गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

कॉ. विलास सोनावणे: कृती आणि विचारांची प्रयोगभूमी असलेला कार्यकर्ता विचारवंत !


                                                            


“हा देश, हा समाज माझा आहे आणि तो शांत व समृध्द राहावा म्हणून या समाजातील – देशातील वाईट धोरणांविरुद्ध, चुकीच्या धोरणांविरुद्ध मला लढत राहिले पाहिजे. ही माझी आंतरिक व प्रामाणिक गरज आहे.”                                                                                

                                                                    - कॉ. विलास सोनावणे,

 

 ‘समाजामध्ये अनेक प्रश्न असतात आणि त्या त्या वेळची समाजामध्ये असलेली जी काही घुसळण असते, ती कुठल्या ना कुठल्या निमित्तानं चालू असते. ते निमित्त कधी सांस्कृतिक असू शकत, कधी सामाजिक असू शकत, कधी राजकीय असू शकत... कुठल्याही निमित्ताने जी काही घुसळण होते ती राजकीय सत्तेला आव्हान देणारी असते. कुठलीही घुसळण कुठल्याही निमित्ताने होऊ द्या.’ अशी सर्वधर्मीय सर्वपंथीय सामाजिक परीषदेची राजकीय भूमिका मांडणारे कॉ. विलास सोनावणे यांचे दिर्घकाळ पार्किन्सनच्या आजाराने निधन झाले. कॉ. विलास सोनावणे महाराष्ट्रातील सांस्कृतिक, राजकीय चळवळीतील अत्यंत महत्वाचे नाव होते. त्यांच्या राजकीय चळवळीची सुरुवात ही एस. एफ. आय या विद्यार्थी संघटनेपासून झालेली होती. त्यानंतरच्या काळात त्यांनी विविध संघटना स्थापन्यामध्ये आणि चळवळी सुरु करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे. सी. पी. एम.,  सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी, नक्षलवादी चळवळ, मुस्लीम मराठी आणि मुस्लीम ओबीसी चळवळ, संवाद प्रक्रिया, सकल साहित्य संमेलन, युवा भारत आणि सर्वधर्मीय सर्वपंथीय सामाजिक परिषद- या सारख्या चळवळी आणि संघटना स्थापण्यात त्यांचा कधी सदस्य, कधी संस्थापक आणि कधी मार्गदर्शक म्हणून महत्वाचा वाटा आहे. तसेच, सेजविरोधी चळवळ, डाऊविरोधी चळवळ यामध्ये नेता म्हणूनही त्यांची महत्वाची भूमिका होती. संस्था, संघटना आणि चळवळीसोबतच महाराष्ट्रातील आणि देशातील वैचारिक आणि बौद्धिक चर्चाविश्वांमध्येही त्यांनी महत्वाचे बौद्धिक हस्तकक्षेप केले आहेत. या सर्व घटना, प्रक्रिया आणि मुद्द्यांच्या माध्यमातून कॉ. विलास सोनावणे यांची कृती आणि विचार आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.   

                                           १.

        खानदेशातील सत्यशोधक चळवळीच्या कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात कॉ. विलास सोनावणे यांचा जन्म झाला. तरीही, आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा सत्यशोधक विचारांशी त्यांचा सबंध नव्हता असे त्यांनी नोंदवले आहे. कारण, त्यांचे वडील मुंबईत पोलीस असल्यामुळे त्यांचे बालपण आणि तरुणपणाचा मोठा काळ हा मुंबई या औद्योगिक नगरीतच गेला. १९६० – १९७० ही दशके मुंबईच्या नव्हे तर संपूर्ण भारताच्या आणि जगाच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत. या काळात संपूर्ण जगात तरुणाईने जग बदलण्यासाठी आंदोलने उभी केली होती. त्याचा परिणाम मुंबईतील तरुणांवरही होत होता. त्यामुळे मुंबई शहरात वेगवेगळ्या विचारांच्या चळवळी झपाट्याने वाढत होत्या. कॉ. विलास सोनावणे यांच्यावरही या सर्व घटनांचा प्रभाव पडत होता. तरुणपणाच्या सुरुवातीच्या टप्यामध्ये विलास सोनावणे घरातून पळून गेले होते. त्यावेळी, त्यांना एका मार्क्सवादी कुटुंबाने सहारा दिला होता. अशा स्वरुपात मार्क्सवादी मंडळींचा आणि विलास सोनावणे यांचा पहिल्यांदा परिचय झाला असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

