रविवार, २० जून, २०२१

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे तीन प्रतिक्रिया पत्रे!

 

            ‘आंबेडकर अभ्यास ही सामाजिक शास्त्रात आणि चळवळींमध्ये सातत्याने चर्चिली जाणारी ज्ञानशाखा आहे. तसेच, ती एक आंतरविद्याशाखीय अभ्यासपद्धतीसुद्धा आहे. देश-विदेशात धर्म, समाज, सामाजिक न्याय, मानवी हक्क, राजकरण, लोकशाही, लिंगभाव, जात, पितृसत्ता, कायदा, राष्ट्रीय सुरक्षा,  संघराज्य- राज्य संबंध, आणि हिंसा अशा अनेक विषयांच्या संदर्भात ‘आंबेडकर अभ्यास’ विकसित होत आहे. आंबेडकरकालीन व्यक्ती, संस्था, संघटनेंच्या इतिहासातून ‘आंबेडकर अभ्यास’ विस्तृत झाला असून आंबेडकरोत्तर काळातील लेखन, चळवळ, चिंतन आणि मंथनातून ‘आंबेडकर अभ्यास व्यापक बनत आहे. म्हणूनच, आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर वृत्तपत्रसंचिका, चरित्रे, आत्मचरित्रे, आठवणी, रोजनिशी, पत्रके  आणि पत्रव्यवहार यांचा आंबेडकरी चळवळीच्या आणि आंबेडकरांच्या बौद्धिक इतिहासाची आणि विचारविश्वाची पुनर्रचना, बांधणी आणि  मांडणी करतांना अत्यंत उपयोग होतो असे दिसते.  डॉ. आंबेडकरांच्या साहित्य व्यवहारावर अनेकांनी भाष्य आणि मांडणी केली आहे. प्रारंभीच्या कालखंडात त्यांच्या पत्रव्यवहारावर संपादन वगळता म्हणावे तसे अभ्यासपूर्ण अभ्यास झाले नव्हते. मागील काही वर्षांमध्ये अभ्यासकांनी ती उणीवही भरून काढली आहे. परंतु, अजूनही आंबेडकरांच्या प्रतिक्रिया पत्रांवर म्हणावा तसा सविस्तर अभ्यास झालेला दिसत नाही.

          डॉ. आंबेडकर विरोधकांच्या पत्रांना  वेळेच्या अभावी खूपच कमी वेळा उत्तरे द्यायचे असे दिसून येते. त्यामुळेही प्रतिक्रिया प्रत्रांवर म्हणावे तसे संशोधन झाले नसावे असे वाटते. परंतु, आंबेडकरांची प्रतिक्रिया पत्रे ही आंबेडकरी चळवळीच्या आणि आंबेडकरांच्या बौद्धिक इतिहासाच्या पुनर्लेखनासाठीचे अत्यंत महत्वाचे दस्ताएवज आहेत. ‘प्रतिक्रिया पत्र हा महत्वाचा प्रकार आहे कारण, त्यामध्ये पूर्वी आलेल्या पत्राच्या आरोपाचा, टीकेचा आणि हेतूचा समाचार घेतला जातो. त्याची चिरफाड केली जाते आणि मग, आपली भूमिका स्पष्टपणे मांडली जाते. म्हणून प्रतिक्रिया पत्र हे इतिहासाचे अत्यंत महत्वाचे ऐतिहासिक साधन ठरते. सदरील लेखात डॉ. आंबेडकरांच्या अशाच महत्वाच्या तीन प्रतिक्रिया पत्रांची चर्चा करण्यात येणार आहे आणि त्यावर भाष्य करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया पत्र क्र. १

            ऑक्टोबर १९३५ मध्ये येवला मुक्कामी डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. बाबासाहेबांच्या घोषणेला  महाराष्ट्रातील आणि देश- विदेशातील विद्वान, नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्या प्रतिसादांची चर्चा करणे हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेला अनेकांनी समर्थन जसे दिले तसाच विरोधही केला. विरोध करूनही काही फरक पडत नाही म्हणून अनेकांनी आंबेडकरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, काहींनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि काहींनी काय नुकसान होवू शकते अशी आकडेवारी मांडली. अशा अनेक व्यक्तींमध्ये वेदपंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा समावेश होतो. त्यांनी ‘पुरुषार्थ नामक त्यांच्या मासिकात ‘आंबेडकरांचे कर्तव्य असा लेख नोव्हेंबर लिहिला. तसेच, २ डिसेंबर एक पत्रही डॉ. आंबेडकरांना पाठवले. पुरुषार्थ मासिकातील लेखात सातवळेकरांनी काही आरोप आंबेडकरांवर केले होते. त्याविषयी प्रतिक्रिया पत्रात डॉ. आंबेडकर लिहितात की,

   “ आपल्याप्रमाणे इतर हिंदू लोकांनीही माझ्या धर्मांतरासंबंधाने बरेवाईट विचार प्रसिद्ध केलेले माझ्या वाचनात आलेले आहेत. परंतु त्यापैकी कोणालाही उत्तर देण्याच्या भानगडीत मी पडलो नाही. इतर लेखकांनी जे लिहिलेले आहे. त्यापेक्षा आपल्या लेखात विशेष असे मला काही दिसून आले नाही आणि म्हणूनच आपले पत्र येईपर्यंत आपल्या लेखाला उत्तर देण्याचे कधीच माझ्या मनात आले नव्हते. तथापि ज्याअर्थी उत्तर यावे अशी मागणी केली आहे व त्यास प्रत्युत्तर देण्याची आपण जी उत्कंठा व्यक्त केली आहे, त्याअर्थी आपली निराशा करू नये एवढ्या कारणाकरिता आपल्या लेखासंबंधाने मला काय वाटते, ते मी आपणास लिहून कळवीत आहे.”

