बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

समतेच्या स्वप्नसृष्टीसाठी झगडणारी सत्यशोधक- डॉ. गेल ऑम्वेट

 

       १९६०-७० चे दशक हे जगातील इतिहासाच्या दृष्टीने अनेक अर्थानी महत्वाचे आहे. कारण एकीकडे शीतयुद्धामुळे आफ्रिका- आशिया हे जागतिक घडामोडींचे केंद्र बनले होते. तर, दुसरीकडे संपूर्ण जगात तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या, नागरी हक्कांच्या चळवळींचा प्रस्थापित व्यवस्थेला नकार म्हणून उदय होत होता. अशावेळी, अमेरिकेतून एक गोरी मुलगी संशोधनासाठी भारतात येते आणि पुढे भारतातील ‘डाव्या चळवळी, सामाजिक चळवळींमध्ये सक्रीय होते. ही प्रक्रिया अनेक अर्थांनी महत्वाची आहे. त्याकाळातील व्यक्ती, विचार आणि प्रक्रिया या जागतिक  इतिहासाच्या संदर्भात समजावून घेतल्या तर अनेक धागेदोर उलगडतात.

         डॉ. गेल ऑम्वेट ज्या काळामध्ये भारतात संशोधनासाठी आल्या. त्याकाळात म्हणजेच शीतयुद्ध कालखंडात पहिल्या जगातील (भांडवली देशातील) अनेक तरुण तिसऱ्या जगात क्रांतिकारी चळवळी करण्यासाठी येत होती. प्रामुख्याने युरोप- अमेरिकेतील डाव्या विचारांचा प्रभाव असलेली तरुण मंडळी यामध्ये अधिक होती. याच काळात अमेरिकेतून आलेल्या अनेकांकडे संशयाने पाहण्याची रीत होती. सी. आय. ए. एजंट असण्याची शक्यता डाव्या चळवळीत वर्तवली जात होती. कारण, त्याकाळात शीतयुद्धाचे सांस्कृतिक डावपेचात्मक राजकारणही घडत होते. संशोधन, लेखन, साहित्य चर्चावर्तुळे, वृत्तपत्रीय लिखाण ही सांस्कृतिक शीतयुद्धाची रणभूमी होती. ‘कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम ही संघटना सी. आय. ए. च्या धोरणानुसार चालत होती आणि त्यामध्ये बऱ्याच मराठी विद्वानांचाही सहभाग होता असे आज अनेक कागदपत्रांच्या आधारे सिद्ध झाले आहे. डॉ. गेल ऑम्वेट यांच्याकडेही काहींनी सुरुवातीला संशयाने पहिल्याच्या आठवणी आहेत असे माझ्या ऐकण्यात आहे. म्हणूनच प्रथम त्यांचे व्यक्तीगत आयुष्य समजावून घेणे अत्यंत महत्वाचे ठरते.

          डॉ. गेल यांचा जन्म मिनिसोटा राज्यातील मिनिआपोलीस या शहरामध्ये १९४१ साली झाला. त्यांचे पूर्वज अनेक वर्षांपूर्वी युरोपातून अमेरिकेत स्थायिक झाले होते. गेल यांचे आजोबा ऑगस्ट ऑम्वेट हे टू हार्वर या शहरात राहत होते. तेथील स्थानिक डेमोक्रेटिक फार्मर लेबर पार्टीच्या माध्यमातून ते चारवेळा राज्य प्रतिनिधी (आमदार) आणि दोनवेळा महापौर म्हणून निवडणून आले होते. डॉ. गेल यांचे आई- वडील दोघेही सुद्धा त्याच पक्षाचे कार्यकर्ते होते. अमेरिकेतील राष्ट्रीय राजकारणात हा पक्ष डेमोक्रेटिक पक्षाचा भाग असतो. त्यामुळेच, पुढील काळात डॉ. गेल या विदयार्थी चळवळ, नागरी हक्क चळवळ, युद्धविरोधी चळवळीत सहभागी झाल्या. कारण कुटुंबांची परंपराच श्रमिकांच्या- कामगारांच्या बाजूची होती.

