सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

मुस्लीम प्रश्न समजून घेतांना...!

  

           मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात आणि देशात मुस्लिमांचा विचार आणि व्यवहार यांचा इतिहास आणि वर्तमान काय आहे आणि भविष्य काय असेल याची चर्चा सध्या जोरदारपणे ‘सार्वजनिक चर्चाविश्वा’त आणि ‘अकादेमिक चर्चाविश्वा’त चालू आहे. या चर्चेला जसे स्थानिक संदर्भ आहेत तसेच वैश्विक संदर्भ सुद्धा आहेत. त्यामुळे ‘मुस्लीम प्रश्ना’ची चर्चा करतांना दोन्ही संदर्भाचा आधार घेतल्याशिवाय प्रश्नाच्या किंवा चर्चेच्या मूळगाभ्यापर्यंत जाता येणार नाही. सदरील निबंधात/लेखात आपण मुख्यत: मुस्लीम प्रश्नाची चर्चा करणार आहोत. त्यामुळे ‘इस्लामिक प्रश्न’ आणि ‘मुस्लीम प्रश्न’ यात गोंधळ करू नये. ‘इस्लामिक प्रश्न’ प्रामुख्याने धर्म, धर्मशास्त्र आणि धार्मिक तत्वज्ञान याच्या भोवती फिरतो तर ‘मुस्लीम प्रश्न’ प्रामुख्याने मुस्लीम समाज आणि त्यातील भाषिक, सांस्कृतिक, वांशिक, राष्ट्रीय, जातीय वेगळेपण, मुस्लीमांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती, मुस्लीम समाजाचे भू-राजकीय अर्थशास्त्र या भोवती फिरतो.  मुस्लीम समाज हा इस्लामधर्मीय असल्यामुळे ‘इस्लामिक प्रश्न’ हा ‘मुस्लीम प्रश्ना’पासून पूर्णपणे वेगळा काढता येत नाही आणि त्याचवेळी इस्लाममध्येच पूर्ण ‘मुस्लीम प्रश्न’ संकुचित सुद्धा करता येत नाही. याची आवर्जून दखल घ्यायला पाहिजे. कारण, धर्म एक असला तरी पंथ, अन्वयार्थाच्या न्यायिक परंपरा, भू-सांस्कृतिक वैविध्य असल्यामुळे मुस्लीम समाजाने ‘बहुजिनसी’ स्वरूप विकसित केले आहे.  हल्ली, वाढत्या  ‘इस्लामोफोबिया’ आणि ‘इस्लामीकरणा’मुळे ‘पुस्तकी इस्लाम’ लाच ‘व्यावहारिक इस्लाम’ समजले जात आहे आणि त्यातून अनेक गोंधळ निर्माण होतांना दिसतात. यामुळे परिस्थितीचे ठोस, अचूक आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करता येत नाही.  पुढे काही मुद्द्यांच्या आधारे ‘मुस्लीम प्रश्न’ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मुसलमान म्हणजे कोण? -                                                                       