सातवळेकरांनी डॉ. आंबेडकर हे व्यावहारिक फायद्याकरिता धर्मांतर करीत आहेत असा आरोप केला होता. तसेच, धर्मांतर केल्यामुळे त्यांचे महारपण जाईल आणि त्यामुळे त्यांची विद्वत्ता राहणार नाही असेही त्यांनी म्हटले होते. त्याविषयी डॉ. आंबेडकर आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात की,

         “मी धर्माकरिता धर्मांतर करीत नसून व्यावहारिक फायद्याकरिता ते करीत आहे, असा माझ्यावर जे लोक आक्षेप करतात, त्यांपैकी आपण एक नाही, हे वाचून मला आनंद वाटतो. नफातोटा पाहून धर्मांतर करायचे ते करा, असा आपला सल्ला आहे. त्याची यथार्थता मला पटते. मी ते विसरलो नव्हतोच. पण आपण आठवण दिली, हे बरे केलेत. या धर्मांतराच्या सौद्यामध्ये जमाखर्चाचा जो तक्ता माझ्या समजुतीप्रमाणे मी तयार केला आहे. त्यात तोट्यापेक्षा नफा मला जास्त दिसतो. परंतु आपल्या म्हणण्याप्रमाणे नफ्यापेक्षा तोटाच जास्त आहे हे जरी खरे धरले, तरी ज्या कारणांमुळे मी धर्मांतर करू नये असे आपण म्हटले आहे ते खरे आहे. परंतु माझे महारपण नाहीसे झाल्यानंतर माझे मोठेपण लयास जाईल असे जे मत आपण व्यक्त केले आहे, ते एक तर माझ्या विद्वत्तेसंबंधी आपल्या अज्ञानाचे द्योतक असावे किंवा ब्राह्मणेत्तरांच्या विद्वतेसंबंधाने ब्राह्मणांच्या मनात वसत असलेल्या क्षुद्र बुद्धीचे द्योतक असावे. माझे महारपण गेले तरी माझी विद्वत्ता कायम मजजवळ राहणार आहे व ती काही लहानसहान नाही. ब्राह्मण जातीच्या विद्वानांच्याबरोबर मला तागडीत घातले असताना माझे पारडे कमी भरेल ही आपली भीती निरर्थक आहे. त्या विषयात पारंगत असलेल्या ब्राह्मण जातीतील कोणत्याही व्यक्तीशी मी बरोबरी  करू शकेन अशी माझी खात्री आहे. केवळ महार म्हणून राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये मला जागा मिळाली हे खरे असू शकेल. परंतु त्यातून काय सिद्ध झाले याचा पुरावा तपास आपण केला असता तर असे खुळे व वेडगळ विचार आपण पुढे मांडले नसते. म्हणून राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये हिंदूमधल्या गाजलेल्या व्यक्ती होत्या. त्यांत पुण्यातील ब्राह्मण जातीचे शिरोमणी तात्यासाहेब केळकर हेही होते. मांडीला मांडी लावून बसण्याचा योग सुदैवाने उभयतांस लाभला होता. त्याप्रसंगी मला त्यांची विद्वत्ता आणि त्यांना माझी विद्वत्ता ताडून पाहण्याची वेळ आली होती. त्यावेळच्या अनुभवावरून त्यांच्यापेक्षा विद्वत्तेने किंवा बुद्धिमत्तेने कमी आहे असे माझ्या स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. तेव्हा केवळ माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मला जे स्थान मिळेल ते मोठेच मिळेल, याच्याबद्दल मला काही शंका नाही. आडपडदा न ठेवता एवढे स्पष्ट लिहिण्याचे काही प्रयोजन नव्हते. परंतु आपल्यासारख्या ब्राह्मणाशिवाय दुसऱ्या कोणाही जातीच्या लोकांत बुद्धिमत्ता, विद्वत्ता नाही अशा दुर्मदाने माखलेल्या लोकांचा भ्रम नाहीसा करण्याकरिता तसे लिहिणे आवश्यक झाले, याबद्दल खेद वाटतो. माझे मोठेपण कायम राखण्याकरिता आपण जी चिंता प्रगट केली त्याबद्दल आपला मी आभारी आहे. मी कोठेही गेलो तरी माझ्या विद्वत्तेनुरूप व बुद्धीमत्तेनुरूप जे मोठेपण मला प्राप्त व्हावयाचे ते होईलच, याबद्दल आपण कसलीच चिंता बाळगू नये. परंतु अस्पृश्यांत राहिल्याशिवाय माझे मोठेपण राहणार नाही, हे जरी खरे धरले तरी माझे मोठेपण कायम राहण्याकरिता अस्पृश्य लोकांनी अस्पृश्यच राहावे, ही विचारसरणी अत्यंत विलक्षण, नव्हे वेडसरपणाची आहे, असे मला वाटते.”

