्यामुळे पक्षांच्या पातळीवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी पासून ते भाजप, सेनापर्यंत तसेच, भारिप आणि मार्क्सवादी पक्ष , कोणीही सत्तेत आले तरी ते शिवाजी महाराजांचे चौथीचे पाठ्यपुस्तक बदलू शकत नाही कारण सर्वच वैचारिक आणि पक्षीय गटांना हे राजकीयदृष्ट्या पेलवणारे नाही. त्यामुळेच तर आपल्याला राष्ट्रवादी शिवाजी, बहुजन शिवाजी, कम्युनिस्ट शिवाजी, हिंदुत्ववादी शिवाजी, सेक्युलर शिवाजी, ब्राह्मणेत्तर शिवाजी, मराठा शिवाजी असे अनेक शिवाजी आपल्या आजूबाजूला आहेत. अशा प्रकारचे राजकारण प्रभावी असतांना तुम्ही शिवाजीच्या इतिहासाचे पाठ्यपुस्तक बदलणे तर सोडा त्यात मुलभूत दुरुस्त्यासुद्धा करू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे.
शेजवलकर लिहितात की, 'मध्ययुगीन इतिहासाचा समंध महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसला आहे.' त्याचप्रमाणे फडकेंनी सुद्धा 'मराठी माणूस मध्ययुगीन इतिहासात रमतो' असे लिहून ठेवले आहे. या दोन्ही उदाहरणावरून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. जेष्ठ शिक्षण अभ्यासक कृष्ण कुमार म्हणतात की, 'इतिहासात जगणे' आणि 'इतिहासासोबत जगणे' यामध्ये आपण फरक करायला हवा. आपली जातीय, धार्मिक, लैंगिक, भाषिक अस्मिता इतिहासाच्या दीर्घ प्रक्रियेतून जन्माला आलेली असते आणि त्या प्रक्रियेतूनच अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पूर्वग्रह, गैरसमजुती, गफलती सुद्धा आपल्यासोबत आलेल्या असतात. या सर्व गोष्टी आपणास इतिहासाच्या किंवा सामाजिक शास्त्रांच्या वर्गात निर्विग्नपणे, मोकळ्या, खुल्या आणि संवादी वातावरणात समजून घेता आले पाहिजे मगच, इतिहास शिकवणे, पाठ्यपुस्तक आणि दंगल यांचा संबंध आपणास दूर करता येईल किंबहुना वेगळा करता येईल.
हल्ली, जगभर Subaltern school संपले आहे असे लोक म्हणत आहेत. पण आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात लोक अजूनही Subaltern school हे नवीन प्रवाह आहे असेच शिकवत असतात. अभ्यासाचा अविर्भाव आणणाऱ्या काहींना तर अजूनही Subaltern म्हणजे नेमकं काय हेच कळत नाही. तरीही ते Subaltern school कसे चुकीचे आहे असे. मांडत असतात. अनाल्स स्कूल, सायको हिस्ट्री, हिस्ट्री ऑफ मेंटालिटी, मेमरी स्टडीज याचा तर आमच्या इतिहासाच्या अभ्यासकांच्या सार्वजनिक चर्चेला गंध सुद्धा नाही. इतिहास शिक्षकांनी नवीन प्रशिक्षण, नवीन विचार, तंत्र, सिद्धांत, पद्धती आत्मसात करून स्वतःला अद्यावत केल्याशिवाय हे होवू शकत नाही हेही तेवढेच वास्तव आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा