गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

कधी व्यक्तिगत, कधी सामाजिक: खाजगीपणाच्या सार्वजनिक आणि सार्वजनिकपणाच्या खाजगी गप्पा!

 

 

१. व्यक्ती म्हणून व्यक्तिगत विसंगती ज्याने त्याने शोधणे महत्वाचे आहे. पण, व्यक्ती आणि व्यक्तीचा व्यवहार मोठ्या सामजिक चौकटीत घडतो. त्याचे काय करायचे असा प्रश्न निर्माण होतो. व्यक्ती हा नुसता 'Individual' नसून 'Bio-social' पण आहे.  त्यामुळे त्याचा व्यवहार हा फक्त त्याचा व्यवहार राहत नाही तर एका विशिष्ट समाजात 'व्यक्तीने' कसे वागावे याचा व्यवहार बनतो.  हे थोडे गुंतागुंतींचे प्रकरण आहे. समाजाचे बारकाईने निरक्षण केले तर सारखाच व्यवहार वेगवेगळे व्यक्ती करतांना दिसतात. मग प्रश्न असा उत्पन्न होतो कि, समाजातील व्यक्तींचा असा व्यवहार आहे की, व्यक्ती या समाजात असा व्यवहार करतात. त्यामुळे व्यक्तीला आणि त्याच्या व्यवहाराला सामाजिक व्यवहार पूर्णत: वेगळे करता येत नाही असे मला वाटते. मानवशास्त्रात या गोष्टींची चांगली चर्चा आहे. उदा. व्यक्तींचे वर्तन, स्त्रियांचे चरित्रहनन, कुजबुज, कंडी पिकवणे ह्या सगळ्या गोष्टी व्यक्तीच करतात पण, त्या समाजातील वेगवेगळी लोक हेच करतांना दिसतात.  मग, ते खरच व्यक्तिगत असते की, ते सामाजिक उत्पादन असते असा प्रश्न निर्माण होतो.

 

२. व्यक्तीच्या जीवनांतील 'विसंगती' आणि 'अंतरविरोध' यामध्ये आपण फरक करायला हवा. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्य अनेक अंतरविरोधानी ग्रस्त असते हे मान्य पण, विसंगतींनी भरलेले असते असे म्हणतांना मला वाटते यावर थोडा विचार झाला पाहिजे. विसंगती या शब्दाने असे वाटते की, संबंधित व्यक्तीला आपण जे करतो ते विसंगत आहे असे माहिती असते तरी तो करतो असे दिसते. हे अंतरविरोध ह्या शब्दाने वाटत नाही. विसंगती ह्या शब्दामध्ये जाणीवपूर्वक करतो तर अंतरविरोध ह्या शब्दाने नकळत होते असे दिसते.

 

३. आपल्या व्यक्तिगत, खाजगी आणि सामुदायिक, सर्वाजानिक आयुष्यात एक तणाव नेहमी असतो. त्याचे निर्मुलन करण्याची  किंवा त्यात संतुलन राखण्याची कसरत आपणास करावी लागते. त्यामुळेच अनेक प्रश्न उद्भवतात. म्हणूनच, मला लोकांच्या व्यक्तिगत आणि खाजगी जीवनाच्या जडणघडणीच्या विकासात/ इतिहासात अधिक रस आहे. त्यामुळे लोकांच्या दैनदिन जीवनाचा, सामाजिक भांडवलाचा आणि मानसिक वर्तनाचा शोध घेता येतो. उदा. १. बायकांच्या व्यक्तिगत / खाजगी जीवनाचा अभ्यास केल्यास आपणास त्यांचे दैनदिन जीवनव्यवहार कळतो. २. व्यक्तींच्या व्यक्तिगत आणि खाजगी जीवनाचा अभ्यास केल्यास आपणास सामजिक- कौटुंबिक भांडवलाच्या जाळ्यामुळे व्यक्तींना कोणते फायदे मिळतात. ३. खाजगी- व्यक्तिगत जीवनाचा अभ्यास केला तर आपणास अनेक लोकांच्या मानसिक व्याधींचे मुळे कळतात.

 

शेवटी, लोकांच्या खाजगी आणि व्यक्तिगत जीवनाचा अभ्यास करण्याचा तुमचा हेतू काय यावर खूप काही अवलंबून आहे. लोकांवर चिखलफेक करणे, कुजबुज करणे, चरित्रहनन करणे हा हेतू आहे की, व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत कशी का वागतात? त्याचा सामाजिक, मानसिक आणि भौतिक काही संदर्भ आहे ? याचा शोध घेणे हा आहे. यावर सगळ्या गोष्टी ठरतात.  मला एखादी गोष्ट पटते पण मला ती करता येत नाही, काही गोष्टी अशा आहेत की, ज्यांनी माझे मनोविश्व व्यापून टाकले आहे, व्यक्ती आणि व्यक्तीचा विचार आणि व्यवहार हा सुद्धा एका विशिष्ट काळाचे ‘अपत्य’ असते असे मला वाटते. त्यामुळे ‘व्यक्ती’ असे का वागतात यात मला अधिक रस आहे. बाकी, महापुरुषांसह (स्त्रिया) सगळ्यांचा व्यक्तिगत आणि सार्वजनिक व्यवहार नीट तपासाला पाहिजे असेच मला वाटते. आपण नाही तपासला तर भविष्यात कोणीतरी तपासणार आहेच...! तपासण्याचा हेतू काय ह्यावर बरेच काही अवलंबून असते. तसेही, खाजगी जीवनाविषयी सार्वजनिक ठिकाणी कुजबुज (गॉसिप) करण्यात आपला समाज ( ज्यात पुरोगामी, प्रतिगामी, डावे- उजवे, स्त्रिया- पुरुष) आघाडीवर आहेच की ! 

 

 

बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

समतेच्या स्वप्नसृष्टीसाठी झगडणारी सत्यशोधक- डॉ. गेल ऑम्वेट

 

       १९६०-७० चे दशक हे जगातील इतिहासाच्या दृष्टीने अनेक अर्थानी महत्वाचे आहे. कारण एकीकडे शीतयुद्धामुळे आफ्रिका- आशिया हे जागतिक घडामोडींचे केंद्र बनले होते. तर, दुसरीकडे संपूर्ण जगात तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या, नागरी हक्कांच्या चळवळींचा प्रस्थापित व्यवस्थेला नकार म्हणून उदय होत होता. अशावेळी, अमेरिकेतून एक गोरी मुलगी संशोधनासाठी भारतात येते आणि पुढे भारतातील ‘डाव्या चळवळी, सामाजिक चळवळींमध्ये सक्रीय होते. ही प्रक्रिया अनेक अर्थांनी महत्वाची आहे. त्याकाळातील व्यक्ती, विचार आणि प्रक्रिया या जागतिक  इतिहासाच्या संदर्भात समजावून घेतल्या तर अनेक धागेदोर उलगडतात.

         डॉ. गेल ऑम्वेट ज्या काळामध्ये भारतात संशोधनासाठी आल्या. त्याकाळात म्हणजेच शीतयुद्ध कालखंडात पहिल्या जगातील (भांडवली देशातील) अनेक तरुण तिसऱ्या जगात क्रांतिकारी चळवळी करण्यासाठी येत होती. प्रामुख्याने युरोप- अमेरिकेतील डाव्या विचारांचा प्रभाव असलेली तरुण मंडळी यामध्ये अधिक होती. याच काळात अमेरिकेतून आलेल्या अनेकांकडे संशयाने पाहण्याची रीत होती. सी. आय. ए. एजंट असण्याची शक्यता डाव्या चळवळीत वर्तवली जात होती. कारण, त्याकाळात शीतयुद्धाचे सांस्कृतिक डावपेचात्मक राजकारणही घडत होते. संशोधन, लेखन, साहित्य चर्चावर्तुळे, वृत्तपत्रीय लिखाण ही सांस्कृतिक शीतयुद्धाची रणभूमी होती. ‘कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम ही संघटना सी. आय. ए. च्या धोरणानुसार चालत होती आणि त्यामध्ये बऱ्याच मराठी विद्वानांचाही सहभाग होता असे आज अनेक कागदपत्रांच्या आधारे सिद्ध झाले आहे. डॉ. गेल ऑम्वेट यांच्याकडेही काहींनी सुरुवातीला संशयाने पहिल्याच्या आठवणी आहेत असे माझ्या ऐकण्यात आहे. म्हणूनच प्रथम त्यांचे व्यक्तीगत आयुष्य समजावून घेणे अत्यंत महत्वाचे ठरते.

          डॉ. गेल यांचा जन्म मिनिसोटा राज्यातील मिनिआपोलीस या शहरामध्ये १९४१ साली झाला. त्यांचे पूर्वज अनेक वर्षांपूर्वी युरोपातून अमेरिकेत स्थायिक झाले होते. गेल यांचे आजोबा ऑगस्ट ऑम्वेट हे टू हार्वर या शहरात राहत होते. तेथील स्थानिक डेमोक्रेटिक फार्मर लेबर पार्टीच्या माध्यमातून ते चारवेळा राज्य प्रतिनिधी (आमदार) आणि दोनवेळा महापौर म्हणून निवडणून आले होते. डॉ. गेल यांचे आई- वडील दोघेही सुद्धा त्याच पक्षाचे कार्यकर्ते होते. अमेरिकेतील राष्ट्रीय राजकारणात हा पक्ष डेमोक्रेटिक पक्षाचा भाग असतो. त्यामुळेच, पुढील काळात डॉ. गेल या विदयार्थी चळवळ, नागरी हक्क चळवळ, युद्धविरोधी चळवळीत सहभागी झाल्या. कारण कुटुंबांची परंपराच श्रमिकांच्या- कामगारांच्या बाजूची होती.

           त्याकाळाच्या युगधर्माप्रमाणे इतर तरुणांसारख्याच गेल ऑम्वेट तिसऱ्या जगाला समजून घेण्यासाठी संशोधक विदयार्थी म्हणून भारतात आल्या. त्यावेळी डॉ. एलिनोर झेलीएट यांचे मार्गदर्शन त्यांना मिळत होते. ‘वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड- महाराष्ट्रातील ब्राह्मणेत्तर चळवळीचा अभ्यास या विषयावर संशोधन करीत असतांना त्यांनी महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती, संस्था, ग्रंथालये, व्यक्तीगत संग्रह, पुराभिलेखागर धुंडाळली. विदर्भ, कोल्हापूर, मुंबई, पुणे अशा अनेक ठिकाणी पायपीट केली. तेव्हा कुठे सत्यशोधक समाजावर दीर्घकाळानंतर महत्वाचे संशोधन होवू शकले. तोपर्यंत आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासलेखनात सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेत्तर चळवळीवर अभिजनवादी दृष्टीकोनातून संकुचित व साचेबध्द मांडणी केली जात होती. डॉ. गेल यांच्या संशोधनामुळे महाराष्ट्रातील वैचारिक चर्चाविश्व आमुलाग्र बदलले. याकाळात त्या एकीकडे संशोधन करत होत्या आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील डाव्या चळवळींच्या, व्यक्तींच्या संपर्कात होत्या. महाराष्ट्रातील लाल निशाण पक्ष, नवमार्क्सवादी गट, फुले-आंबेडकर-मार्क्स (फुआमा) गट, मार्क्स-फुले-आंबेडकरवाद (माफुआ), बामसेफ, ओबीसी आणि स्त्रीमुक्ती चळवळींशी त्यांचा नजीकचा संबंध होता.

       पीएचडीचे संशोधन पूर्ण झाल्यावर आणि डॉ. भारत पाटणकरांशी लग्न केल्यानंतर त्यांनी भारतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. यासोबतच, त्यांच्या अभ्यासक आणि कार्यकर्त्या अशा दुहेरी जीवनाची भारतीय शैक्षणिक संस्थेमध्ये आणि सामाजिक चळवळींमध्ये सुरुवात झाली. शैक्षणिक संस्थांमध्ये आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये डॉ. गेल यांनी ‘समाजशास्त्रज्ञांमध्ये इतिहासकार आणि ‘इतिहासकारांमध्ये समाजशास्त्रज्ञ’ म्हणून भूमिका निभावली. देशातील आणि विदेशातील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, केंद्रांमध्ये आणि जगातील पातळीवरील संस्थांमध्ये प्राध्यापक, संशोधक आणि सल्लागार म्हणून कार्य केले आहे. ही सर्व कामे करत असतांनाच त्यांनी विपुल प्रमाणात ग्रंथसंपदा सुद्धा निर्माण केली. त्यामध्ये अत्यंत महत्वाचे ग्रंथ म्हणून- वासाहतिक समाजातील सांकृतिक बंड, सीकिंग बेगमपुरा, आंबेडकर टूवर्डस इनलायटन इंडिया, दलित व्हिजन, दलित अँड डेमोक्रेटिक रेव्होल्युशन इन इंडिया, अंडरस्टँडिंग कास्ट- बुद्धा, आंबेडकर अँड बियाँड, वी विल स्मॅश थिस प्रिझन, न्यू सोशल मुव्हमेंट इन इंडिया, व्हॉयलंस अगेन्स्ट विमेन, जेंडर अंड टेक्नोलॉजी, बुद्धीझम इन इंडिया, साँग्ज ऑफ तुकोबा या ग्रंथांचा समावेश होतो.

         डॉ. गेल यांनी त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेत्तर चळवळ, दलित चळवळ, शेतकरी चळवळ, स्त्री चळवळ, प्रती सरकार, पर्यावरण, युवक चळवळींचा मागोवा घेतला. तसेच, मार्क्स, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम, संत रोहिदास, आणि बुद्ध यांच्याविषयी सैद्धांतिक मांडणी केली. ईकोनॉमिक्स अँड पोलिटिकल विकली, सोशल सायंटिस्ट, जर्नल ऑफ साउथ एशियन स्टडीज, जर्नल ऑफ मॉडर्न एशियन स्टडीज अशा इंग्रजी आणि मागोवा, तात्पर्य, समाज प्रबोधन पत्रिका, बायजा, परिवर्तनाचा वाटसरू अशा मराठी वैचारिक आणि अकादमिक नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात त्यांनी लिखाण केले आहे. 

         समाजशास्त्रज्ञ आणि अभ्यासक म्हणून डॉ. गेल ऑम्वेट जेवढ्या प्रसिद्ध होत्या. तेवढीच प्रसिद्धी त्यांच्या सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक चळवळीच्या नाळेमुळे त्यांना मिळालेली आहे. धुळे- नंदुरबारमधील श्रमिक संघटना, स्त्री मुक्ती संघटना याच्याशी डॉ. गेल यांचा संबंध होता. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली दुष्काळ निर्मुलन, समान पाणी वाटप, स्त्री मुक्ती संघर्ष चळवळ, विठ्ठल रखुमाई आंदोलनाच्या बौद्धिक व सैद्धांतिक कामामध्ये आणि मोर्चांमध्ये डॉ. गेल यांचा महत्वाचा सहभाग होता. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामांतर आंदोलन, नर्मदा सरदार सरोवर आंदोलनामध्ये डॉ. गेल होत्या. मराठी साहित्य चळवळी आणि सांस्कृतिक राजकारण यामध्येही गेल ऑम्वेट यांनी सहभाग नोंदवला आहे. डॉ. गेल यांच्या निधनाच्या वार्तेनंतर त्यांच्या सहकारी डॉ. कुंदा प्र. नी. यांनी दोघींमधील काही पत्रव्यवहार समाज माध्यमावर टाकला. त्यामध्ये दिसते की, डॉ. गेल महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यात अभ्यास आणि चळवळ दोन्हींसाठी हिंडत असतांना तिसऱ्या जगाचा कानोसा नेहमीच घेत होत्या. फिलीफाईन्स, निकारगुआ या देशांमध्ये क्रांतिकारी चळवळी काय करत आहेत. युरोपातील डावे पक्ष आणि नवमार्क्सवादी चळवळींच्या भूमिका कशा आहेत. या गोष्टींवर डॉ. गेल महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना समजाव्यात म्हणून त्याविषयी चर्चा करत होत्या. इंग्रजी लेखांचे भाषांतरही त्यावेळी विपुल प्रमाणात केली गेली.