सातवळेकरांच्या लेख आणि पत्रानिमित्ताने डॉ. आंबेडकर एकूणच जातीच्या मानसिकतेची चिकित्सा करतात आणि ब्राह्मण तत्सम वरचढ आणि प्रभावशाली जातीतील व्यक्तींच्या जातीवादी व्यवहारावर हल्ला करतांना लिहितात कि,

“आपल्या जातीचा व आपला मोठेपणा रहावा, याकरिता बाकीच्या लोकांना खाली कायमचे दडपून ठेवणे हा ब्राह्मणादी तत्सम जातींचा शिरस्ता होऊन बसला आहे. तसे जर नसते तर ब्राह्मणादी तत्सम जातींनी इतर जातींचा उद्धार करण्याकरिता त्या जाती आपल्या बरोबरीच्या होऊन आपला दर्जा कमी होईल अशा भीतीने केव्हाही कच खाल्ली नसती. परंतु आपले महत्व राखण्याकरिता दुसऱ्यांना नरकात डांबून ठेवणाऱ्या लोकांना मी नीच कोटीतील लोक समजतो. तशा नीचांपैकी मी नाही याची आपल्याला जाणीव नाही, असे वाटते. माझे महत्व जरी बुडाले तर बुडो, परंतु आमचे लोक वर यावेत हीच माझी एक भावना आहे, याशिवाय दुसरी भावना नाही याची आपण खात्री बाळगावी.”

सातवळेकरांनी आपल्या लेखात अस्पृश्यांनी हिंदू धर्मातच रहावे आणि हिंदूंनी जसे वागविले तसे वागावे असे म्हटले आहे. त्यावर डॉ. आंबेडकरांनी कठोर टीका केली आहे. तसेच, सातवळेकरांना तुमचा आणि माझा अनुभव सारखा नाही असे म्हणून आपल्या सामाजिक आयुष्याचे वेगळेपण दाखवून दिले. त्या संबंधी डॉ. आंबेडकर लिहितात की, 

“आम्ही हिंदू आहो, हिंदूबरोबरच जगणार व हिंदूबरोबरच मरणार. हिंदू लोक आम्हांस जसे ठेवणार असतील तसे ठेवोत, पण आम्ही हिंदूंची, हिंदू धर्माची, हिंदू देवतांची अब्रू राखण्यासाठीच आपले सर्वस्व अर्पण करणार’ अशी घोषणा अस्पृश्यांनी करीत राहावी, म्हणजे हिंदूंच्या मनाला द्रव फुटून हिंदू लोक अस्पृश्यांकरिता पुष्कळसे काही करतील असा जो आपण पोक्तपणाचा सल्ला दिला आहे, तो दुसऱ्या कोणातरी अस्पृश्य पुढाऱ्याला पटेल, पण मी तो पत्करू शकणार नाही. एक तर आपला अनुभव माझ्या अनुभवाशी जुळता नाही. दाढीला हात लावून हिंदूंनी मोठेसे औदार्य दाखविले आहे असे एखादेदेखील उदाहरण मला आढळत नाही. पण त्यांची शेंडी धरून त्यांच्याकडून बरेचसे करवून घेतल्याची अनेक उदाहरणे माझ्या अनुभवावरून सांगता येतील. शिवाय हिंदू धर्म हा माझ्या मते धर्म नसून लोकांना वेडे करण्याची ही एक जडी आहे. हिंदू समाज हा वेडसर लोकांचा समाज आहे. असा वेडसर लोकांत राहण्याचा माझा इरादा नाही. अर्थात त्यांची मनधरणी करण्याची मला जरुरी नाही.” 

प्रतिक्रिया पत्र क्र. २

            १९३६ मध्ये जातपाततोडक मंडळाने डॉ. आंबेडकरांची आपल्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड केली होती. परंतु, ऑक्टोबर १९३५ मध्ये डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यामुळे जातपाततोडक मंडळाचे चालक आणि पालक मंडळींमध्ये मतभेद उत्पन्न झाले आणि पुढे परिषद आधी तहकूब झाली आणि मग रद्द झाली. या एकूण प्रक्रियेवरसुद्धा स्वतंत्र लेख लिहिता येवू शकतो एवढी ही मजेशीर, गुंतागुंतीची आणि डावपेचात्मक राजकारणाची घटना होती. मंडळाची परिषद होत नाही म्हणून डॉ. आंबेडकरांनीच परिषदेसाठी तयार केलेले भाषण छापून टाकले. हेच भाषण पुढे जगप्रसिद्ध ‘जातीनिर्मूलन पुस्तक म्हणून प्रसिद्ध झाले.  या भाषणामध्ये सवर्ण हिंदूंना केंद्रस्थानी ठेवून डॉ. आंबेडकरांनी मांडणी केली आहे. ती राजकीय आणि अभ्यासपूर्ण अशी दोन्ही प्रकारची आहे.