       कॉ. विलास सोनावणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाचे पहिले ‘कम्युनिस्ट जी. एस.’ होते. त्यांनी स्वतःच याविषयी बऱ्याच ठिकाणी लिहिले आहे. मराठा जातीची पार्श्वभूमी असली तरी ‘सोनवणे या आडनावामुळे आरंभी इतर विदयार्थी मंडळी त्यांना ‘दलित समजत होती असेही त्यांनी नोंदवले आहे. त्यावेळी, सिद्धार्थ महाविद्यालय हे दलित चळवळीचे केंद्र असल्यामुळे मोठ मोठी मंडळी तिकडे भेटी देत होती. सोबतच, जातीची चर्चाही खूप होत होती. त्यामुळे एका वेगळ्या सामाजिक विश्वाची ओळख कॉ. विलास सोनावणे यांना सिद्धार्थ महाविद्यालयाने करून दिली असेही त्यांनी नोंदवले आहे.  महाविद्यालयात कम्युनिस्ट चळवळीचे काम करायला सुरुवात केल्यामुळे त्यांना काही अडचणींना सामोरेही जावे लागले. कारण, त्या काळात कम्युनिस्ट चळवळ आणि दलित चळवळ यांचे ध्येय वेगवेगळी आहेत असेही म्हणणारी काही मंडळी होती. नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांच्या वादाचीही पार्श्वभूमी याला असावी असेही आज वाटते. कारण, त्याकाळी असे म्हटले जात होते की, दलित पँथरच्या स्थापणेमागे नक्षलवादी चळवळीचा हात आहे.

        मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विदयार्थी संघटनेचे महाराष्ट्राचे संस्थापक सचिव म्हणूनही कॉ. विलास सोनावणे यांची ओळख आहे. ज्यावेळी विलास सोनावणे एस. एफ. आय. या विदयार्थी संघटनेचे सचिव होते. त्यावेळीच कॉ. शरद पाटील आणि त्यांची ओळख झाली होती. पुढील काळात ज्यावेळी, मा. क. पक्षामध्ये कॉ. शरद पाटील आणि पक्षश्रेष्टी यांच्यामध्ये वैचारिक वाद निर्माण झाला होता. त्या वादामध्ये कॉ. शरद पाटलांची भूमिका योग्य अशी भूमिका घेतल्यामुळे कॉ. शरद पाटील यांच्यासोबत कॉ. विलास सोनावणे यांनाही पक्षाने काढून टाकले होते. एकीकडे कॉ. शरद पाटील पक्षातील लोकांशी वाद घालत होते आणि दुसरीकडे मार्क्सवादासोबत फुले- आंबेडकरवादाचा संयोग करत होते. त्यामुळे मा. क. पक्षामधून काढून टाकल्याबरोबर त्यांनी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. त्यामध्ये कॉ. विलास सोनावणे यांचाही सहभाग होता. परंतु, काही महिन्यांनीच कॉ. विलास सोनावणे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षापासून वेगळे झाले आणि त्यांनी नक्षलवादी चळवळीत सहभाग घेतला. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षापासून आपण नेमक्या कोणत्या कारणांमुळे वेगळे झालो याचे म्हणावे तसे स्पष्टीकरण कॉ. विलास सोनावणे यांनी दिलेले नाही. कॉ. शरद पाटील यांचे निधन झाल्यावर स्मृतीपितर्थ्य लिहिलेल्या लेखात त्यांनी काही कारणांचा उहापोह केला आहे पण त्याची सत्यता पडताळून पाहण्यास वेगळी साधने नाहीत. मार्क्स-फुले आंबेडकरवादासंदर्भात त्यांचे काही मतभेद होते असे मात्र त्यांच्या मांडणीत वारंवार आलेले आहे.

