सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

चित्रपट, सामाजिक घुसळण आणि राजकीय प्रपोगंडा!

      मागील काही दिवसांत पावनखिंड, झुंड आणि कश्मीर फाईल्स हे चित्रपट प्रदर्शित झाले.  या चित्रपटांवर लोकांनी भरभरून वेगवेगळ्या पद्धतीने लिखाण केले. सामाजिक माध्यमांवर काहीवेळा पावनखिंड विरुद्ध झुंड, झुंड विरुद्ध कश्मीर फाईल्स असा झगडाही लावण्यात आला. तसेच, आम्ही हा चित्रपट पाहणार नाही, दुसराच पाहू असेही अनेकांनी सार्वजनिकरित्या जाहीर केले. वेगवेगळ्या प्रसारमध्यामांवरून या सर्व प्रकरणाची चर्चा झाली आणि अजूनही चालू आहे. तसेच, कधी नव्हे ते स्पष्टपणे जातीय चर्चा उघडपणे या चित्रपटांच्या निमित्ताने झाली. चित्रपटांमुळे जातीयवाद वाढत आहे असे काहीजण म्हटले तर चित्रपटामुळे जातवास्तव स्पष्टपणे बाहेर येत आहे असेही काहीजण म्हणाले. सार्वजनिक ठिकाणी आणि समाजमाध्यमांमध्ये एक मोठी सामाजिक घुसळण या चित्रपटांच्या निमित्ताने होत आहे. या सगळ्या प्रक्रियेतून एक गोष्ट स्पष्टपणे दिसत आहे की, भारतीय चित्रपटांचे समाजशास्त्र बदलत आहे. त्यामुळेच चित्रपटांचे आशय, संवाद, नायक आणि प्रेक्षकसुद्धा बदलत आहेत.

     चित्रपट हे राजकीय बदल आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे अत्यंत महत्वाचे साधन आहे. म्हणूनच, स्वातंत्र्याच्या चळवळीतील लोकमान्य टिळकांनी भारतीय चित्रपटकर्मींना आर्थिक मदत केली होती. पुण्यामध्ये सरंध्री हा चित्रपट पाहिल्यावर लोकमान्य टिळक बाबुराव पेंटरांना म्हणाले की, “ चित्रपटकला ही राष्ट्राच्या दृष्टीने फार उपयुक्त कला आहे. लोकजागृतीच्या कार्यात हिचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात करून घेता येईल. तुम्ही जालियनबाग हत्याकांडाचे चित्र काढा. त्यात काम करण्यासाठी ओडवायरसाहेबासारखा दिसणारा इसम मात्र शोधला पाहिजे. लोकजागृतीच्या दृष्टीने आमच्या शेकडो व्याख्यानांपेक्षा व लेखांपेक्षा चित्रपटाच साधन कितीतरी पटीन अधिक प्रभावी आहे.”  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चित्रपट हे अत्यंत महत्वाचे माध्यम आहे की, ज्याच्या माध्यमातून सामाजिक बदल आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होवू शकतो असे म्हटले आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात आणि त्यानंतरच्या काळात राजकीय आणि सामाजिक दृष्टीने लोकजागृतीच्या दृष्टीने अनेक चित्रपट बनवले गेले. राजकीय आणि सामाजिक प्रश्नांची चिकित्सा करण्यासाठीही चित्रपट बनवले गेले. तसेच, सरकारी प्रपोगंडा पसरवण्यासाठीसुद्धा चित्रपट बनवले गेले आणि अजूनही बनवले जात आहेत.

    राजकीय चित्रपट आणि प्रचारी चित्रपट यामध्येही आपण स्पष्टपणे फरक गेला पाहिजे. चित्रपटाच्या माध्यमातून राजकीय भाष्य करणे वेगळी गोष्ट आहे आणि चित्रपटाच्या माध्यमातून विशिष्ट राजकीय विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करणे, विशिष्ट राजकीय पक्षासाठीचा वातावरण निर्मिती करणे आणि विशिष्ट समूह, प्रदेश किंवा व्यक्तीचे राजकीय डावपेच म्हणून नकारात्मक चित्रण करणे ही पूर्णत: वेगळी गोष्ट आहे. इतिहासामध्ये अनेकवेळा चित्रपटांच्या माध्यमातून सांस्कृतिक, राजकीय आणि वैचारिक धुरीणत्व आणि वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न झालेला आहे. उदा. अमेरिकेत निर्माण होणाऱ्या इंग्रजी चित्रपटांमध्ये अनेकवेळा अमेरिकन प्रपोगंडा स्पष्टपणे दिसतो.