        दलित, आदिवासी आणि ग्रामीण साहित्य सभा, विद्रोही साहित्य चळवळशी त्या सुरुवातीपासून सोबत होत्या. डॉ. गेल वेगवेगळ्या सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय चळवळींशी संबंधित होत्या. आंदोलन आणि मोर्च्यामध्ये भाग घेत होती. म्हणूनच त्यांना सिद्धांता (थेअरी) सोबतच व्यवहार (प्रॅक्टीस) अत्यंत महत्वाची वाटत होती. डॉ. गेल यांच्या सैद्धांतिक मांडणीने त्यांचा व्यवहार घडवला आणि त्यांच्या व्यवहाराने त्यांची सैद्धांतिक बैठक समृद्ध केली.

       वेगवेगळ्या सामाजिक चळवळींचे ताणेबाणे आणि स्थित्यंतराचा अभ्यास करत करत डॉ. गेल ऑम्वेट यांचेही वैचारिक स्थित्यंतर आणि सैद्धांतिक विकास झाला असे दिसते. ‘वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंडाचा अभ्यास करतांना त्या मार्क्सवादी होत्या असे दिसते. पुढे, नवमार्क्सवादी फुले- आंबेडकर आणि बौद्धवादी झालेल्या दिसतात. कारण ‘बुद्धीझम इन इंडिया’ या ग्रंथामध्ये ‘आंबेडकरी बौद्धधर्मच नव्यायुगाचे वैचारिक दिग्दर्शन करू शकतो अशी भूमिका घेतलेली दिसते. त्यामुळेच डॉ. भारत पाटणकर त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘बौद्धिक शाहीर असे म्हणतात. असे असले तरी त्यांनी मार्क्सला पूर्णपणे कधीच नाकारलेले दिसत नाही.  

        शोषणमुक्तीच्या ध्येयवेडाने पछाडलेल्या पिढीची प्रतिनिधी डॉ. गेल होत्या. त्यासाठी त्या भारतात आल्या. महाराष्ट्रातील वाड्या, वस्त्या, तांडे फिरल्या. उन, पाऊस काहीही न पाहता ग्रामीण महाराष्ट्रात गेल्या. अनेकांशी वैचारिक वाद, चर्चा केल्या. दलित, आदिवासी, स्त्रिया, शेतकरी, पर्यावरण चळवळींचा संवादपूल झाल्या आणि शेवटी, स्मृती भ्रंश होईपर्यंत पर्यायी  स्वप्नसृष्टीचा शोध घेत राहिल्या. डॉ. गेल ऑम्वेट यांची महाराष्ट्राच्या वैचारिक सृष्टीला आणि ज्ञानव्यवहाराला नेहमी उणीव जाणवेल.  


पूर्वप्रसिद्धी- लोकरंग, लोकसत्ता - २९ ऑगस्ट २०२१ 

जातीजनगणनेच्या माहितीचे राजकारण

 

         मंडल आयोगानंतर पुन्हा जातीच्या मुद्द्याने सार्वजनिक आणि सर्वस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या संस्था, संघटना आणि पक्ष ‘सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणना -२०११’ ची माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी करत आहेत. आज भाजप सरकारने जरी ‘सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणनेची माहिती खुली करायला नाखुशी दाखवली असली तरी २०१० मध्येच भाजप विरोधी पक्ष म्हणून अशा प्रकारच्या जनगणनेच्या मागणीला पाठींबा दिला होता. वेगवेगळ्या राज्यांमधील वेगवेगळ्या संस्था, संघटना आणि पक्ष ही माहिती सार्वजनिक करा असे म्हणत आहेत. तसेच, उत्तरप्रदेशच्या येऊ घातलेल्या निडवणूकीमुळे माहिती सार्वजनिक केली जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