       कॉ. सोनावणे यांनी ज्यावेळी नक्षलवादी चळवळीत प्रवेश केला. त्यावेळी देशभरात नक्षलवादी गटांचे अनेक पक्ष देशभरात कार्यरत होते. त्यांच्यामध्ये राजकीय भूमिकेवरून विविध प्रकारचे मतभेद होते. त्यामध्ये संस्कृती, भाषा, धर्म, जात अशा अनेक गोष्टींचा समावेश करता येवू शकतो. सी. पी. आय. ( एम. एल. – सी. आर. सी.) या पक्षाचे ते कार्यकर्ते होते आणि कोणत्याही प्रकारची राष्ट्रीय समिती या पक्षाची नव्हती. कारण, भारत हे एक राष्ट्र नसून ते अनेक राष्ट्रांचा एक संघ आहे म्हणून प्रत्येक राष्ट्राच्या पक्षाला स्वायत्तता असावी असे म्हणत देशाच्या वेगवेगळ्या भूभागात त्यांच्या पक्षाची स्थापना झाली होती. तसेच, त्यांचा पक्ष हा  प्रामुख्याने ब्राह्मणेत्तर कम्युनिस्टांचा पक्ष होता असेही त्यांनी काहीवेळा नोंदवलेले होते. पुढे, वर्गेत्तर सामाजिक रचनांविषयी पक्ष कोणतेही ठोस भूमिका घेत नाही. तसेच, पक्षाचा कृतीकार्यक्रमही नाही म्हणून त्यांनी पक्ष विसर्जित करून टाकला. त्यामुळे त्यांना डाव्या वर्तुळात ‘विसर्जनवादी असे म्हणून हिणवलेही गेले आहे.

                                          २.

       १९८०-९० दशकामध्ये घडलेल्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बदलांमुळे भारतीय राजकारणाची दिशाच बदलली. मंडल, कमंडल आणि खा.ऊ. जा. धोरणामुळे भारतीय बऱ्याच घडामोडी झाल्या. जनार्दन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी चळवळ कार्यरत होती. त्यावेळी, कॉ. विलास सोनावणे जनार्दन पाटील यांच्याशी जोडले गेले. त्यातून पुढे मुस्लीम ओबीसी चळवळ, सर्वधर्मीय ओबीसी चळवळ संघटीत करण्यात आली. एकीकडे हिंदू – मुस्लीम धृवीकरणाला छेदण्यासाठी आणि दुसरीकडे मुस्लीम उत्पादक जातींनाही मंडल कमिशनचा फायदा मिळावा म्हणून मुस्लीम ओबीसी चळवळ संघटीत करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने कॉ. विलास सोनवणे यांचा मोठा वाटा होता. सर्वधर्मीय ओबीसी चळवळीचे संघटन करूनही व्यापक ओबीसीहिताची मांडणी त्यांनी केली आहे. मात्र, मुस्लीम ओबीसी चळवळीप्रमाणे सर्वधर्मीय ओबीसी चळवळीचा म्हणावा तसा प्रसार झाला नाही. हिंदू- मुस्लिमांच्या जमातवादी राजकारणाच्या प्रचाराला ध्वस्त करण्यासाठी आपल्या काही सहकारी दोस्तांसह त्यांनी मुस्लीम मराठी चळवळीची सुरुवात केली. त्यामध्ये इक्बाल मिन्ने, फकरुद्दीन बेन्नूर यांच्यासारखे अजून काही मंडळी त्यांच्यासोबत होती. मुस्लीम मराठी साहित्य चळवळीने साहित्य संमेलन घेवून सांस्कृतिक राजकारणात हस्तकक्षेप केला. त्यामुळे उर्दू हीच सगळ्या मुस्लिमांची भाषा आहे हा जमातवादी गैरसमज रद्दबादल करण्यात आला. देशोदेशीचे आणि प्रांतोप्रांतीचे मुसलमान हे भाषिक, सांस्कृतिक, पेहराव आणि खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीने वेगवेगळे आहेत अशी मांडणी करत त्यांनी मुस्लिमांच्या एकसाचीकरणाच्या इस्लामी आणि हिंदुत्ववादी प्रयोगांची चिकित्सा केली. यासंदर्भात मुस्लीम प्रश्नाची गुंतागुंत हे त्यांचे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे.