          जातीनिर्मूलन ह्या पुस्तिकेतील काही मुद्द्यांची चिकित्सा करणाऱ्या यशवंत नरसिंह केळकरांचे पत्र केसरी वृत्तपत्राने ५ जून १९३६ रोजी प्रकाशित केले होते. तसेच, केळकरांच्या पत्राचा आधार घेवून श्री. म. माटे भाषणांमध्ये डॉ. आंबेडकर सदरील पत्राला उत्तर देवू शकले नाहीत असे उल्लेख करत होते म्हणून डॉ. आंबेडकरांनी केळकरांच्या पत्राला प्रतिक्रिया दिली. त्या संबंधी ते लिहितात की,

  “...पेशवाईच्या अंमलात अस्पृश्यांच्या गळ्यात थुंकण्याकरिता मडकी बांधली जात असत वगैरे जी विधाने मी माझ्या ‘जातपात तोडक मंडळा’च्या परिषदेकरिता तयार केलेल्या भाषणामध्ये केलेली आहेत त्यांना आधार दाखवा, असा प्रश्न त्यांनी मला केला आहे. वृत्तपत्रातील टीकेला उत्तर देण्याचा माझा शिरस्ता नाही व त्याप्रमाणे या पत्रालाही उत्तर देण्याची माझी इच्छा नव्हती. परंतु परवा माटे मास्तरांनी जी माझ्या भाषणावर तीन व्याख्याने दिली त्यांत त्या पत्राचा उल्लेख  करून त्याला मी उत्तर देऊ शकलो नाही असे सखेदाश्चर्य विधान केलेले माझ्या पाहण्यात आले. आधार नाही म्हणून उत्तर नाही असा कदाचित माटे मास्तरांप्रमाणे इतर लोकांचा गैरसमज होण्याचा संभव आहे. म्हणून उत्तर देणे आवश्यक आहे असा काही मित्रांचा आग्रह असल्यामुळे मी. रा. केळकर यांच्या पत्राला उत्तर देत आहे.”

जातीनिर्मूलन पुस्तकामध्ये उल्लेख केलेल्या घटनांना कोणताही कागदोपत्री पुरावा दाखवा असे केळकरांचे म्हणणे होते तर त्यावर सगळ्याच गोष्टींचा, घटनांचा आणि अनुभवांचा कागदपत्रांमध्ये नोंद केली जात नाही. तसेच, कागदपत्रांमध्ये नोंद करणारे कोण असतात?  त्यावर कशाची नोंद करायची हे ठरत असते अशी डॉ. आंबेडकरांची प्रतिक्रिया होती. इतिहास लेखनशास्त्रात प्रभुत्वशाली असलेल्या प्रत्याक्षार्थवादी पद्धतीची डॉ. आंबेडकर चिकित्सा करतात आणि कागदपत्रांच्या पलीकडच्या साधनांचाही इतिहासलेखनात उपयोग झाला पाहिजे असे म्हणतात. तसेच, तत्कालीन महाराष्ट्रातील इतिहासकरांचे समाजशास्त्र हे अभिजनवादी असल्यामुळे आणि त्यांच्यावर प्रत्याक्षार्थवादी प्रभाव असल्यामुळे ते कागदपत्रांच्या पलीकडे पाहणार नाहीत याचीही त्यांना जाणीव होती म्हणून ते लिहितात की,

 “...पेशव्यांच्या काळात हातात काळा दोरा, गळ्यात मडके व कंबरेला कुंचा वागवण्याची अस्पृश्य लोकांवर सक्ती केली जात असे ही कथा अस्पृश्य लोकांमध्ये कितीतरी दिवसांपासून प्रसृत झालेली आहे. ‘यत्र धूमस्तत्र वह्नि:’ या न्यायाने पाहता ही जी दंतकथा सर्व अस्पृश्य लोकांत पसरलेली आहे व जिचा अनुवाद (उल्लेख) अस्पृश्य लोकांतील वयोवृद्ध लोकांनी केलेला मी स्वत: ऐकला आहे, त्या दंतकथेला सत्याचा आधार काहीच नसेल असे मला तरी निदान म्हणता येणार नाही, दंतकथा ही इतिहासाच्या अनेक साधनांपैकी एक साधन आहे असे सर्व इतिहासज्ञ मान्य करतात, ही गोष्ट रा. केळकर यांना नाकबूल करता यावयाची नाही. सर्वच गोष्टीला इतिहासाचा पुरावा देणे शक्य होणार नाही. निदान हिंदुस्थानात तरी ते अशक्य आहे. हिंदुस्थानातील लोकांना घडलेल्या गोष्टींची नोंद करून ठेवण्याची सवय नाही आणि म्हणून बऱ्याचशा घडलेल्या गोष्टी घडल्या असल्या तरी त्याला लेखी पुरावा देता येत नाही. शिवाय हल्ली जे इतिहाससंशोधक आहेत ते सर्वच सद्सदविवेकबुद्धीला जागून खरा इतिहास बाहेर पाडतील अशी फारशी आशा मला तरी वाटत नाही. आपल्या जातीचा इतिहास उज्ज्वल राहावा या हेतूने पुष्कळ इतिहाससंशोधकांनी हिंदू समाजातील अंतरव्यवस्थेवर प्रकाश पाडणाऱ्या काही महत्वाच्या कागदपत्रांची जाळपोळ केल्याचे मी ऐकले आहे.”

डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या पत्रात पुढे पेशवाईतील सोनार आणि ब्राह्मण यांच्या वादासंदर्भातील कागदपत्रे, घटना यांची चर्चा केली आहे आणि त्यातून हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, अनेक जनांजवळ कागदपत्रे असतात पण, सामाजिक परिस्थितीमुळे लोक ते प्रसिद्ध करत नाहीत. तसेच, काही प्रत्यक्ष परिस्थितीचा कागदोपत्री पुरावा उभा करतात येत नाही असेही ते म्हणतात. पत्राच्या शेवटी, केळकरांना ते राजारामशास्त्री भागवत यांचे ‘मराठ्यांच्या संबंधाने उद्गार’ हे पुस्तक पाहायला सांगतात. कारण, त्या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आल्या आहेत.    