     १९४५ साली नथुराम गोडसे संपादित अग्रणी या मासिकात नोव्हेंबरच्या अंकात ‘चित्रपटांतून राजकीय मतांचे संस्कार असा लेख नंदकुमार खानविलकर यांनी लिहिला होता. कॉंग्रेसने त्याकाळात चित्रपट माध्यमाचा वापर आपल्या प्रचारासाठी केल्यामुळे हिंदुत्ववादी असलेले खानविलकर त्यांच्यावर टीका करतात. ते लिहितात की, “ कोणतेही विधान जनतेच्या मनावर निरनिराळ्या साधनांनी पुन: पुन: बिंबविले तर कळत आणि नकळत त्या विधानाचे खोल ठसे मनावर उमटतात नि कालांतराने ते विधान सत्य आहे की असत्य, युक्त आहे की अयुक्त आहे, पथ्य आहे की अपथ्य आहे याचा विवेक करण्याइतकी जाणीवच जनमनांतून नाहीशी होते. आणि या सिद्धांताच्या आधारे ‘एक नेता, एक पक्ष, एक कार्यक्रम या घोषणेचा हिटलर दलाच्या दैनंदिन लष्करी मिरवणुकीतून, नाझींच्या प्रचारसभांतून, विद्यार्थ्यांच्या क्रमिक पुस्तकांतून, शाळेत लावलेल्या फलकावरून, रेडीओमधून, वृत्तपत्रांतून नि चित्रपटांमधूनहि सतत उच्चार  गोबेल्सच्या प्रचारयंत्राच्या वतीने करण्यात येत होता. आणि त्या अव्याहत उच्चारामुळे जनतेची मन:प्रवृत्ति त्यांनी हवीतशी बनवून घेतली. हिंदुस्थानात आज कार्य करीत असलेल्या कॉंग्रेसने हे प्रचाराचे फॅसिस्ट तंत्र उचललेले आहे.” 

      आजही आपल्या आजूबाजूला गोबेल्सच्या प्रचारयंत्राचा वापर करून सातत्याने खोट्या गोष्टी खऱ्या म्हणून वारंवार सांगितल्या जातात. त्यामुळे लोकांची निरक्षीरविवेकबुद्धी मारली जाते. ऐतिहासिक सिनेमाच्या माध्यमातून इतिहासविषयक जी चर्चा घडवली जाते. ती बऱ्याचवेळा आपल्या सामजिक आरोग्याला धोकादायक असते. तसेच, इतिहासाची मोडतोड आणि विकृतीकरण करणारी सुद्धा असते. कारण, सर्वसामान्य प्रेक्षक चित्रपटातून दाखविल्या जाणाऱ्या गोष्टीलाच वास्तव समजत असतो. सत्य घटनेवर किंवा इतिहासावर आधारित असलेला चित्रपट कधीही सत्य इतिहास सांगत नसतो कारण, सगळा चित्रपट हाच एक संपादित फीत असल्याने पडद्यावरील दृश्ये इतिहास जसाच्या तसा दाखवतात हा युक्तिवाद फोल आणि खोटा आहे. म्हणूनच चित्रपटांकडे नेहमीच चिकित्सक दृष्टीने पहावयास हवे असे प्रसिद्ध चित्रपट इतिहासकार अनिरुद्ध देशपांडे म्हणतात. चित्रपटांमुळे सामाजिक घुसळण होणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु, आपल्या आजूबाजूला चित्रपट राजकीय प्रपोगंडाच्या माध्यमातून द्वेष तर पेरत नाहीत ना? हे नागरिक आणि प्रेक्षक म्हणून तपासून पाहिले पाहिजे. 

    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...