       १९९० च्या दशकात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ‘ब्राह्मणी वृत्तीच्या व्यवहाराला प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रातील दलित, डाव्या आणि पुरोगामी चळवळीतील साहित्यिक, कार्यकर्ते मंडळींनी विद्रोही साहित्य संमेलनाची सुरुवात केली. त्यातूनच विद्रोही सांस्कृतिक चळवळीची सुरुवात झाली. कॉ. विलास सोनावणे यांनाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ‘ब्राह्मणी वृत्ती’ला नकार होता. सोबतच, त्यांना विद्रोहीची भूमिका मान्य नव्हती. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी सकल संमेलनाचे पर्यायी आयोजन केले. ‘अखिल’मध्ये सर्वांना स्थान नसते. त्यामुळे ‘सकल’मध्ये सर्वांना सामावून घेणे अशी त्यांची भूमिका होती. तुम्ही आम्हाला सामावून घेत नाही म्हणून आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू अशी त्यांची भूमिका नव्हती. बहिष्काराची भूमिका त्यांना मान्य नव्हती म्हणून त्यांनी प्रतिक्रियावादी नव्हे तर पर्यायी सकल संमेलन आयोजित केले होते असेही त्यांनी म्हटले आहे. आज बऱ्याच वर्षांनी मागे वळून पाहिले तर असे दिसते की, सकल साहित्य संमेलन एकदाच झाले. विद्रोही सातत्याने होते पण त्याच्यामध्ये खूपच गटबाजी झालेली आहे. त्यामुळे त्याला म्हणावा तसा लोकबळ अजूनही मिळालेले दिसत नाही. मात्र,  एक गोष्ट खरी आहे. ती म्हणजे सकल आणि विद्रोही या दोन्ही संमेलनांनी काही मुलभूत प्रश्न सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वासमोर उभे केले होते आणि त्यामध्ये कॉ. विलास सोनवणे यांची महत्वाची भूमिका होती.  

      खा. ऊ. जा. धोरणाच्या माध्यमातून एका नव्या प्रकारचा आर्थिक साम्राज्यवाद देशात येऊ घातला आहे अशी भूमिका घेवून वेगवेगळ्या विचारसरणीच्या मंडळींना एकत्रित करून नवीन चिंतन, मंथन आणि संघटन घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रारंभी छात्र-युवा संघर्ष वाहिनी आणि जे. पी. आंदोलनाची पार्श्वभूमी असलेल्या मंडळींनी बिहारमध्ये संवाद प्रक्रियेला सुरुवात केली. त्या प्रक्रियेत कॉ. विलास सोनवणे जोडले गेले आणि त्यांनीही त्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका निभावली. या संवाद प्रक्रियेत गांधीवादी, सर्वोदयवादी, लोहियावादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी अशी देशातील विविध भागातील मंडळी सहभागी झाली होती. संवादप्रक्रियेतूनच नव्या भारताचे स्वप्न पाहणाऱ्या युवा भारत या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेच्या अनेक संस्थापक सदस्यांपैकी एक सदस्य म्हणून कॉ. विलास सोनावणे ओळखले जातात. युवा भारतच्या माध्यमातून देशभरात आंदोलने, चळवळी आणि मोर्चे झालेत. वेगवेगळ्या विचारसरणीच्या मंडळींशी संबंध आल्यामुळे कॉ. विलास सोनवणेंच्या दृष्टीकोनातही बराच बदल झालेला दिसतो. प्रामुख्याने महात्मा गांधींच्या चळवळीचे आणि विचारांचे कॉ. विलास सोनवणे यांचे मार्क्सवादी आकलन अनेक गांधीवादी मंडळींना आकर्षित करणारे ठरले आहे. कॉ. शरद पाटील यांच्या ‘माफुआ’शी मतभेद नोंदवणारे कॉ. विलास सोनवणे ‘माफुगा (मार्क्स-फुले-गांधी) अशी मांडणी करत होते. त्यामुळेही, गांधीवादी वर्तुळात साम्राज्यवादविरोधी आणि जातीकडे उत्पादन व्यवस्था म्हणून पाहणारा कॉ. विलास सोनवनेंचा गांधी प्रभावी ठरला आहे आणि म्हणूनच आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात कॉ. विलास सोनावणे डॉ. भालचंद्र नेमाडेंच्या देशीवादाने प्रभावित होते असेही दिसते.