प्रतिक्रिया पत्र क्र. ३

         १९४१ साली मराठवाड्यातील देविदासराव नामदेवराव कांबळे या मांग जातीतील तरुणाने डॉ. आंबेडकरांना पत्र लिहिले होते. पत्रामध्ये त्याने डॉ. आंबेडकरांनंतर चळवळीचे काय होईल असा प्रश्न उपस्थित करत महार समाजावर काही आक्षेप घेतले होते. तसेच, आंबेडकरांच्या विभूतीपूजा आणि इतर मुद्देही त्यांनी पत्रात मांडले आहेत. तसेच, तुम्ही जर माझ्या पत्राला उत्तर दिले नाही तर मी तिरस्कार करेल असा काहीसा सूर कांबळेनी पत्राच्या शेवटी लावला आहे.  डॉ. आंबेडकरांनी प्रतिक्रिया पत्राच्या सुरुवातीला काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण केले आहे आणि मग, त्यांची खरडपट्टी केली असे दिसते. सुरुवातीला अभिवादन कसे करावे येथपासूनच डॉ. आंबेडकरांनी पत्राची सुरुवात मजेशीर केली आहे. ते लिहितात की,

“ रा. रा. देविदासराव नामदेवराव कांबळे यांस अनेक...

आपणास काय मायना लिहावा याबद्दल मी बुचकळ्यात पडलो आहे. नमस्कार म्हणावा तर आपण दोघेही ब्राह्मण नाही, जोहार म्हणावा तर आपण मांग, फुरमान म्हणावे तर मी महार, आशीर्वाद म्हणावा तर मांगाला आशीर्वाद देणारा महार श्रेष्ठ कोण असा अपवाद यायचा, म्हणून काहीच न लिहिता चांगदेवासारखी कोरी जागा ठेवून, आपल्या पत्राचे उत्तर देत आहे. महार समाज आणि महार पुढारी मातंग जातीवर अन्याय करीत आहेत त्याबद्दल आपले मनातील “खुडखुडी” (मला वाटते, खुमखुमी या मराठी शब्दाचा हा निझामशाही अपभ्रंश असावा) काढून टाकण्याकरिता व एकदाचा “सोक्षमोक्ष” करून घेण्याकरिता पत्र लिहिण्याचे योजिले. यात आपण काहीच वावगे केले नाही. आपण मला ‘परमपूज्य’ या शब्दसमुच्चयाने संबोधिले आहे. त्याबद्दल मी आपला फारच ऋणी आहे. महार लोक नेहमीच ‘परमपूज्य’ हे विशेषण लावून मला संबोधितात. पण त्यात विशेष असे काही नाही. महारांनी महाराची स्तुति केली, याला काय किंमत? आपण मांग आणि मी महार असूनही आपण मला ‘परमपूज्य बाबासाहेब’ म्हणालात यातले प्रेम आणि त्याचे स्वारस्य काही और आहे, इतके कि, ते सांगता नये.”

माझ्या पत्राला उत्तर दिले नाही तर मी तुम्ही गांधींचा जसा तिरस्कार करतात करतात तसा तिरस्कार करेल कसा काहीसा जो सूर कांबळेनी लावला आहे. त्यावर भाष्य करतांना डॉ. आंबेडकर म्हणतात की,

 “...माझ्या पत्राचे उत्तर न दिल्यामुळे मी गांधींचा तिरस्कार करतो, हा आपला गैरसमज कोणी करून दिला. ते मला समजत नाही. गांधीचा मी तिरस्कार करीत असलो, तरी त्याची करणे दुसरी आहेत. माझ्या पत्राला त्यांनी उत्तर दिले नाही हे नव्हे. मला आपल्याप्रमाणे अनेक लोक पत्र लिहितात. पण त्यांना कधी उत्तर देण्याचा क्रम मी ठेवलेला नाही. याबद्दल पुष्कळ लोकांस वाईट वाटते, पण ते त्यामुळे माझा तिरस्कार करीत नाहीत. त्यांना ठाऊक आहे की, मी रात्रंदिवस कामात असतो. मला छानशौक, ऐषआराम माहित नाहीत, नाटक सिनेमांत मी वेळ घालवीत नाही. माझा धंदा, वाचन किंवा सार्वजनिक कार्य  या व्यवसायात मी सतत गुंतलो आहे. मला गांधीसारखे सेक्रेटरी नाहीत. माझे काम मलाच करावे लागते. हे जाणूनच पत्र लिहिणारे माझे मित्र, माझे सहकारी मला क्षमा करतात; माझा तिरस्कार करीत नाहीत. ‘उत्तर न दिल्यास मी तुमचा तिरस्कार करीन’ असे आपण जे म्हटले आहे, ते मनुष्य स्वभावास धरूनच आहे. आपली योग्यता काय आहे, हे मला माहिती नाही.”

