शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लिव्हिंग बुद्धिझम!


           जानेवारी महिन्यात अमेरिकन बौद्ध अभ्यासक (विशेषत: तिबेटीयन बुद्धिझम) जोएल ग्रूबर याच्यासोबत डॉ. श्रद्धा कुंभोजकरांमुळे काम करता आले. ग्रूबर हा मुळात आधी सांगितल्याप्रमाणे तिबेटीयन बुद्धिझमचा अभ्यासक पण, हल्ली तो आंबेडकरी बुद्धिझमचा अभ्यास करतोय. त्याच्या अभ्यासासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ३०-३१ नवबौद्ध/बौद्ध विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यात प्रत्येकाचे एक स्वतःचे आकलन आहे. एकाचे मत दुसऱ्याची बहुतेकवेळा जुळत नाहीत. धम्म, बुद्ध, बौद्ध धर्म, दर्शन, संप्रदाय, बाबासाहेब, त्यांचे लिखाण, राजकीय मते, राजकीय भूमिका अशा अनेक गोष्टी प्रश्नाच्या स्वरुपात विचारल्या गेल्या होत्या. त्याची उत्तरे सुद्धा प्रत्येकाने आपआपल्या कुवतीप्रमाणे आणि समजेप्रमाणे प्रमाणे दिली.

          जोएलला घेवून काही विहारात गेलो होतो.एका विहारात तर उपासक आणि भिक्षु यांच्यात वैचारिक वादविवाद चालू होता. बाबासाहेब नेमकं काय म्हणाले आणि बुद्धाला नेमकं काय अभिप्रेत होते या संदर्भात दोघांचा वाद चालू होता. मी जोएलला हे सगळे भाषांतर करून सांगत होतो. त्यावर तो म्हणाला की, " मी अनेक देशातील बौद्धाविषयी ऐकून आहे आणि काहींचा अभ्यासही केला आहे पण, अशी वादविवादाची जीवंत परंपरा जगात कुठेच नाही." बौद्ध धर्मात जी वादविवादाची जीवंत परंपरा होती ती आता फक्त महाराष्ट्रात म्हणजे आंबेडकरांच्या भूमीतच दिसते आहे कारण, बहुतेक देशांमध्ये बौद्ध गुरूंच्या पुढे काहीही बोलायचे नसते किंवा प्रतिप्रश्न करायचा नसतो असा अलिखित नियमच आहे असे तो म्हणाला.


          पुणे शहरातील काही विहारांना, व्यक्तींना भेटी दिल्यावर आमची चर्चा झाली त्यात
जोएल म्हणाला की, " हल्लीच्या महाराष्ट्राच्या बौद्ध व्यवहारात हीनयान, महायान आणि वज्रयान अशा सगळ्याच बौद्ध संप्रदायांचा प्रभाव दिसतो." बाबासाहेबांनी जरी 'नवयान' असा शब्द वापरला असला तरीही त्या नवयानाचे असे स्वतंत्र रिच्युअल (उपासना विधी) समग्र अर्थाने विकसित झालेला नसल्याने त्यामध्ये हळूहळू हीनयान, महायान आणि वज्रयान विधी येत आहेत. हे सुद्धा जागतिक बौद्ध धम्म चळवळीच्या निमित्ताने वेगळेपण आहे. कारण, काही देशात पूर्णपणे हीनयान तर काही ठिकाणी पूर्णपणे महायान परंपरा पाळली जाते. त्यामुळेचजोएलच्या मते, 'आंबेडकरांमुळे संपूर्ण बौद्ध धम्माचा आणि परंपरेचा नव्याने अर्थ लावला जात आहे आणि मूळ बौद्ध विचारला आत्मसात केले जात आहे." ३०-३१ विद्यार्थ्यांच्या दृष्टीत बाबासाहेबांचे बौद्ध धम्माच्या पुनर्जीवनात अनन्य साधारण महत्व आहे किंबहुना बाबासाहेब नसते तर बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवनच झाले नसते असेही काही जन म्हणाले होते त्यामुळे जोएल हा बाबासाहेबांना 'चौथे बुद्ध' म्हणतो. त्यावर मी त्याला म्हटलो की, चौथे बुद्ध म्हणणे काही बौद्धांना आवडणार नाही त्यावर तो म्हणाला की, " बौद्ध धम्माच्या इतिहासात ज्याने बौद्ध धम्माच्या प्रसारात, दर्शनात आणि विचारात बहुमोल योगदान दिले त्यांना इतिहासात बुद्धानंतरचे बुद्ध म्हटले गेले आहे. त्यात नागर्जुनाला 'दुसरे बुद्ध' आणि तिबेट मध्ये विमलकीर्तीला 'तिसरे बुद्ध' म्हटले गेले आहे आणि म्हणून मी आंबेडकरांना 'चौथे बुद्ध' म्हणत आहे."


           
जोएलने तिबेटीयन बुद्धीझमचा लडाक, मंगोलिया, सेंट्रल आशियामध्ये कसा प्रसार झाला हे सांगितले सोबतच आज जरी तिबेटी लोक जगभरात शांततेसाठी प्रसिद्ध असले तरी त्यांचा इतिहास खूपच हिंसेने भरला आहे हे सांगायला सुद्धा तो विसरला नाही. जोएल स्वतः काही वर्ष तिबेटी बौद्धांमध्ये राहिला आहे. त्यातही तिबेटीयन तांत्रिक बौद्धधम्माची त्याने दीक्षा सुद्धा घेतलेली आहे. अमेरिकेमध्ये मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात बुद्धिझमकडे लोक नव्याने आकर्षित होत आहेत म्हणून तो मानसिक आरोग्य केंद्राचा सुद्धा भाग आहे पण, येथून पुढे त्याला आंबेडकरी बुद्धिझमवर काम करायचे आहे असे तो म्हणाला. त्याचे कारण विचारले असता तो म्हणतो की, " आंबेडकरी बुद्धिझम हा समाजाविषयी अधिक बोलतो. त्यामुळे यातून समाजासाठी काहीतरी करता येईल." यातून एकच गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे महाराष्ट्रातील जीवंत आंबेडकरी बुद्धिझम मानवी हक्क, वैज्ञानिक दृष्टीकोन, मानसिक आरोग्य आणि सामाजिक नितीमत्ता यांच्या संदर्भात काम करणाऱ्या लोकांसाठी अभ्यासासाठी चांगला संशोधन विषयवस्तू आहे. त्यामुळेच मानवी हक्क पासून तर धर्म आणि आधुनिकतेपर्यंत अभ्यास करणाऱ्या संशोधकांचे लक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकडे वळवून घेतले आहे.

 

मूळ फेसबुक पोस्ट २०१८ साली लिहिलेली आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...