                                       ३.

      सेज ( विशेष आर्थिक क्षेत्र) च्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचे षडयंत्र भांडवलदारांनी केले होते. त्यावेळी सेजविरोधी लढ्याचे नियोजन करून न्या. सावंत आणि न्या. कोळसे पाटील यांच्यासोबत कॉ. विलास सोनावणे यांनी अंबानीच्या विरोधात लढा दिला. तसेच, कोकणातील कुणबी शेतकऱ्यांच्या चळवळीला मार्गदर्शन आणि दिशादर्शनही केले. सोबतच, पुणे शहराजवळ असलेल्या डाऊ या कंपनीच्या विरोधात वारकरी नेते बंडातात्या कराडकर, न्या. सावंत आणि न्या. कोळसे पाटील यांच्यासोबत कॉ. विलास सोनवणे आंदोलन केले आणि डाऊ कंपनी जाळून टाकली. यावेळी, कॉ. सोनावणे हे लोकशासन आंदोलन या चळवळीत न्या. सावंत आणि न्या. कोळसे पाटील यांच्यासोबत काम करत होते. डाऊ कंपनीच्या विरोधातील चळवळीचे डावपेच, धोरणे हे सर्व कॉ. विलास सोनावणे आखत होते अशी कबुली स्वतः बंडातात्या कराडकर यांनी दिलेली आहे. वारकरी संप्रदायाला डाऊ विरोधी आंदोलनात सामावून घेतल्यामुळे, बंडातात्या कराडकर यांची विश्व हिंदू परिषदेची असलेल्या जवळकीमुळे अनेकांनी कॉ. विलास सोनवणे यांच्यावर टीका केली. पण, ज्यावेळी डाऊ कंपनी वारकरी मंडळींनी जाळल्यावर अनेकांना धक्का बसला. धर्म, संस्कृती आणि पर्यावरण याची सांगड घालून जनआंदोलन कसे उभे करता येते याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे डाऊविरोधी आंदोलन.

     मार्क्सवादी बैठकीने कॉ. विलास सोनवणे ध्येयसृष्टी घडवलेली असल्यामुळे सातत्याने भांडवलशाही, आणि त्तिच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि वैचारिक परिणामांची चिकित्सा करणे हे त्यांचे काम होते.वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (डब्लू. टी. ओ.) ही आंतरराष्ट्रीय संघटना भांडवली धोरण राबवते. आर्थिक साम्राज्यवाद पसरवते. तीला पर्याय म्हणून वर्ल्ड सोशल फोरम (डब्लू. एस. एफ.) ची स्थापना जगातील समाजवादाकडे झुकणाऱ्या देशांनी केली होती. परंतु,  वर्ल्ड सोशल फोरम मध्ये अनेक स्वयंसेवी संस्थांनी भांडवली पैसा गुंतवला आहे. त्यामुळे काही मंडळींनी मुंबईत होवू घातलेल्या फोरमच्या सभेला प्रतिक्रिया म्हणून ‘ मुंबई -०४ प्रतिरोध ही पर्यायी सभा भरवली होती. कॉ. विलास सोनवनेंचा वर्ल्ड सोशल फोरमच्या भूमिकेला विरोध होताच पण सोबतच त्यांचा विरोध ‘ मुंबई- ०४ प्रतिरोध या सभेलाही होता. कारण, फोरमच्या सभेमध्ये बोलणाऱ्या अरुंधती रॉय याच प्रतीरोधच्या सभेतही बोलणार होत्या आणि कॉ. सोनवणे यांना विसंगत वाटत होते म्हणून त्यांनी विरोध केला. परिवर्तनाचा वाटसरूमध्ये त्यांनी यासंदर्भात एक सविस्तर लेखही लिहिला आहे.