       ‘सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणना- २०११ घ्यायची की, नाही अशी चर्चा त्यावेळी झालेली होतीच म्हणून आपण असे म्हणून शकतो ही ही जनगणना आणि राजकारण यांचा अविभाज्य संबंध आहे. त्यामुळे आजही वेगवेगळ्या पद्धतीने त्याविषयी राजकारणच केले जात आहे. असे असले तरी, ‘सामामिक, आर्थिक आणि जात जनगणने’ची अत्यंत गरज आहे. म्हणूनच, त्याची सर्व माहिती सार्वजनिक केली पाहिजे. जात जनगणनेविषयी अनेकांचे गैरसमज आहेत. विरोध करणारे आणि समर्थन करणारे काही अतार्किक गोष्टी मांडतात. त्यामुळे ‘सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणना’ संबंधी मोकळी, खुली आणि सार्वजनिक चर्चा, संवाद झाले पाहिजे. कारण, त्यातून काही निर्णायक, ठोस गोष्टी हाती लागती. त्यासाठी आपणास काही मुद्द्यांची चर्चा केली पाहिजे.

 

१.     सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणनेमुळे जातीय तणाव वाढेल – असे काहींचे म्हणणे आहे. ही सगळीच गोष्ट निराधार आहे असे म्हणता येणार नाही. पण, जातीय जनगणनेच्या आधी भारतीय समाजात जातीय तणाव नाही का? असाही पर्यायी प्रश्न उभा करता येवू शकतो. इंग्रजी काळात १८७२ मध्ये पहिल्यांदा जनगणना झाली. त्या जनगणनेमुळे मोठ्या प्रमाणात माहितीचे उत्पादन झाले आणि त्यामुळे इंग्रजांनी माहितीचे नियंत्रण केले. त्यामुळेच पहिल्यांदा अनेकांना आपल्या जातीची, धर्माची माहिती मिळाली आणि त्यातून संख्येच्या राजकारणाचीही चर्चा झाली. त्यामुळेच इंग्रजांना विशिष्ट जाती आणि धर्म संबंधी निश्चित धोरणे आखता आली. त्यातून जमातवादाची जशी निर्मिती झाली तशीच वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या जातींचा आणि धर्माचा टक्का सुद्धा वाढला. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना त्यावेळी घडल्या होत्या. त्यामुळे नुसता तणाव वाढेल असे म्हणता येत नाही तर त्यासोबत वेगवेगळ्या स्तरातील सामाजिक, आर्थिक आणि जातीय स्थितीगतीही कळेल.

२.      जातींचे राजकारण वाढेल असेही म्हटले जात आहे. आजही आपल्या आजूबाजूला जातींचे राजकारण तर आहेच. भारतीय लोकशाहीमध्ये जात ही एक वोट बँक राजकारण बनली आहेत. त्यामुळे या जन गणनेमुळे जातीचे राजकारण वाढेल असे म्हणणे निराधार आहे. एक मात्र खरे आहे की, या जन गणनेतून जी माहिती बाहेर येईल त्यातून जातीच्या राजकारणावर बराच मोठा प्रभाव पडेल. तो प्रभाव कदाचित जातींच्या राजकारणाला घटवणारा किंवा वाढवणारा असेल. कारण, जातींच्या आधारे राजकारण करणारे सर्वपक्षीय लोक, गट आणि संस्था या काही विशिष्ट ठोकताळ्यांवर राजकारण करत असतात. ते ठोकताळे या जन गणनेतून बाहेर येणाऱ्या माहितीच्या माध्यमातून तपासले जातील.

३.     आपण आतापर्यंत कधीच जातींची जनगणना केली नाही मग आताच का करायची? असाही प्रश्न काहीजन उपस्थित करतात. यासंबंधी असे म्हणता येईल की, जातीची समग्र जन गणना झालेली नसली तरी प्रत्येक जनगणनेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची माहिती गोळा केली जात होती. त्यामुळे या प्रवर्गातील जातींची निश्चित अशी माहिती आहे. पण, ओबीसी या प्रवर्गातील जातींची निश्चित माहिती नाही. त्यामुळे अनेक गोंधळ होतात. ओबीसींची नोंद पूर्वी झालेली नाही. ओबीसींची संख्या अधिक असल्यामुळे ही माहिती ओबीसींच्या राजकारणामध्ये आमुलाग्र बदल घडवेल अशीही काहींची अपेक्षा आहे.