महार समाजामध्ये डॉ. आंबेडकरांच्या फोटोपूजनाचे कर्मकांड निर्माण झाले आहे. त्याविषयी देविदास कांबळेनी आपल्या पत्रात नापसंती व्यक्त केली होती. त्यासंबंधी डॉ. आंबेडकर आपल्या पत्रात म्हणतात की,

“पहिल्या प्रथम दोन गोष्टीबद्दल आपले आभार मानल्याशिवाय माझ्याने राहवत नाही. महार लोक मला ईश्वरी अवतार मानून माझ्या फोटोचे पूजन करतात आणि माझ्याशिवाय दुसरा कोणी होणारच नाही असा समज करून घेतात, यावर आपण जो कटाक्ष ठेवला आहे तो स्तुत्य आहे. या अंधश्रद्धेचे व भोळेपणाचे अनुकरण मातंग समाजास करू न देण्याचा आपण जो निर्धार केला आहे, तो आपण कृतीत आणावा, अशी माझी आपणास आग्रहाची सूचना आहे. विभूतिपूजा ही मानवाला कमीपणा आणणारी गोष्ट आहे, मी समतेचा मोठा भोक्ता, नव्हे पुरस्कर्ता आहे. मी देव नाही, महात्मा नाही, असे सांगून थकलो. पण त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झालेला दिसत नाही. आपण मांग लोकांना माझ्या फोटोची पूजा करू देणार नाही, हे तर चांगलेच आहे. मांग लोकांची अवस, पुनव, ग्रहण मानण्यापेक्षा माझ्या फोटोचे पूजन करणे वाईट आहे, याबद्दल मला काही संदेह नाही. आपण आपली दृष्टी संकुचित केली आहे, याबद्दल मला वाईट वाटते. आपण महार लोकांतूनही हे माझ्या फोटोपूजनाचे खूळ नाहीसे करण्याचे व्रत पत्करले पाहिजे, असे आपल्याला सांगणे मला आवश्यक वाटते. हा आपला मोठाच पराक्रम होईल यात काही शंका नाही. कदाचित एवढा पराक्रम केल्यावर, मातंग समाज आपल्या फोटोची पूजा करू लागेल अशी आपल्याला भीती वाटत असेल, तरी भीती बाळगू नये. आपल्या फोटोची पूजा करण्याची प्रथा माझ्या फोटोची पूजा करण्याच्या प्रथेइतकी कधीच वाईट दुष्परिणामी होणार नाही.”

डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतर काय होईल अशी शंका कांबळेने उपस्थित केली होती. त्याविषयी डॉ. आंबेडकर लिहितात की,

“...दुसऱ्या एका अभिवाचनासाठी मी आपला आभारी आहे. मी मेल्यावर कसे होईल. अशी चिंता मी अनेकवेळा प्रसिद्ध केली आहे, हे खरे आहे. महारापैकी एकाही तरुणाला सांगावयाला हिंमत झाली नाही की, “ काही हरकत नाही, तुम्ही मरा, आम्ही चालवू,” आपले अभिवचन वाचून आमचे समाधान झाले. द्रोणाने कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकवल्यानंतर “मला गुरुदक्षिणा कोण देईल?” असा प्रश्न केला. त्याला कोणीच उत्तर देईना. गुरु काय मागतो, कोण जाणे ? प्राण मागतो की काय अशा भयाने सगळेच गप्प बसले. एकट्या अर्जुनाला धैर्य झाले. तो म्हणाला, “ मागा काय मागावयाचे आहे ते, मी देतो.” द्रोणाच्या ठायी मी व अर्जुनाच्या ठायी आपण आहात असे वाटून माझ्या मागून कोणीतरी आहे, या विश्वासाने मला शांती वाटते, द्रोणाने पण केला होता की, राजा द्रुपदाला शिष्यहाती धरून आणीन म्हणून तसे ब्राह्मण्य नष्ट करणे हा माझा पण आहे. तो माझ्या आयुष्यात माझ्या हातून पुरा होणे शक्य नाही. आपण तो पुरा करण्यास सिद्ध आहात, हे माझे मी मोठे भाग्य समजतो व त्याबद्दल मी आपले आभार मानतो.”

पत्रात मुद्यांचे स्पष्टीकरण आणि आभार मानून झाल्यावर आंबेडकरांनी कांबळेच्या आरोपांना उत्तर दिली आहेत. त्या संदर्भात ते लिहितात की,

“नमनाला फारच तेल गेले! आता आपण केलेल्या आरोपांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. आपले आरोप दोन प्रकारचे आहेत. काही माझ्यावर व्यक्तिगत लागू असणारे असे आहेत. बाकीचे महार समाजाला लागू असे आहेत.”

डॉ. आंबेडकर हे फक्त महार समाजाचे पुढारी आहेत असा आरोप मांग जातीच्या काही मंडळींनी केला होता. असाच आरोप हिंदू महासभा आणि कॉंग्रेस करीत होते. या दोन्ही पक्षामधील अस्पृश्य मंडळी आणि त्यांचे सवर्ण नेते हे आंबेडकरांचे नेतृत्व महारजातीपुर्ते मर्यादित करू पाहत होते. या आरोपाला उत्तर देतांना डॉ. आंबेडकर लिहितात की,