 

         महाराष्ट्रातील जातीचिंतनामध्येही कॉ. विलास सोनवणे यांचे महत्वाचे योगदान आहे. प्रामुख्याने ओबीसी – कारागीर जातींना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी जात एक उत्पादन व्यवस्था अशी मांडणी केली आहे. मुस्लीम ओबीसी जातींचीही अशी चर्चा ते करतात. त्यामुळे त्यांची जातीचर्चा ही वेगळी ठरते. अस्पृश्यता आणि जातीव्यवस्था यामध्येही ते फरक करतात. त्यामुळे अस्पृश्य जातींच्या धर्तीवर कारागीर जातींची चर्चा आपण करू शकत नाही असेही ते नोंदवतात. खोती विरुद्ध चरीच्या संपाविषयी भरभरून बोलणारे कॉ. विलास सोनावणे डॉ. आंबेडकरांची जातीचिकित्सा समजावून घेण्यास काहीसे कमी पडतात असे एकीकडे होत असले तरी दुसरीकडे ते स्वतःच्या चिंतनाने आणि निरीक्षणाने जातीचर्चा व्यापकही करतात हेही तेवढेच सत्य आहे. साहित्यिक व्यवहारात त्यांनी उघडपणे डॉ. नेमाडेंच्या देशीवादाचा पुरस्कार केला होता याचा वर उल्लेख आला आहे. त्यामुळे त्यांना समर्थन मिळाले आणि विरोधही झाला. नेमाडेंच्या देशीवादाला सकारात्मक दिशा द्यायची गरज आहे असे सुरुवातीला म्हणणारे कॉ. विलास सोनवणे देशीवादसंदर्भात काहीसे अचिकित्सक होतात. कारण, याबाबतीत त्यांच्यातील मार्क्सवादी व्यक्तीवर त्यांचे गांधीवादी आकलन भारी पडतांना दिसते. तसेही, जगभरात साम्राज्यवादाला, जागतिक भांडवलशाहीला प्रतिक्रिया म्हणून आलेल्या देशीवादी प्रतिक्रियांना कसे सामोरे जावे हा जागतिक कम्युनिस्ट चळवळीसमोरील प्रश्न आहे.

        पुढील काळात सांस्कृतिक संघर्ष अधिक ठळक होतील असे कॉ. विलास सोनवणेंना वाटत होते. त्यामुळेच त्यांना सर्वधर्मीय सर्वपंथीय सामाजिक परिषद अत्यंत महत्वाची आहे असे त्यांचे म्हणणे होते. समाजातील लोक, आजूबाजूचे पर्यावरण आणि निसर्ग जिवंत राहिला तर आपापले धर्म, संप्रदाय जिवंत राहतील. त्यामुळे लोकांच्या प्रश्नावर, पर्यावरण, निसर्ग, आर्थिक प्रश्न यावर सर्वधर्मीय सर्वपंथीय समाजिक परिषदेने भूमिका घेतली पाहिजे असे त्यांचे आग्रही प्रतिपादन होते. म्हणूनच, महाराष्ट्रात बौद्ध, महानुभाव, वारकरी, लिंगायत, मुस्लीम, शीख, जैन अशा सर्वधर्मीय सर्वपंथीय विद्वतजनांना सोबत घेवून महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये परिषदांचे आयोजन केले. या परिषदांच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, पर्यवरण संवर्धन आणि आर्थिक-सामाजिक विषमता याविषयी भूमिका घेण्यात आल्या.

         मागील चार – पाचवर्षांपूर्वीपर्यंत कॉ. विलास सोनवणे गतिशील आणि कृतीशील होते. आजाराने ग्रस्त झाल्यामुळे त्यांची भटकंती थांबली होती. पण, त्यांनी संपूर्ण आयुष्यात राजकीय आणि वैचारिक क्षेत्रात खूपच मुशाफिरी केली. त्यामुळे ते सातत्याने विकसित झालेले आणि बदलत गेलेले दिसतात. कृतीमुळे विचार बदलणे आणि विचारामुळे कृती बदलणे असे त्यांनी संपूर्ण आयुष्य केले त्यामुळेच त्यांचा विचारविश्व विविध गोष्टींनी विणलेले आहे. त्यांच्या निधनाने मराठी विचारसृष्टीने अत्यंत महत्वाचा कृती- विचार मेळ घालणारा कार्यकर्ता-विचारवंत गमावला आहे.   


पूर्वप्रसिद्धी- मिळून साऱ्याजणी, डिसेंबर २०२१ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...