           त्याकाळाच्या युगधर्माप्रमाणे इतर तरुणांसारख्याच गेल ऑम्वेट तिसऱ्या जगाला समजून घेण्यासाठी संशोधक विदयार्थी म्हणून भारतात आल्या. त्यावेळी डॉ. एलिनोर झेलीएट यांचे मार्गदर्शन त्यांना मिळत होते. ‘वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड- महाराष्ट्रातील ब्राह्मणेत्तर चळवळीचा अभ्यास या विषयावर संशोधन करीत असतांना त्यांनी महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती, संस्था, ग्रंथालये, व्यक्तीगत संग्रह, पुराभिलेखागर धुंडाळली. विदर्भ, कोल्हापूर, मुंबई, पुणे अशा अनेक ठिकाणी पायपीट केली. तेव्हा कुठे सत्यशोधक समाजावर दीर्घकाळानंतर महत्वाचे संशोधन होवू शकले. तोपर्यंत आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासलेखनात सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेत्तर चळवळीवर अभिजनवादी दृष्टीकोनातून संकुचित व साचेबध्द मांडणी केली जात होती. डॉ. गेल यांच्या संशोधनामुळे महाराष्ट्रातील वैचारिक चर्चाविश्व आमुलाग्र बदलले. याकाळात त्या एकीकडे संशोधन करत होत्या आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील डाव्या चळवळींच्या, व्यक्तींच्या संपर्कात होत्या. महाराष्ट्रातील लाल निशाण पक्ष, नवमार्क्सवादी गट, फुले-आंबेडकर-मार्क्स (फुआमा) गट, मार्क्स-फुले-आंबेडकरवाद (माफुआ), बामसेफ, ओबीसी आणि स्त्रीमुक्ती चळवळींशी त्यांचा नजीकचा संबंध होता.

       पीएचडीचे संशोधन पूर्ण झाल्यावर आणि डॉ. भारत पाटणकरांशी लग्न केल्यानंतर त्यांनी भारतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. यासोबतच, त्यांच्या अभ्यासक आणि कार्यकर्त्या अशा दुहेरी जीवनाची भारतीय शैक्षणिक संस्थेमध्ये आणि सामाजिक चळवळींमध्ये सुरुवात झाली. शैक्षणिक संस्थांमध्ये आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये डॉ. गेल यांनी ‘समाजशास्त्रज्ञांमध्ये इतिहासकार आणि ‘इतिहासकारांमध्ये समाजशास्त्रज्ञ’ म्हणून भूमिका निभावली. देशातील आणि विदेशातील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, केंद्रांमध्ये आणि जगातील पातळीवरील संस्थांमध्ये प्राध्यापक, संशोधक आणि सल्लागार म्हणून कार्य केले आहे. ही सर्व कामे करत असतांनाच त्यांनी विपुल प्रमाणात ग्रंथसंपदा सुद्धा निर्माण केली. त्यामध्ये अत्यंत महत्वाचे ग्रंथ म्हणून- वासाहतिक समाजातील सांकृतिक बंड, सीकिंग बेगमपुरा, आंबेडकर टूवर्डस इनलायटन इंडिया, दलित व्हिजन, दलित अँड डेमोक्रेटिक रेव्होल्युशन इन इंडिया, अंडरस्टँडिंग कास्ट- बुद्धा, आंबेडकर अँड बियाँड, वी विल स्मॅश थिस प्रिझन, न्यू सोशल मुव्हमेंट इन इंडिया, व्हॉयलंस अगेन्स्ट विमेन, जेंडर अंड टेक्नोलॉजी, बुद्धीझम इन इंडिया, साँग्ज ऑफ तुकोबा या ग्रंथांचा समावेश होतो.

         डॉ. गेल यांनी त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेत्तर चळवळ, दलित चळवळ, शेतकरी चळवळ, स्त्री चळवळ, प्रती सरकार, पर्यावरण, युवक चळवळींचा मागोवा घेतला. तसेच, मार्क्स, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम, संत रोहिदास, आणि बुद्ध यांच्याविषयी सैद्धांतिक मांडणी केली. ईकोनॉमिक्स अँड पोलिटिकल विकली, सोशल सायंटिस्ट, जर्नल ऑफ साउथ एशियन स्टडीज, जर्नल ऑफ मॉडर्न एशियन स्टडीज अशा इंग्रजी आणि मागोवा, तात्पर्य, समाज प्रबोधन पत्रिका, बायजा, परिवर्तनाचा वाटसरू अशा मराठी वैचारिक आणि अकादमिक नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात त्यांनी लिखाण केले आहे. 