४.     सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणनेमुळे आरक्षणात वाढ होईल किंवा आरक्षण धोरण बदलेल असेही काहींना वाटते. हा मुद्दा अनेक अर्थांनी महत्वाचा आहे. आरक्षण धोरण बदलेल पण कशाप्रकारे बदलेल आणि का बदलेल हेही पाहिले पाहिजे. ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण आहे पण, त्यांची संख्या सत्तावीस टक्यांपेक्षा अधिक आहे पण निश्चित किती हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे या जनगणनेमुळे ओबीसींची संख्या कळेल. त्यांची समाजिक-आर्थिक स्थिती कळेल. त्यामुळे आरक्षण धोरणाचा त्यांच्या सामाजिक- आर्थिक स्थितीवर प्रभाव पडला की नाही हेही पडताळून पाहता येईल. मराठा क्रांती मोर्च्यानिमित्त्ताने ओबीसी प्रवर्गातील जातींच्या मुल्यांकन करा आणि जर एखादी जात आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक पुढारली असेल तर त्या जातीला ओबीसीच्या प्रवर्गातून वगळा अशी मागणी आली होती. पण, ते मुल्यांकन करण्यासाठी आपल्याकडे ओबीसींची माहितीच नव्हती आणि आजही नाही. सामाजिक, आर्थिक आणि जात जन गणनेची माहिती सार्वजनिक झाली तर आरक्षण धोरणसंबंधी काही ठोस निर्णय सुद्धा घेता येतील. उदा. काहींना ओबीसी प्रवर्गाच्या यादीतून काढणे, काहींना त्यात समाविष्ट करणे आणि ओबीसी अंतर्गत वर्गवारी करणे.

५.     सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणनेच्या माहितीचे राजकारण केले जाईल. असेही काहींना वाटते. पण, माहिती म्हटले की, माहितीचे राजकारण येणारच हे जगात सगळीकडे आणि सगळ्यावेळी झालेली गोष्ट आहे. लोक माहितीचे सोयीस्कर अर्थ लावतील. आपल्याला हवे तसे निष्कर्ष काढतील. या सगळ्या गोष्टी सर्वच प्रकारच्या माहितीच्या बाबतीत होतात म्हणून याच कारणांमुळे या जनगणनेच्या माहितीला विरोध करणे किंवा ती सार्वजनिक न करणे. हे काही तार्किक वाटत नाही. ही माहिती सार्वजनिक केली तर सरकारी धोरणांना फायदाच होईल. आतापर्यंत केलेल्या धोरणांचे या माहितीच्या आधारे मुल्यांकन करता येवू शकते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या देशाची निश्चित अशी ‘सामाजिक, आर्थिक आणि जातीय स्थिती काय आहे. हेही उघड होईल.

 

      सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणनेच्या माहितीच्या सार्वजनिकीकरणाने आपण भारतीय समाज म्हणून बरेच बदलणार आहोत. कारण, त्या माहितीमुळे आपल्या चांगल्या- वाईट धारणांना धक्के बसणार आहेत. आपल्या मानसिक प्रतिमांना ध्वस्त होतील. आपल्याला आपले विचार आणि भूमिका बदलाव्या लागतील. जुनाट मुद्दे आणि दावे नव्याने दुरुस्त करून घ्यावे लागतील अशा सगळ्या गोष्टी होतील असे मला वाटते. आपण समाज म्हणून हे बदलायला आणि नवीन तथ्ये, माहिती आणि वास्तव स्वीकारायला तयार आहे का मोठा प्रश्न आहे. 


पूर्वप्रसिद्धी- रसिक, दिव्यमराठी - २९ ऑगस्ट २०२१ 

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...