               मुसलमान ही अस्मिता/ओळख जशी सामाजिक, ऐतिहासिक आहे तशीच तात्विक सुद्धा आहे. संबंधित प्रश्न तसा खूपच सोपा प्रश्न वाटतो पण या प्रश्नाचे उत्तर द्यायला गेले की, हजार वेळा विचार करावा लागतो. “...हा चांगला माणूस आहे पण मुसलमान नाहीये.’  असे महाराष्ट्रातील एक सुन्नी मुस्लीम सामाजिक कार्यकर्ता दुसऱ्या एका अहमदिया मुस्लीम सामाजिक कार्यकर्त्याबद्दल सहज बोलून गेला. तेंव्हापासून  मुसलमान म्हणजे नेमकं कोण? याचा गांभीर्याने विचार करायला हवा असे मला वाटू लागले. काही लोक सरसकट जो इस्लाम धर्मीय आहे त्याला मुसलमान समजतात आणि सगळे मुसलमान एक सारखेच आहेत असा निष्कर्ष काढतात.  त्यामुळे मुसलमान म्हणजे कोण?  हे समजून घेण्यास अडचणी येतात. मुसलमान ही नुसती अस्मिता/ओळख नाही तर तो एक व्यक्ती सुद्धा असल्यामुळे तो एकाच वेळी भाषिक, वांशिक, जातीय आणि राष्ट्रीय समूहांचा सदस्य असतो. त्यामुळे त्याच्या मुसलमान असण्याला अनेक अर्थ आणि संदर्भ चिटकतात.  काही दिवसांपूर्वी हुसैन हैदरी ची ‘मै कैसा मुसलमान हुं भाई’ ही एक कविता सोशलमिडिया फारच चर्चिली गेली. कवितेच्या पुढील ओळी मुस्लिमांनाकडे पाहण्याच्या एकसाची दृष्टीकोनाला प्रश्न म्हणतात की, “एक नजरसे देख न तू,  मेरे एक नही सो चेहरे है| सो रंग के है किरदार मेरे, सो कलमसे लिखी कहाणी हुं| मै जितना मुसलमान हुं भाई, मै उतना हिंदुस्थानी हुं|”  मुस्लीम समाज बहुजिनसी असल्यामुळे मुसलमान म्हणजे कोण ? या प्रश्नाचे उत्तर देणे खूपच कठीण बनते.  पुढील उदाहरणाने ही गुंतागुंत समजून घेण्यास काहीशी मदत होईल. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात आम्ही आमच्या मुजावर जातीच्या मुसलमान मित्राच्या भावाच्या लग्नाला गेलो होतो. माझ्यासोबत शिकत असलेल्या काश्मिरी मुसलमान मित्राला महाराष्ट्रीय संस्कृती समजावी म्हणून सोबत घेवून गेलो होतो. नवरदेवाच्या घरातील सकाळच्या चालीरीती पाहून माझा कश्मिरी मित्र दोनदा हे मुस्लीम लोकांचेच लग्न आहे का? असे मला विचारत होता. दुपारी शाकाहारी जेवून पाहून, ‘हे मुस्लीम लग्नच वाटतं नाही’ असे मला म्हणाला. शेवटी, लग्न लागल्यावर त्याला विश्वास बसला की, हे मुस्लीम लोकांचेच लग्न आहे. परंतू फक्त लग्न लावण्याची पद्धत सोडली तर बाकी काहीच सारखे नाही म्हणून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. या वरून एक गोष्ट सिद्ध होते की, मुसलमान म्हणून धार्मिक पातळीवर काही समानत्व जरी असले तरी आचार पद्धती, सांस्कृतिक- भाषिक वेगळेपण खूपच आहे. त्यामुळे सगळे मुसलमान हे एकच आहेत किंवा एकसारखेच आहेत. असे म्हणायला काही अर्थ राहत नाही. भारतात प्रादेशिक, भाषिक आणि सांस्कृतिक विविधता खूपच असल्यामुळे ‘हिंदुस्थानी मुसलमान’ किंवा ‘भारतीय मुसलमान’ म्हणण्याला सुद्धा काही जास्त अर्थ राहत नाही कारण भाषिक पातळीवर ‘बंगाली मुसलमान’, ‘पंजाबी मुसलमान’, ‘मराठी मुसलमान’, ‘तमिळ मुसलमान’ आणि जातीय पातळीवर जुलाहा, मोची, हलालखोर, छप्परबंद,  तडवी, बागवान, शेख, सय्यद, पठाण यांच्यात खूपच वेगळेपण दिसून येते. ज्यावेळी भारतीय मुसलमान म्हणून ज्यावेळी चित्र उभे केले जाते. त्यावेळी हिंदी पट्ट्यातील मुसलमानांची त्यातही अश्रफ (अभिजन) उर्दुभाषिक प्रतिमा दाखवली जाते. मुसलमान म्हणजे कोण?  हा प्रश्न जर खरच समजून घ्यायचे असेल तर ‘व्यावहारिक इस्लाम’ सह भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक, वांशिक पातळीवरील वेगळेपण आणि साम्य याचा विचार करावा लागेल.  वैश्विक पातळीवर सुद्धा याचप्रकारे विचार करावा लागेल. ‘इस्लामिक विश्व’ किंवा ‘मुस्लीम विश्व’ या दोन संकल्पना नेहमी वापरल्या जातात. त्यातून मुस्लीम समाज हा एकसाची आहे अशीच प्रतिमा निर्माण होते. परंतू तुर्की, अरेबिक, आफ्रिकन, इराणीयन, भारतीय, इंडोनेशियन, मध्य आशियन मुस्लीम समाज यांच्या अंतर्गत आणि बहिर्गत सुद्धा भाषिक, वांशिक, पांथिक आणि सांस्कृतिक अनेक भेद आहेत. मुसलमान व्यक्तीच्या भाषिक, वांशिक, सांस्कृतिक, जातीय अस्मिता/ओळखी  ह्या मुस्लीम अस्मितेपासून दूर करता येत नाही. म्हणून, मुस्लिमांच्या संदर्भात विचार करतांना झापडबंद आणि एकसाची विचार करून चालत नाही.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...