“मी फक्त महारांचाच पुढारी आहे, असा मध्यप्रांतातील मांग लोकांनी ठराव रूपाने केलेला माझ्यावरचा आरोप मी वृत्तपत्रांतून वाचला आहे. त्यांतील विधानासंबंधाने मी ता. ४ जानेवारी १९४१ च्या जनतेत लिहिले आहे ते आपण अवश्य वाचून पहावे. मी महारांचाच पुढारी ही कॉंग्रेसची ओरड, त्याचीच री मांगांनी ओढली. असे किती पोटार्थी मांग-महार आहेत की, जे पैशासाठी वाटेल ते करतील. ‘ पुणे करार’ झाला, त्यावेळी कॉंग्रेस मला ‘सर्व हिंदुस्थानातील अस्पृश्यांचा पुढारी’ म्हणून मान्य करीत असे. त्यांनतर मी नुसता मुंबई इलाख्यातील अस्पृश्य लोकांचा पुढारी आहे असे म्हणू लागली, त्यांनतर नुसत्या महारांचा पुढारी आहे, असे म्हणू लागली. माझी खात्री आहे की, काही दिवसांनी मी कोकणस्थ महारांचाच पुढारी आहे व त्यानंतर मी दापोली तालुक्यातील महारांचा पुढारी, असा प्रचार कॉंग्रेस करील व त्याला महारांतूनच माणसे सापडतील असे म्हणावयास हरकत नाही. कोणीही कॉंग्रेसला विरोध करून पहावा, म्हणजे मी म्हणतो त्याची सत्यता कळेल. चांभारातील एखादा पुढारी कॉंग्रेसला विरोध करायला निघू द्या, म्हणजे हाच मासला दिसून येईल. तो दाभोळ्या जातीचा असला, तर तो चांभार जातीचा पुढारी नसून दाभोळ्या जातीचा पुढारी आहे, असे ते म्हणतील. हरळ्या जातीचा असला तर हरळ्य़ाचा पुढारी म्हणतील; आणि चेवल्यांच्या जातीचा असला तर चेवल्यांचा पुढारी म्हणतील. मांगामध्ये १२ पोटजाती आहेत, असे मला समजते. मांगामध्ये कॉंग्रेसला विरोध करणारा कोणी पुढारी निघाला तरी त्याची देखील तीच गत होणार. तो ज्या जातीचा, त्या जातीचा पुढारी, असा गिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही. ही वस्तुस्थिती मला माहिती असल्यामुळे महारांचा पुढारी म्हटल्याने मला काही नवल वाटत नाही. शिवाय, बाकीच्यांनी माझे पुढारीपण सोडले आणि नुसते महारांनी मानले, तर त्यात काही खेद करण्यासारखे आहे असे मला वाटत नाही, कोठे तरी कार्य करण्यास संधी असल्यास पुरे.”

डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष हाही फक्त महारांचाच पक्ष आहे असा आरोप त्याकाळी विरोधी पक्ष करीत असत. वस्तुस्थिती मात्र काहीशी निराळी होती कारण, स्वतंत्र मजूर पक्ष हा वर्गीय जाणीवेतून निर्माण झालेला पक्ष होता. त्यामध्ये जातींय शोषणाची, अत्याचाराची चर्चा होत असे. डॉ. आंबेडकर हे स्वतंत्र मजूर पक्षाचे पुढारी असल्यामुळे त्यांच्या महार जातीचा त्यामध्ये भरणा होता पण, म्हणून तो महारांचाच पक्ष होता असे मात्र म्हणतात येत नाही. डॉ. आंबेडकर प्रतिक्रिया पत्रात या आरोपाला उत्तर देतांना लिहितात की,

“स्वतंत्र मजूर पक्ष हा महारांचा पक्ष आहे, असे म्हणण्यात येते. परंतु ते खोटे आहे. स्वतंत्र मजूर पक्षात महार- महारेत्तर असा भेद नाही. स्वतंत्र मजूर पक्ष जात पाहत नाही, गुण पाहतो. गुणाला उतरला तर त्याला त्याच्या लायकीची जागा स्वतंत्र मजूर पक्षात मिळू शकते. राजकारण हे काही पंक्तीभोजन नव्हे. मांग कोणी नाही म्हणून मांग घ्या, भंगी कोणी नाही म्हणून भंगी घ्या, असा नियम स्वतंत्र मजूर पक्ष ,मानीत नाही. कोणताही राजकीय पक्ष माणू शकणार नाही नुसत्या शिक्षणाला राजकारणात काही महत्व नाही. “ मी ग्रॅज्युएट आहे, मला कौन्सिलात घ्या”, हा नियम स्वतंत्र मजूर पक्षाला कबूल नाही, कोणाही राजकीय पक्षाला तो नियम मान्य होऊ शकणार नाही. राजकारणात शिक्षण पाहिजे पण शिक्षणापैकी शीलाची जास्त जरुरी आहे. स्वतंत्र मजूर पक्ष जात, शिक्षण, शील या तिन्ही गोष्टी पाहून कौन्सिलचे उमेदवार ठरवतो. अस्पृश्यांचे भांडण भांडण्याकरिता स्वतंत्र मजूर पक्ष उभा केला आहे. त्यात एखाद्या मांगाला जागा मिळाली नसेल. तशी अस्पृश्यांतील नाशिक जिल्ह्यातील एक सधन व कार्यकर्त्या अमृतराव रणखांभ्यांसारख्या माणसाला व सातारा जिल्ह्यातील एका सधन गृहस्थाच्या मुलांस स्वतंत्र मजूर पक्षात जागा मिळाली नाही. यावरून स्वतंत्र मजूर पक्ष मांगांच्या व चांभाराच्या विरुद्ध आहे, असे म्हणण्यात काही अर्थ नाही. स्वतंत्र मजूर पक्ष नालायकांच्या विरुद्ध आहे. मग ते कोणत्याही जातीचे असोत. मांग- चांभार स्वतंत्र मजूर पक्षात नसले म्हणून मांग जातीचे किंवा चांभार जातीचे काही नुकसान झाले आहे, असे मला दिसत नाही. स्वतंत्र मजूर पक्ष महारांचा असला तरी तो महारांकरता भांडत नाही, तो भांडतो साऱ्या अस्पृश्यांकरता, भांडणामुळे जो लाभ होतो त्याचे वाटप करणे हे त्यांच्या हाती नाही, ते हाती आहे कॉंग्रेसच्या, महारांच्या पदरात शून्य, असे वाटप जर कॉंग्रेसने केले नाही, तर ती कॉंग्रेस कसली! स्वतंत्र मजूर पक्षाने हानि केली असेल ती महारांचीच.”