         समाजशास्त्रज्ञ आणि अभ्यासक म्हणून डॉ. गेल ऑम्वेट जेवढ्या प्रसिद्ध होत्या. तेवढीच प्रसिद्धी त्यांच्या सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक चळवळीच्या नाळेमुळे त्यांना मिळालेली आहे. धुळे- नंदुरबारमधील श्रमिक संघटना, स्त्री मुक्ती संघटना याच्याशी डॉ. गेल यांचा संबंध होता. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली दुष्काळ निर्मुलन, समान पाणी वाटप, स्त्री मुक्ती संघर्ष चळवळ, विठ्ठल रखुमाई आंदोलनाच्या बौद्धिक व सैद्धांतिक कामामध्ये आणि मोर्चांमध्ये डॉ. गेल यांचा महत्वाचा सहभाग होता. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामांतर आंदोलन, नर्मदा सरदार सरोवर आंदोलनामध्ये डॉ. गेल होत्या. मराठी साहित्य चळवळी आणि सांस्कृतिक राजकारण यामध्येही गेल ऑम्वेट यांनी सहभाग नोंदवला आहे. डॉ. गेल यांच्या निधनाच्या वार्तेनंतर त्यांच्या सहकारी डॉ. कुंदा प्र. नी. यांनी दोघींमधील काही पत्रव्यवहार समाज माध्यमावर टाकला. त्यामध्ये दिसते की, डॉ. गेल महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यात अभ्यास आणि चळवळ दोन्हींसाठी हिंडत असतांना तिसऱ्या जगाचा कानोसा नेहमीच घेत होत्या. फिलीफाईन्स, निकारगुआ या देशांमध्ये क्रांतिकारी चळवळी काय करत आहेत. युरोपातील डावे पक्ष आणि नवमार्क्सवादी चळवळींच्या भूमिका कशा आहेत. या गोष्टींवर डॉ. गेल महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना समजाव्यात म्हणून त्याविषयी चर्चा करत होत्या. इंग्रजी लेखांचे भाषांतरही त्यावेळी विपुल प्रमाणात केली गेली.

        दलित, आदिवासी आणि ग्रामीण साहित्य सभा, विद्रोही साहित्य चळवळशी त्या सुरुवातीपासून सोबत होत्या. डॉ. गेल वेगवेगळ्या सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय चळवळींशी संबंधित होत्या. आंदोलन आणि मोर्च्यामध्ये भाग घेत होती. म्हणूनच त्यांना सिद्धांता (थेअरी) सोबतच व्यवहार (प्रॅक्टीस) अत्यंत महत्वाची वाटत होती. डॉ. गेल यांच्या सैद्धांतिक मांडणीने त्यांचा व्यवहार घडवला आणि त्यांच्या व्यवहाराने त्यांची सैद्धांतिक बैठक समृद्ध केली.

       वेगवेगळ्या सामाजिक चळवळींचे ताणेबाणे आणि स्थित्यंतराचा अभ्यास करत करत डॉ. गेल ऑम्वेट यांचेही वैचारिक स्थित्यंतर आणि सैद्धांतिक विकास झाला असे दिसते. ‘वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंडाचा अभ्यास करतांना त्या मार्क्सवादी होत्या असे दिसते. पुढे, नवमार्क्सवादी फुले- आंबेडकर आणि बौद्धवादी झालेल्या दिसतात. कारण ‘बुद्धीझम इन इंडिया’ या ग्रंथामध्ये ‘आंबेडकरी बौद्धधर्मच नव्यायुगाचे वैचारिक दिग्दर्शन करू शकतो अशी भूमिका घेतलेली दिसते. त्यामुळेच डॉ. भारत पाटणकर त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘बौद्धिक शाहीर असे म्हणतात. असे असले तरी त्यांनी मार्क्सला पूर्णपणे कधीच नाकारलेले दिसत नाही.  

        शोषणमुक्तीच्या ध्येयवेडाने पछाडलेल्या पिढीची प्रतिनिधी डॉ. गेल होत्या. त्यासाठी त्या भारतात आल्या. महाराष्ट्रातील वाड्या, वस्त्या, तांडे फिरल्या. उन, पाऊस काहीही न पाहता ग्रामीण महाराष्ट्रात गेल्या. अनेकांशी वैचारिक वाद, चर्चा केल्या. दलित, आदिवासी, स्त्रिया, शेतकरी, पर्यावरण चळवळींचा संवादपूल झाल्या आणि शेवटी, स्मृती भ्रंश होईपर्यंत पर्यायी  स्वप्नसृष्टीचा शोध घेत राहिल्या. डॉ. गेल ऑम्वेट यांची महाराष्ट्राच्या वैचारिक सृष्टीला आणि ज्ञानव्यवहाराला नेहमी उणीव जाणवेल.  


पूर्वप्रसिद्धी- लोकरंग, लोकसत्ता - २९ ऑगस्ट २०२१ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...