मराठवाड्यात महार लोक मांगांवर अत्याचार करतात अशी तक्रार पत्रात कांबळेनी केली होती. त्या विषयी डॉ. आंबेडकर लिहितात की,

“महार लोक मांगांवर जुलूम करतात असे लिहिले आहे. तो प्रकार आमच्याकडे नाही, आमच्याकडे उलट प्रकार आहे. चांभारांनी, मांगांनी काही खोडी काढली तरी महार गप्प असतात. त्यांना ठाऊक आहे की, मी या बाबतीत त्यांचा पक्ष घेणार नाही. आणि आपण बहुसंख्याक आहोत तेव्हा सोसले पाहिजे; अशी जबाबदारी त्यांना वाटते. आपल्याकडे उलट प्रकार आहे, याबद्दल खेद वाटतो. महारांविरुद्ध निजाम सरकारकडे दाद मागावी अगर आपण सत्याग्रह करावा. त्याला माझा पाठींबा राहील.”

महार – मांगांच्या झगड्यासंदर्भात लिहितांना कोकणात मराठवाड्यापेक्षा वेगळी स्थिती आहे असे नोंदवतात. सोबतच, मराठवाड्यातील महारांच्या विरोधात सत्याग्रह करायचे सुचवतात आणि त्याला पाठिंबाही देतात. यातूनच आपणास आंबेडकरांची महार- मांग झगड्याविषयीची भूमिका स्पष्ट दिसते. पत्राच्या शेवटी, डॉ. आंबेडकरांनी कठोर शब्दांमध्ये देविदास कांबळेची खरडपट्टी केली आहे. तसेच, गुलामी केल्याने व्यक्तीचा फायदा होतो पण समाजाचे अहितच होते असे निर्देश करत डॉ. आंबेडकर लिहितात की,

“शेवटी येव करा, त्येंव करा नाहीतर तुमचे मार्ग भिन्न अशी आपण जी निकराची भाषा वापरली आहे, तिच्यासंबंधी दोन शब्द लिहिणे आवश्यक आहे. अशी भाषा आपण वापरली नसती तर बरे झाले असते. गोवेकरीण जशी वाटेल तेंव्हा अडते, किंवा बेगुमान झालेली बायको उल्या, पुल्या करून, ‘घे मेल्या तुझे मंगळसूत्र’ (असे म्हणून) तोडावयास तयार होते मग कंटाळून ‘जाव जहन्नममे’ अशी म्हणण्याची पाळी (नवऱ्यावर) येते, तसा प्रकार होऊ देणे बरे नाही. भिन्न मार्गाने जावयाचे असेल तर जावे. त्याला मी हरकत करू शकणार नाही, किंवा त्याबद्दल मी काही उदास होऊन मला जे करावयाचे ते बंदही करणार नाही. मात्र भिन्न मार्ग कोणता याचा विचार करून मग तो पत्करावा, मांगाची उन्नति करून त्यांचा स्वाभिमान जागृत करणे, हा या भिन्न मार्गाचा उद्देश असेल तर तो स्तुत्य आहे. पण महारांशी काडीमोड करून, केवळ सनातनी हिंदू किंवा कॉंग्रेस यांची गुलामगिरी करणे, हाच जर या भिन्न मार्गाचा उद्देश असेल, तर त्यांत काही मांग व्यक्तींचा लाभ होईल, पण त्यात मांग जातीचा अनर्थ आहे, यात मला तरी काही शंका नाही, तरी मर्जीनुसार मार्ग चोखाळणे. पत्र बरेच लांबले, पण आपले उत्तर सविस्तर आले पाहिजे, असे फर्माविल्यामुळे संक्षिप्त लिहिता आले नाही.”

वरील तिन्ही प्रतिक्रिया पत्रांमुळे आपणास डॉ. आंबेडकरांच्या वेगवेगळ्या भूमिका स्पष्ट होता. तसेच, त्यांच्या लेखनशैलीतील हजरजबाबीपणा, उपहासलेखनवृत्ती, चिकित्सक वृत्ती, मानसिक कणखरपणा, आत्मविश्वास, सामाजिक-राजकीय समज, इतिहासदृष्टी,  धोरणीपणा, या बाबीही दिसून येतात. त्यामुळे सदरील प्रतिक्रिया पत्रे हे डॉ. आंबेडकरांच्या बौद्धिक इतिहास लेखनाच्या दृष्टीने आणि संपूर्ण आंबेडकरी चळवळीच्या इतिहास लेखनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत.   

 

पत्रांची पुर्वप्रसिद्धी-

1.    पत्र- १ आणि २- चांगदेव खैरमोडे लिखित ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर खंड- ६’ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहेत.  

2.    पत्र – ३- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड- २० मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.


पूर्वप्रसिद्धी- अन्विक्षण - जून २०२१ 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...